Sudden Hairfall Alopecia Areata: केस गळणे ही एक सामान्य समस्या आहे, मात्र जेव्हा केसांमध्ये अचानक गुळगुळीत, गोलाकार ठिपके दिसू लागतात तेव्हा ते अधिक गंभीर समस्येचं लक्षण असू शकतं. अशी लक्षणे एलोपेसिया एरियाटा हा आजार असल्याचं दर्शवतात. हा एक ‘ऑटोइम्यून’ (Autoimmune) आजार आहे. यामध्ये आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती चुकून आपल्याच केसांच्या मुळांवर (Hair Follicles) हल्ला करते. यामुळे केसांची वाढ थांबते आणि ते मुळापासून गळून पडतात. हे केवळ डोक्यावरच नाही, तर दाढी, भुवया किंवा शरीराच्या इतर भागांवरही होऊ शकते. याचा परिणाम कोणत्याही वयोगटातील व्यक्तींवर होऊ शकतो. कधीकधी केल गळण्यापूर्वी त्या भागात खाज सुटणे, मुंग्या येणे किंवा सौम्य जळजळ जाणवते.
त्वचारोग तज्ज्ञ आणि त्वचेच्या काळजीचे तज्ज्ञ डॉ. विनीत वर्मा यांनी दि इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, एलोपेसिया एरियाटा ही एक ऑटोइम्यून स्थिती आहे. यामध्ये आपल्या रोगप्रतिकारक पेशी चुकून केसांच्या मुळांवर हल्ला करतात. यामुळे गोलाकार ठिपक्यांच्या स्वरूपात केस गळतात. बऱ्याच केसेसमध्ये ही स्थिती वाढून संपूर्ण टाळूवर परिणाम करू शकते. या स्थितीला एलोपेसिया टोटॅलिस म्हणून ओळखले जाते.
तज्ज्ञ सांगतात की, क्रीम, मलम किंवा लोशनसारख्या योग्य उपचारांनी काही महिन्यात केस पुन्हा वाढू शकतात. यासाठी त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे आणि डॉक्टरांचा सल्ला घेत औषधोपचार करणे महत्त्वाचे आहे. तर मग जाणून घेऊया की एलोपेसिया एरियाटा कशामुळे होतो, त्यावर वैद्यकीय उपचार अशी सविस्तर माहिती जाणून घेऊया…
या आजाराची कारणे काय?
डर्मटॉलॉजिस्टच्या मते, याची नेमकी कारणे अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेली नाहीत, मात्र खालील घटक कारणीभूत ठरू शकतात:
अनुवंशिकता: जर कुटुंबात कोणाला हा त्रास असेल तर होण्याची शक्यता वाढते.
अति ताणतणाव (Stress): मानसिक किंवा शारीरिक तणावामुळे हा आजार बऱ्याचदा बळावतो.
इतर आजार: थायरॉईड किंवा विटिलिगो (कोड) असलेल्या व्यक्तींमध्ये याचा धोका जास्त असतो.
यावर उपचार काय आहेत?
एलोपेसिया एरियाटावर वेळेत उपचार केल्यास केस पुन्हा येण्याची शक्यता दाट असते. डॉक्टर खालीलप्रमाणे उपचार सुचवू शकतात:
टॉपिकल स्टिरॉइड्स: बाधित जागी लावण्यासाठी क्रीम किंवा लोशन दिले जाते.
इंट्रालेशनल इंजेक्शन्स: चट्ट्यांच्या जागी छोटी इंजेक्शन्स दिली जातात, ज्यामुळे केसांची मुळे पुन्हा सक्रिय होतात.
मिनॉक्सिडिल (Minoxidil): केसांच्या वाढीसाठी हे औषध प्रभावी ठरते.
जीवनशैलीत बदल: सकस आहार आणि तणावमुक्त राहण्यासाठी योग किंवा व्यायामाचा सल्ला दिला जातो.
केसगळतीवर घरगुती उपचार
केसगळतीवर उपचार करण्यासाठी कांद्याचा रस हा एक पारंपरिक आणि प्रभावी उपाय मानला जातो. कांद्यामध्ये सल्फर भरपूर प्रमाणात असते. ते केसांसाठी एक आवश्यक घटक म्हणून काम करते. यामुळे कोलेजनचे उत्पादन वाढण्यास आणि टाळूतील रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते. जेव्हा टाळूतील रक्तप्रवाह योग्य असतो, तेव्हा ऑक्सिजन आणि आवश्यक पोषक तत्वे केसांच्या मुळापर्यंत अधिक चांगल्या प्रकारे पोहोचतात. त्यामुळे विरळ झालेल्या भागांना पुन्हा सक्रिय करण्यासाठी आवश्यक चालना मिळते.
