मुंबई : अपोलो हॉस्पिटल नवी मुंबईने यकृत प्रत्यारोपण (लिव्हर ट्रान्सप्लांट) क्षेत्रात महत्त्वपूर्ण अशी २५० शस्त्रक्रियांची कामगिरी गाठत पश्चिम भारतातील अत्याधुनिक यकृत उपचार केंद्र म्हणून आपली ओळख अधिक भक्कम केली आहे. विशेष म्हणजे ९० टक्क्यांहून अधिक यशस्वी शस्त्रक्रिया करून क्लिनिकल उत्कृष्टतेचा उच्च दर्जा सिद्ध केला आहे. हा टप्पा स्वतंत्रपणे गाठणारे हे महाराष्ट्रातील प्रमुख केंद्र ठरले आहे.
जटिल यकृत आजारांवर बहुविषयक (मल्टिडिसीप्लिनरी) पद्धतीने उपचार करण्याची क्षमता आणि प्रगत ट्रान्सप्लांट तंत्रज्ञान यामुळे हे केंद्र रुग्णांसाठी विश्वासार्ह ठरत आहे. अपोलो समूहाने आतापर्यंत ५,००० पेक्षा अधिक लिव्हर ट्रान्सप्लांट यशस्वीपणे पूर्ण केले असून त्याच परंपरेला नवी मुंबईतील हे केंद्र पुढे नेत आहे.या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत गंभीर परिस्थितीतही तातडीने उपचार देण्याची क्षमता.
एका प्रकरणात विल्सन आजार आणि प्रगत सिरॉसिसने ग्रस्त असलेल्या २४ वर्षीय तरुणावर यशस्वी लिव्हर ट्रान्सप्लांट करण्यात आले, ज्यामध्ये त्याच्या आईने लिव्हरचा काही भाग दान केला. दुसऱ्या एका प्रकरणात तीव्र यकृत निकामी अवस्थेतील रुग्णावर अवघ्या २४ तासांत शस्त्रक्रिया करून त्याचे प्राण वाचवण्यात आले. या दोन्ही घटनांमधून डॉक्टरांच्या टीमची तत्परता आणि कौशल्य स्पष्ट होते.
२०१७ मध्ये पहिल्या लिव्हर ट्रान्सप्लांटपासून या कार्यक्रमाची सुरुवात झाली होती. त्या वेळी एका वडिलांनी आपल्या १६ वर्षीय मुलासाठी लिव्हरचा भाग दान केला होता. त्यानंतर या केंद्राने अनेक जटिल प्रकरणे हाताळली आहेत. अगदी एका वर्षाखालील बालकांवरही यशस्वी ट्रान्सप्लांट करण्यात आले असून चार महिन्यांच्या बाळावर आईच्या लिव्हरचा भाग वापरून शस्त्रक्रिया करण्यात आली होती.या केंद्राची ख्याती आता भारताबाहेरही पोहोचली आहे. येमेन, केनिया, टांझानिया, ओमान, सौदी अरेबिया आणि सुदान या देशांमधूनही रुग्ण येथे उपचारासाठी येत आहेत. त्यामुळे नवी मुंबईतील हे रुग्णालय जागतिक स्तरावर विश्वासार्ह उपचार केंद्र म्हणून उदयास येत आहे.
या यशाबद्दल बोलताना विभागप्रमुख डॉ. गुरुप्रसाद शेट्टी म्हणाले, २५० लिव्हर ट्रान्सप्लांट हा केवळ आकडा नसून २५० कुटुंबांना नवजीवन देण्याचा प्रवास आहे. बालरुग्णांपासून ते अत्यंत जटिल प्रकरणांपर्यंत आम्ही जागतिक दर्जाचे परिणाम देत आहोत. आपत्कालीन परिस्थितीतही आम्ही त्वरित उपचार देण्यास सक्षम आहोत.रुग्णालयाचे सीओओ डॉ. किरण शिंगोटे यांनी सांगितले की, हा टप्पा गाठणे म्हणजे आमच्या एकत्रित उपचार पद्धतीची आणि तज्ज्ञांच्या कौशल्याची साक्ष आहे. भविष्यातही अधिकाधिक रुग्णांना प्रगत उपचार उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.
या केंद्रातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे लिव्हर इंटेन्सिव्ह केअर युनिट, जे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. येथे विशेष प्रशिक्षित तज्ज्ञांच्या देखरेखीखाली रुग्णांना शस्त्रक्रियेनंतरची संपूर्ण काळजी दिली जाते. तसेच ‘फास्ट-ट्रॅक’ ट्रान्सप्लांट कार्यक्रमामुळे रुग्णांना कमी प्रतीक्षा कालावधीत उपचार मिळतात. साधारणतः २ ते ३ आठवड्यांत ट्रान्सप्लांट प्रक्रिया पूर्ण केली जाते तर आपत्कालीन प्रकरणांमध्ये २४ तासांतही शस्त्रक्रिया केली जाते. ५०० खाटांचे हे अत्याधुनिक रुग्णालय जेसीआय व एनएबीएच मानांकन प्राप्त असून १२० पेक्षा अधिक आयसीयू खाटा आणि अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर्सने सुसज्ज आहे. १३ सदस्यीय तज्ज्ञांची टीम यात शल्यचिकित्सक, हेपॅटोलॉजिस्ट, अॅनेस्थेटिस्ट आणि क्रिटिकल केअर तज्ज्ञ हे रुग्णांच्या संपूर्ण उपचार प्रक्रियेत सहभागी असते.एकूणच या उल्लेखनीय कामगिरीमुळे अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईने लिव्हर उपचार क्षेत्रात एक नवीन मापदंड निर्माण केला असून रुग्णकेंद्रित सेवा, तंत्रज्ञान आणि तज्ज्ञता यांचा उत्तम संगम साधत जीव वाचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे.
