मानवी जीवनात सेक्स फक्त प्रजननासाठी नसून रंजनासाठीसुद्धा असल्याने मुलांच्या जन्मांनंतरही दाम्पत्यामधे ते चालू असते, थांबत नाही. म्हणून संबंधित व्यक्तींमधील आकर्षण व उत्तेजन टिकणे आवश्यक असल्याने व बहुतेक विवाहितांचे कामजीवन एकसुरी होत असल्याने त्यामध्ये शृंगारकलेला महत्त्व आले आहे.
सेक्स हा मानवात एक शृंगारिक, रोमँटिक प्रवास असून ‘लिंग-योनी संबंध’ हा त्याचा शेवट (एंड पॉइंट) असतो. पण जेव्हा त्यालाच मुख्य उद्देश मानले जाते म्हणजे केंद्रिबदू (सेंटर पॉइंट) केले जाते, तेव्हा सेक्सच्या समस्या जाणवायला लागतात आणि बहुतांशी दाम्पत्यांमध्ये हा रोमँटिक प्रवास होत नाही किंवा अपुरा होत असतो.
आपल्या समाजात बहुतांशी लग्ने अॅरेंज्ड मॅरेज किंवा कुटुंब-संमत लग्ने असतात. अशा दाम्पत्यांना त्यांच्या नात्यात रोमँटिकपणा कसा आणायचा असतो, टिकवायचा असतो हे समजणे गरजेचे असते. प्रेमविवाह असणाऱ्यांना याचा विवाहपूर्व अनुभव असू शकतो म्हणून नंतरही काळाच्या ओघात विसरलेल्या शृंगाराला पुन्हा चालना देणे त्यांना सोपे जाऊ शकते. परंतु अॅरेंज्ड मॅरेज किंवा कुटुंब-संमत लग्ने असणाऱ्यांना त्यांच्यात तसे घडणे किंवा करणे अशक्य वाटते. म्हणून मी रोमँटिकपणाची सोपी व्याख्या केली आहे जी कुठल्याही प्रकारातील विवाहितांना समजल्यावर तसे वागणे त्यांना कठीण वाटणार नाही. रोमँटिकपणा म्हणजे ‘तुम्हाला तुमच्या जोडीदारात लग्नपसंतीच्या वेळी, लग्नाच्या सुरुवातीच्या काळात असणारा इंटरेस्ट सद्यस्थितीतही आठवून तो शब्दांनी व कृतींनी सातत्याने क्षणोक्षणी दाखवण्याची प्रवृत्ती स्वत:मध्ये जाणीवपूर्वक आणण्याची कला’. यालाच मी ‘घनिष्ठतेची कला’ अर्थात ‘आर्ट ऑफ इंटिमसी’ म्हणतो. प्रेमविवाह असो वा अॅरेंज्ड मॅरेज दोन्हीही प्रकारातील विवाहितांना ही कला सहज शक्य होऊ शकते.
मुद्दा अजून सोपा करण्यासाठी हा रोमँटिकपणाही मी दोन प्रकारांत विभागला आहे. रोमान्स आणि बेडरोमान्स. यातील पहिला प्रकार फारच महत्त्वाचा. त्याचाच विचार आपण आता करणार आहोत. कारण तोच नेमका दाम्पत्यामधे गाळला जात असतो. बेडरूम रोमान्स म्हणजे एकांतातील, प्रायव्हसीतील शृंगारकला व बेडरूमबाहेरील रोमान्स म्हणजे सामाजिक निवांतपणातील शृंगार. हे सर्व प्रकार ‘सेक्स व रिलेशनशिप’ काऊन्सेलिंगमधे नीट समजून घेतले तर ही ‘आर्ट ऑफ इंटिमसी’ दाम्पत्याला सहजसाध्य होऊ शकते. इतर कुठल्याही कलेप्रमाणे हिचाही अभ्यास करावा लागतो. यातील तंत्रे आत्मसात करणे म्हणजे कृत्रिमपणे वागणे नाही, तर तो या कलेचा रियाज असतो हे ध्यानात ठेवले पाहिजे.
खरे म्हणजे दाम्पत्याने दिवसाची सुरुवात एकांतपणातील शृंगाराने करणे अवघड नसते. मी अगदी सोपे, सहज जमणारे व नगण्य वेळ घेणारे शृंगारतंत्र त्यांना सांगतो, ते म्हणजे ‘गुड मॉर्निंग किस टेक्निक’, शुभप्रभात चुंबन तंत्र. त्यामुळे पती-पत्नींमधील ‘अनुराग’ अर्थात प्रीती वाढायला मदत होते असेही सांगितले आहे. त्यामुळे ‘तू माझा/माझी’ (सेन्स ऑफ ओननेस, माझेपणाची जाणीव) व ‘मी तुझा/तुझी’ (सेन्स ऑफ बिलाँगिंगनेस, स्वाधीनतेची जाणीव) या दोन गोष्टींचा संदेश काही सेकंदांतच दिला जात असतो, या दोन जाणिवा दाम्पत्यजीवनाच्या बांधिलकीसाठी (सेन्स ऑफ कमिटमेंट) आवश्यकच असतात. दाम्पत्यजीवनात सुरक्षिततेची जाण (सेन्स ऑफ सिक्युरिटी) यामुळे येत असते आणि पती-पत्नींच्या दाम्पत्यस्वास्थ्याची पायाभरणीही होत असते. हाच ‘आर्ट ऑफ इंटिमसी’चा पाया आहे. इथूनच शृंगाराची ठिणगी पडते आणि नंतर तिचे रूपांतर ‘कामज्वाले’त व्हायला मदत होते.
शृंगार म्हणजे शारीरिक खेळच ही कल्पना काढून टाकणे गरजेचे आहे. जोडीदाराशी भावनिक जवळीक व त्याची वैचारिक ओळख करण्यासाठी देण्यात येणारा वेळ व कृती हे शृंगारात अभिप्रेत असते. ‘प्रत्येक स्त्रीमध्ये फुलणारे एक फूल असते तर प्रत्येक पुरुषामध्ये खेळणारे एक मूल असते’ हे जरी सत्य असले तरी स्त्रीला केवळ मऊ, मुलायम खेळणे (सॉफ्ट टॉय’) मानणे किंवा झोपेच्या गोळीसारखे (स्लीपिंग पिल) वापरणे म्हणजे शृंगारिकता नाही. बेड रोमान्स तर महत्त्वाचा असतोच, पण त्यासाठी स्त्रीशरीराचाच नाही तर स्त्रीमनाचाही विचार जरुरीचा असतो. म्हणजेच पती-पत्नींनी एकमेकातील मानसिक आणि भावनिक रुची निर्माण केली पाहिजे किंवा पुनरुज्जीवित केली पाहिजे.
(लोकसत्ता चतुरंग पुरवणीमध्ये १६ फेब्रुवारी २०१३ रोजी प्रसिद्ध झालेला हा लेख पुनर्प्रकाशित करत आहोत.)