Ashish Chanchlani Mom Fitness Transformation Tips : प्रसिद्ध यूट्युबर आशीष चंचलानी (३२ वर्षे) याने नुकतेच आपली आई दीपा चंचलानी यांच्या फिटनेस प्रवासाबद्दल भाष्य केले. आईला वेटलिफ्टिंग शिकवल्यामुळे त्यांच्यात कसा सकारात्मक बदल दिसून आला याविषयी त्यांनी सांगितले.
आशीष म्हणाला, “परवाच माझी आई डेडलिफ्ट्स करत होती. मी तिला स्नायूंचे (muscles) महत्त्व पटवून दिले. आई आधी फक्त ‘झुंबा’ करायची. मी तिला दोन महिने माझ्याबरोबर जिममध्ये येण्याची विनंती केली. त्यावेळी तिला सांगितले की, जर दोन महिन्यांनंतर तुला गुडघ्यात किंवा शरीरात फरक जाणवला नाही, तर तू म्हणशील तसे मी वागेन. मात्र, अवघ्या एका महिन्यातच तिला फरक जाणवला आणि तिने व्यायाम सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला.”
आशीषने पुढे सांगितले, “आम्ही खूप हळूहळू सुरुवात केली. सुरुवातीला फक्त दोन किलोचे डंबेल्स घेतले. तिने तिच्या पोश्चरवर (बसण्या-उठण्याची पद्धत) काम केले आणि तिला खूप ताजेतवाने वाटू लागले. आई आता डेडलिफ्ट्स खूप चांगल्या प्रकारे करते. ती ४० ते ५० किलोपर्यंतचे वजन सहज उचलू शकते, असे मला वाटते. एकदा आम्ही सगळे रॉक क्लायंबिंगला (गड चढणे) गेलो होतो, त्या प्रसंगी आई अवघ्या १० मिनिटांत तो गड चढली. बाकी सगळे मागे राहिले होते आणि ती आम्हाला घेण्यासाठी पुन्हा खाली आली. जेव्हा लोकांनी तिला तिच्या फिटनेसचे रहस्य विचारले, तेव्हा तिने सांगितले की, मी आता प्रथिनयुक्त आहार घेते आणि नियमित जिममध्ये जाते.”
तज्ज्ञ काय म्हणतात?
मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट हॉस्पिटलचे वरिष्ठ अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. गझनफर बी. पटेल यांनी सांगितले की, स्ट्रेंथ ट्रेनिंग हे केवळ तरुणांसाठीच असते, असा एक समज आहे. परंतु, अशा कथांमधून हे स्पष्ट होते की, वाढत्या वयातही फिटनेस सुधारण्यासाठी याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो.
डॉ. पटेल यांच्या मते, जर योग्य पद्धतीने आणि हळूहळू सराव केला, तर स्ट्रेंथ ट्रेनिंग पूर्णपणे सुरक्षित आणि फायदेशीर आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक दुखापतीच्या किंवा पाठदुखीच्या भीतीपोटी वजन उचलणे टाळता; परंतु वास्तवात, तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या व्यायामामुळे स्नायू, सांधे व हाडे अधिक मजबूत होतात. हलक्या वजनाने सुरुवात करून, पोश्चरवर लक्ष केंद्रित केल्यास शरीरात सकारात्मक बदल होतात आणि आत्मविश्वासही वाढतो.”
वाढत्या वयातील महिलांसाठी याचे फायदे (Strength Training Benefits Joint Pain Older Women)
महिलांचे वय वाढते तसे त्यांच्या स्नायूंची ताकद आणि हाडांची घनता (bone density) कमी होऊ लागते, ज्यामुळे फ्रॅक्चरचा धोका वाढतो. स्ट्रेंथ ट्रेनिंगमुळे स्नायूंची शक्ती, शरीराचा समतोल आणि सांध्यांची मजबूती वाढते. त्यामुळे शरीराची ठेवण सुधारते आणि गुडघेदुखी किंवा कंबरदुखी यांसारख्या सामान्य समस्या कमी होतात. अनेक महिलांनी स्ट्रेंथ ट्रेनिंगमुळे दैनंदिन जीवनात अधिक उत्साही आणि गतिमान वाटत असल्याचे सांगितले आहे.
महत्त्वाचा सल्ला : स्नायू कमकुवत असणे हे व्यायामापेक्षा जास्त वेदनादायी असते. त्यामुळेच हलक्या वजनापासून सुरुवात करा, योग्य तंत्र शिका आणि हळूहळू व्यायामाची तीव्रता वाढवा. घाईघाईने जड वजन उचलल्यास समस्या निर्माण होऊ शकतात.
