Avocado Benefits Blood Sugar Control Diabetes Diet : रोजच्या आहारात ॲव्होकॅडो खाल्ल्यास तुमच्या शरीरात काय बदल होतात याविषयी ‘करंट डेव्हलपमेंट्स इन न्यूट्रिशन’ (Current Developments in Nutrition) जर्नलमध्ये मे २०२६ एक संशोधन प्रसिद्ध झाले. या संशोधनात की, नियमित आहारात दररोज एका ॲव्होकॅडोचा समावेश केल्याने ग्लुकोज लोड (GL) जवळपास १४ पॉईंट्सनी लक्षणीयरीत्या कमी झाला आणि यासाठी आहारात इतर कोणतेही मोठे बदल करण्याची आवश्यकता भासली नाही.

या संशोधनात ९६१ लोक सहभागी झाले होते. या सहभागींपैकी ज्या गटाला ॲव्होकॅडो देण्यात आले होते, त्यांच्या आहारातील ग्लुकोज लोड (GL) मध्ये १३.७-पॉईंट्सची घट दिसून आली. ॲव्होकॅडो खरोखरच रोज खाण्यायोग्य फळ आहे का, हे समजून घेण्यासाठी इंडियन एक्सप्रेसने एका तज्ज्ञांशी संवाद साधला.

ठाण्याच्या केआयएमएस (KIMS) हॉस्पिटल्सचे इंटर्नल मेडिसिन विभागाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. सुंदर कृष्णन म्हणाले की, रक्तातील साखरेचे व्यवस्थापन करण्यासाठी ॲव्होकॅडो नक्कीच उपयुक्त ठरू शकते, परंतु त्याकडे मधुमेह किंवा रक्तातील साखरेच्या समस्येवर त्वरित उपाय म्हणून पाहिले जाऊ नये. ॲव्होकॅडोचे वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये कर्बोदकांचे (Carbs) प्रमाण नैसर्गिकरित्या कमी असते आणि निरोगी मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स तसेच फायबरचे प्रमाण जास्त असते. हे संयोजन पचनक्रिया मंद करते, तुमचे पोट भरलेले राहण्यास मदत करते आणि जेवणानंतर रक्तातील साखर वेगाने वाढण्याची शक्यता कमी करते, असे डॉ. सुंदर यांनी सांगितले.

रिफाइंड कार्ब्स किंवा अस्वास्थ्यकर फॅट्स असलेल्या पदार्थांऐवजी संतुलित आहारात ॲव्होकॅडोचा समावेश केल्यास रक्तातील साखरेवर चांगले नियंत्रण मिळवता येते. प्रक्रिया केलेले स्नॅक्स किंवा जास्त कर्बोदके असलेल्या पदार्थांच्या विपरीत, ॲव्होकॅडोचा रक्तातील साखरेवर अत्यंत कमी प्रभाव पडतो.

डॉ. सुंदर यांनी नमूद केले की, ॲव्होकॅडोमधील फायबरमुळे ग्लुकोज रक्तात मिसळण्याचा वेग कमी होतो, तर निरोगी फॅट्समुळे जेवणानंतर रक्तातील साखर स्थिर राहण्यास मदत होते. काही संशोधने असे सुचवतात की, निरोगी फॅट्स आणि फायबरयुक्त आहारामुळे कालांतराने इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी सुधारू शकते. मात्र, हे फायदे केवळ एका पदार्थातून न मिळता एकूणच निरोगी आहाराचा भाग म्हणून मिळतात, असे डॉ. सुंदर पुढे म्हणाले.

याचा अर्थ मधुमेही रुग्णांनी रोज ॲव्होकॅडो खावे का?

डॉ. सुंदर यांच्या मते, असे करणे आवश्यक नाही. जरी ॲव्होकॅडो निरोगी असले तरी, ते किती प्रमाणात खाल्ले म्हणजे रक्तातील साखर नियंत्रणात राहील, याचे कोणतेही निश्चित प्रमाण नाही. भाज्या, फळे, तृणधान्ये, कडधान्ये, सुकामेवा, बिया, प्रथिने आणि निरोगी फॅट्स यांचा समावेश असलेल्या संतुलित आहारावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे.

अनेकांसाठी, नियमितपणे ॲव्होकॅडो खाणे हा एक चांगला पर्याय असू शकतो, परंतु ॲव्होकॅडोमध्ये कॅलरीज जास्त असल्याने त्याचे प्रमाण नियंत्रित ठेवणे महत्त्वाचे आहे. ज्यांच्या आहारासंबंधी विशिष्ट गरजा आहेत त्यांनी त्यांच्या एकूण पोषणानुसार त्याचे प्रमाण ठरवावे, असेही त्यांनी सुचवले.

मुख्य निष्कर्ष काय आहे?

सर्वात मोठा गैरसमज म्हणजे, एखादा विशिष्ट पदार्थ एकट्यानेच रक्तातील साखरेची पातळी लक्षणीयरीत्या बदलू शकतो. डॉ. सुंदर यांच्या मते, मधुमेहाचे योग्य व्यवस्थापन हे व्यापक दृष्टिकोनावर अवलंबून असते – निरोगी आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप, वजन नियंत्रण, तणाव व्यवस्थापन आणि डॉक्टरांनी दिलेले उपचार पाळणे.

फायबर आणि निरोगी फॅट्समुळे मधुमेहाच्या आहारात ॲव्होकॅडोचा समावेश करणे निश्चितच फायदेशीर ठरू शकते, परंतु ते रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी केवळ एक “डेली सुपरफूड” म्हणून नव्हे, तर चयापचय (Metabolic Health) सुधारण्याच्या संपूर्ण प्रक्रियेचा एक भाग म्हणून सर्वाधिक प्रभावी ठरते.