Health Benefits Ayurvedic Tonic: आपल्याला माहीत आहेत, त्याहीपेक्षा खसखशीचे अनेक गुण आहेत. आयुर्वेदात तिचा खूप चांगला वापर केला जातो. चारोळी तशी दिसायला अगदी लहानशी असली तरी तीही तितकीच गुणकारी आहे. गोडांबी वीर्यवर्धक आणि मेंदूसाठी उत्तम आहे तर सुके किंवा ओले खोबरे म्हणजे तर गरिबांसाठी उत्तम टॉनिकच आहे. बाजारातील टॉनिकपेक्षाही याचे गुण अनेक पटींनी अधिक आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जाणून घ्यायला हवे ते स्वस्तातील ‘ख’ पदार्थांचे टॉनिक!
खसखस
अफूच्या बोंडातील बी म्हणजे खसखस हे बऱ्याच जणांना माहीत नाही. दिवाळीमध्ये अनारसे करण्याकरिता किंवा बाळंतीणीला खसखशीची लापशी द्यावी, एवढीच माहिती बहुतेकांना आहे… अतिसार, कॉलरासारखे वारंवार जुलाब होणे, जुनाट ग्रहणी, शौचावाटे रक्त पडणे, झोप न येणे, आतड्यातील रक्तस्राव, शुक्रदौर्बल्य इत्यादी विकारात खसखस उपयुक्त आहे. खसखशीचे कार्य मधुर रसासारखे पण उष्ण आहे. स्निग्ध व मलावष्टंभ आहे. कफ पित्त वाढवून वातशमन करणाऱ्या पदार्थात खसखस जास्त उपयोगी आहे. कारण त्याच्या वापराने जुलाब होत नाहीत. खसखशीबरोबर साखर, बदाम, बेदाणा, चारोळी, खारीक, मनुका इत्यादी पदार्थ वापरून लापशी करावी.
जुलाब आणि झोपेसाठी गुणकारी
खूप जुलाब होत असल्यास खसखशीच्या बिया वाटून त्याची लापशी किंचित जायफळ व सुंठ चूर्ण मिसळून घ्यावी. खूप कृश झालेल्या व्यक्तीने हिवाळ्यात खसखस लापशी जरूर घ्यावी. प्रकृती सुधारते, झोप येत नसल्यास साखर किंवा मधाबरोबर खसखशीचा काढा झोपताना घ्यावा. आमातिसार, पोट दुखून जुलाब होत असल्यास खसखस ताकात वाटून चवीपुरते मीठ मिसळून घ्यावी. खूप नशापाणी, धूम्रपान करणाऱ्यांच्या सर्दी, पडसे, खोकला, दमा या विकारात खसखस दुधात शिजवावी. या दुधात थोडे केशर व वेलची चूर्ण मिसळून घ्यावे. काही कारणाने डोके काम करीत नसेल, मेंदूचा थकवा आला असेल तर बदाम व खसखस वाटून त्याची लापशी घ्यावी. बदाम पचायला जड पडू नयेत म्हणून खसखशीचा उपयोग होतो.

काजू
काजू पाहिले की, खावेसे वाटतील अशी चीज आहे. पण जरा जपून. काजू अत्यंत उष्ण आहेत. ज्यांना लघवीचा त्रास आहे. लघवी कमी होते, अडखळत होते, मूतखडा आहे, लघवीला जोर करावा लागतो, त्यांनी काजू खाऊ नये. शौचावाटे रक्त पडणे, अंगावर चकंदळे उठणे, गांधी येणे, आम्लपित्त, अल्सर, पित्तामुळे पोटदुखी या विकारांत काजू वर्ज्य करावे. पित्तप्रकृतीच्या व्यक्तीकरिता काजू कुपथ्य आहे. फार काजू खाऊन होणाऱ्या त्रासावर डाळिंबाचा रस, खडीसाखर व मध हा उत्तम उतारा आहे.
काजूचे फळ उत्तम पाचक आहे. त्याच्या रसाने भूक सुधारते. वारंवार होणारे जुलाब थांबवतो. आमांशयात गुबारा धरत असेल तर काजूच्या फळाच्या रसाने तो कमी होतो. काजूच्या फळांपासून उत्तम पाचक आसव होते. काजूच्या ताज्या फळांचा रस कपड्यावर पडला तर डाग जात नाहीत, इतके पक्के डाग पडतात. स्मृतिनाश व मेंदू क्षीणतेवर काजू उपयुक्त आहेत. ताकद व वजन वाढणे याकरिता भरपूर व्यायाम व नियमितपणे काजू खाणे याचा उपयोग हिवाळ्यात करावा. त्वचेला बधिरपणा येणे, जळवात, चिखल्या याकरिता काजूतेलाचा प्रयोग सावधानपूर्वक करावा. काजू वृष्य, वाजीकर, हृदय व नाडीला बळ देणारे फळ आहे. काजूत भरपूर प्रोटिन व बी-व्हिटॅमिन आहेत.
गोडांबी
गोडांबी म्हणजे बिब्ब्याचा गाभा आहे. बिब्ब्याचे सर्व गुण गोडांबीत आहेतच. त्याशिवाय गोडांबी ही अत्यंत वृष्य, शुक्र व वीर्यवर्धक आहे. ज्या पुरुषाला स्त्रीसंग करायला ‘भ्या’ वाटते त्याने नियमितपणे गोडांबी खावी. मात्र त्याकरिता पुढील पथ्य कडकपणे पाळावे म्हणजे बिब्बा अंगावर उतत नाही. गोडांबीचा प्रयोग थंड ऋतूत, थंड ठिकाणी व रात्रीच्या वेळात किंवा पहाटे करावा. हा प्रयोग करण्याअगोदर आठ दिवस आंबट, खारट व तिखट वर्ज्य करावे. आंबवलेले पदार्थ, पाव, दही, लोणचे, पापड खाऊ नये. लघवीची तक्रार असणारांनी गोडांबी खाऊ नये. वीर्यवृद्धी अपेक्षित असणाऱ्यांनी आपल्या ताकदीनुसार तीन ते सात गोडांब्या सकाळी रिकाम्यापोटी दुधाबरोबर घ्याव्या. त्यानंतर त्या दिवशी शक्यतो दूध-भात, दूध-चपाती असा अनम्ल, अलवण व मसालाविरहित आहार ठेवावा. असा प्रयोग मानवत गेला तर सात दिवस नियमित गोडांब्या खाव्यात. लघवी कमी होत नाही यावर लक्ष ठेवावे. ज्यांना मेंदूला ताकद हवी, स्मरणशक्ती वाढायला हवी असेल त्यांनीसुद्धा वरीलप्रमाणे प्रयोग करावा, गोडांबीबरोबर गायीचे दूध प्यावे. गोडांबी अधिक खाऊन शरीरावर फोड उठले तर घाबरू नये. कोथिंबीर वाटून त्याचा रस पोटात घ्यावा. बाहेरून त्याचा चोथा लावावा.
चारोळी
चारोळ्या खाण्याचा प्रघात नाही. पण बदामाचे सहीसही गुण चारोळीच्या बियांत आहेत. रुची यावी म्हणून केवळ चारोळी वापरावी, असे नसून लहान मुलांकरिता चारोळी हे उत्तम टॉनिक आहे. चारोळीत तीस टक्के मांसवर्धक पदार्थ व साठ टक्के स्निग्ध पदार्थ आहे. खोकल्यात चारोळीची पेज घ्यावी. त्वचाविकारात चारोळी वाटून त्याचे उटणे करावे. चारोळीचे तेल केस काळे व्हावे म्हणून वापरून प्रयोग करण्यासारखे आहे.
खोबरे
नारळ कल्पतरू आहे. त्याचा प्रत्येक भाग उपयुक्त आहे. नारळाच्या आतील खोबरे, ओले, वाळलेले, नारळाचे दूध तीनही वेगवेगळ्या प्रकारे आरोग्य राखण्याचे व रोगनिवारण्याचे काम करतात. सुके खोबरे हे अत्यंत शुक्रवर्धक, वीर्यवर्धक, ओजवर्धक आहे. ज्या स्त्री-पुरुषांच्या कमतरतेच्या किंवा कामेच्छा कमी असल्याच्या तक्रारी आहेत त्यांनी नियमित खोबरे खावे.
गर्भारपणी खोबरे खावे
क्षीण बालके, वाढ न होणारी मुले-मुली, विशेषत: खुरटी स्तन व छाती असणाऱ्यांकरिता सुके खोबरे वरदान आहे. ज्या बाळंतिणीला पुरेसे दूध येत नाही त्यांनी खोबरे जरूर खावे. दुधाचे प्रमाण वाढते. ज्या स्त्रियांना आपल्याला गोरीपान व तेज:पुंज संतती व्हावी अशी इच्छा आहे त्यांनी नियमाने खोबरे गर्भारपणी खावे. उत्तम संतती होते. कंपवात विकारात कृश व्यक्तीकरिता खोबरे नियमित खाणे चांगले, त्यामुळे मज्जातंतूंचे पोषण होते. कापणे कमी होते.
खोबऱ्याबरोबर आल्याचा तुकडा…
धातूक्षयामुळे ज्यांना मुंग्या येतात. जास्त बोलणे किंवा विचार, मगजमारी यामुळे क्षीणता येते त्यांनी खोबरे, साखर खावी. दुबळेपणाच्या तक्रारी असणाऱ्यांना जर पोटात वायू धरण्याची खोड असेल तर त्यांनी खोबऱ्याबरोबर आल्याचा तुकडा किंवा सुंठचूर्ण खावे. ज्यांना मलावरोधाची सवय आहे त्यांनी कोरड्या खोबऱ्याऐवजी ओला नारळ दुबळेपणाकरिता वापरावा. कोरडे खोबरे भाजून खाल्ले तर पोटात वायू धरत नाही. पचायला सोपे जाते. नेत्रक्षीणता, वाचण्याचे खूप श्रम यामुळे डोळे थकणे याकरिता सकाळी रिकाम्यापोटी खोबरे चावून चावून खावे.
ख पदार्थांचे टॉनिक
आमचे आयुर्वेदातील गुरुजी वैद्य दत्तूकाका शेण्ड्ये त्यांच्या सर्व रुग्णांना ‘ख’ पदार्थांचे टॉनिक सांगायचे. खोबरे, खारीक, खसखस, खडीसाखर व खरबुजाच्या बियांमधील मगज. ‘रंगीबेरंगी’ टॉनिकांच्या बाटल्यांपेक्षा हे टॉनिक अनेकपट चांगले. गळू, फोड पिकावयास हवे असतील तर खोबरे व कांदा ठेचून शिजवून त्याचे पोटीस बांधावे. पुवाचा निचरा आपोआप होतो किंवा गळू, फोड आपोआपच बसून जातात.
दात बळकट होण्यासाठी
ज्यांना आपल्या मुलांचे दात बळकट व्हावयास हवे आहेत त्यांनी मुलांना रोज एक खोबऱ्याचा तुकडा चावून चावून खावयास सांगावे. नंतर चुळा भराव्यात. जिथे कॉडलिव्हर ऑईल किंवा अन्य प्रकारची टॉनिक खाण्याकरिता वापरली जातात त्याला आपला खोबऱ्यासारखे पदार्थ वापरून पाहावयास हवे. तुलनेने खोबरे स्वस्त आहे. ज्यांना नेहमी थंडी वाजते, खूप पांघरुण घ्यावेसे वाटते, पाय चेपावेसे वाटतात अशा वातविकारात सुके खोबरे खावे. त्यामुळे रक्त वाढते, व्हायटॅलिटी सुधारते. नारळ वरून खडबडीत, टणक असला तरी आतले ओले खोबरे कोणालाही हवेहवेसेच वाटते. महागड्या बदाम, बेदाणा, आक्रोडापेक्षा ओल्या, सुक्या खोबऱ्याशी मैत्री करा. हाडाच्या हट्टीविकारांना, मगजमारीला दूर ठेवा.

