Best Ayurvedic Home Remedies and health tips for natural healing at home: निसर्गाच्या सान्निध्यात आणि आपल्या स्वयंपाकघरात अनेक अशा वस्तू आहेत ज्या औषधांचे काम करतात. आयुर्वेदात सांगितलेले आणि प्रत्यक्ष करून पाहिलेले हे ‘औषधाविना उपचार’ आपल्याला दैनंदिन आजारांपासून मुक्त ठेवण्यास मदत करतील. केवळ पैसेच वाचणार नाहीत तर तुमच्यासाठी ते आरोग्यदायी असतील.
जुलाब
जुलाबाची शेकडो औषधे बाजारात आहेत. त्यापेक्षा प्रथम मनुका, द्राक्षे, अंजीर, गुलाबफूल, दूध व तूप असे निरुपद्रवी पदार्थ वापरून बघावे. कडू दोडका, कडू घोसाळे यांच्या बियांचे चूर्ण उलटी किंवा जुलाब दोन्ही करवते. किंवा वायूच्या तक्रारीकरिता तीन महिन्यांतून एकदा मोठ्या मात्रेने एरंडेल तेल जरूर घ्यावे. सोबत सुंठीचा काढा घ्यावा. भरपूर केळी रात्री खाउन काहींना जुलाब लागू पडतो. प्रयोग करून पाहावयास हवे.
रक्तक्षोमण, डाग व क्षारकर्म
इसब, गजकर्ण, नायटा या वाहत्या, पू असलेल्या त्वचा विकारात खूप खाज असली तर थोडे काचेच्या तुकड्याने न भिता इसब किंवा गजकर्णावरून जोरात व वेगाने ओरखडे काढावे. थोडे अशुद्ध रक्त जाऊ द्यावे. बरेच वाटते. मात्र हा प्रयोग बलवान माणसांवर जरूर करावा. तळपायाच्या कुरूपाला सळई, चमचा, उलथने लालबुंद तापवून डाग द्यावा. वर राख किंवा चांगले तूप लावावे. कुरूप लवकर बरे होते. करूप कापू नये.

चामखीळ व फाजील वाढलेले मांस
मूळव्याधीचा मोड किंवा चामखीळ, फाजील वाढलेले मांस, जाड कातडी याकरिता अनेक क्षार घासून लावावे. आघाडा, सातू, केळीचे खुंट, निवडुंग, रुई अशा विविध वनस्पतींचे पचांग जाळून पाण्यात भिजत ठेवून, ते पाणी नंतर आटवून क्षार तयार करता येतात. क्षाराचे तंत्र तसे पाहिले तर अजिबात अवघड नाही. काही नाही तर मीठ व हळद पूड या वाढलेल्या मांसल भागाला घासून लावून पाहावी. मोड, चामखीळ बसून जाते. थोडे झोंबते.
फुले, चूळ
माळीण किंवा नाकाला सूज येणे, नाक ठणकणे याकरिता सुगंधी फुले हुंगावयास सांगितली आहेत. लहानपणी उघड्यावर झोपलो असता माझ्या स्वत:चे कानात किडा गेला. तो आत फिरु लागला. मला विलक्षण तीव्र वेदना होऊ लागल्या. माझे वडील ‘वैद्य खडीवाले’ यांनी लगेच कोमट पाण्याची चूळ भरून माझ्या कानात जोरात सोडली. त्याबरोबर किडा बाहेर आला. एका क्षणात मला बरे वाटले. ही १९४० सालची गोष्ट असावी. या ‘औषधाविना उपचाराला’ काही विलक्षणच मोल आहे.
मीठ, हळद
काही वेळेस पडजीभ वाढते, खोकला सुरू होतो. पडजिभेला चमच्याच्या टोकाने मीठ किंवा हळद चेपून लावण्याबरोबर पडजीभ बसते. खोकला थांबतो.
घोड्याचा केस, मीठ व तेल
मूळव्याध हा विलक्षण पीडा देणारा विकार आहे. या विकारात जेव्हा हाताला लागण्यासारखा थोडा मोठा मोड असतो, त्यावेळेस घोड्याचा केस त्या मोडाच्या मुळाशी चांगला ताण देऊन बांधला की प्रथम थोडा त्रास होतो. पण दोन-तीन दिवसांनी मोड गळून पडतो. याच प्रकारे चामखिळीला घोड्याचा केस बांधून शस्त्रक्रियेशिवाय चामखीळ काढता येतात. मात्र चामखिळी थोड्या मोठ्या हव्या.
चिखल्या हा विकार पाण्यात काम करणाऱ्या बायकांच्या पाचवीला पुजलेलाच आहे. चिखल्या झालेल्या बेचक्यात रात्री, कणभर मीठ मिसळेलं गोडेतेल घासून लावावे. प्रथम थोडे झोंबते. आरडाओरडा करावासा वाटतो. पण चिखल्या रात्रीत बऱ्या होतात. माझ्या कुटुंबावर या उपचाराचा प्रथम प्रयोग केला, तो यशस्वी ठरला.
राख, शेण
भाजलेल्या जागी गवारीची किंवा शेणाची राख किंवा गोडे तेल किंवा दोन्हीचे मिश्रण फोड येऊ देत नाही. फोड बसून जातात. कुठे कापले, खरचटले, जखम झाली, रक्त वाहू लागले तर गाईचे शेण थापावे. गाईचे शेण व गोमूत्र मोठे अॅन्टीसेप्टिक आहे.
गुळण्या
काही लहान मुलामुलींना चष्म्याचा वाढता नंबर ही समस्या होऊन बसली आहे. नियमाने सकाळी साध्या पाण्याच्या खळखळून चुळा भरणे, तसेच नाकाने पाणी पिण्याचा नित्य उपक्रम चालू केल्यास सतत वाढणारा चष्म्याचा नंबर कमी होतो. सर्दी, पडसे, खोकला, दमा, आवाज बसणे या विकारात मीठ, हळद व गरम पाण्याच्या गुळण्या अर्धा विकार बरा करतात. विकार वाढू देत नाही, माहीत असूनही आम्ही नुसतीच औषधे मागतो. तोंड येणे, घशात फोड येणे या तक्रारीत याच पद्धतीने तूप व गरम पाण्याच्या गुळण्या कराव्यात. आराम पडतो हे निश्चित.
हवापालट
कफाचे विकार, सर्दी, पडसे, खोकला, दमा, क्षय यांसारख्या रोगात दिवसेंदिवस औषधे काम करेनाशी झाली आहेत. रोगप्रतिकारशक्ती कमी पडते. रोग औषधांना पुरून उरतो. नवनवीन औषधांचे संशोधन काहीच करू शकत नाही असे दिसते. अशा वेळेस हवापालट हा मोठाच उपाय आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी किमान तीन आठवडे हा प्रयोग करावा. तसेच त्या काळात दीर्घश्वसन, प्राणायाम करून फुप्फुसाची ताकद वाढवावी व पुन्हा नवजीवन प्राप्त झाल्यासारखे रोगाशी लढावे. ज्यांना हवापालट शक्य नाही त्यांनी किमान ज्या खोलीत आपण राहतो, रात्री झोपतो ती खोली बदलावी. त्यामुळे दीर्घकालीन दूषित हवेपासून लांब गेल्याचा फायदा फुप्फुसांना मिळतो.
