Discover the secrets of ‘औषधाविना उपचार’ to protect your body from seasonal illnesses: बदलत्या हवामानाचा मानवी शरीरावर थेट परिणाम होतो. कधी पावसाळ्यातील ओलावा तर कधी उन्हाळ्यातील प्रखर उष्णता आपल्याला आजारी पाडू शकते. मात्र, प्रत्येक वेळी औषधांची गरज भासतेच असे नाही. ‘औषधाविना उपचार’ ही संकल्पना समजून घेतल्यास आपण दैनंदिन जीवनातील साध्या बदलांतून व्याधीमुक्त होऊ शकतो. आपल्या रोजच्या जीवनातल्या काही गोष्टींमुळे आपल्याला त्रास होतो. अर्थात हा त्रास होतो ते निव्वळ त्यापासून बचाव कसा करायचा हे माहीत नसल्यामुळे. म्हणूनच आपल्याला माहीत असायलाच हव्यात अशा काही गोष्टी पुढे देत आहे.

ओल

दमा, सर्दी, पडसे, खोकला, क्षय, बारीक ताप, संधिवात, आमवात, अर्धांगवात, पाठदुखी, गुडघे, खांदे किंवा कंबरदुखी, सूज, मुंग्या, कंड, त्वचाविकार इत्यादी रोगांना घरातील ओल, आसपासचा पाण्याचा तलाव, गार फरशी, सभोवतालची भरपूर झाडे व या सर्वांचा शेजार किंवा ओल टाळता येत नाही. त्यांनी निदान काही गोष्टी पाळाव्या, पायात सतत चप्पल असणे, अंगात स्वेटर, मफरल असणे, जेवणात आले, सुंठ, पुदिना, लसूण व तुळशीची पाने, हळद असणे आवश्यक आहे.

गार वारे

गार वारे विशेषत: पूर्वेकडचा गार वारा प्राणवह स्त्रोतसाचे दमा, खोकला, सर्दी, आवाज बसणे, कानाचे विकार, लाली, पाणी येणे, कमी दिसणे, खुपऱ्या, त्वचेचे विकार, खाज, अ‍ॅलर्जी, त्वचा काळी पडणे, वाताचे व हाडांचे विकार, पाठदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी, सांधेदुखी, आमवात अशा अनेक रोगांचे कारण आहे. त्याकरिता वरीलप्रमाणेच मफरल, स्वेटर वा शाल इत्यादींनी संरक्षण करणे व तुळस, लसूण, पुदिना, आले या पदार्थांची शरीरात ऊब निर्माण करणे आवश्यक आहे.

Ayurvedic tips for health without medicine | Seasonal precautions for better immunity | औषधाविना उपचार आरोग्य टिप्स | ऋतूमानानुसार आरोग्याची काळजी कशी घ्यावी
घरगुती उपायांनी आणि निसर्गोपचाराने ‘औषधाविना उपचार’ शक्य आहे. (Image- Gemini)

धूळ

धुळीच्या अ‍ॅलर्जीमुळे भलेभले सर्दी, पडसे, दमा, खोकला या विकारांनी पछाडले जातात. नाक चोंदते किंवा बंद होते, सतत वाहते. त्याकरिता नाकाचा भाग रुमालाने किंवा मफरल बांधून संरक्षित ठेवावा. तुळशीची पाने खाणे, दीर्घश्वसन व नाकाला आत तूप लावणे यांचा उपाय करावा. नाकाची रोग प्रतिकारशक्ती वाढवावयास हवी. त्याकरिता वेखंड कांडी सहाणेवर पाण्यात उगाळावी. ते गंध चमच्यात गरम करावे. नाकाच्या शेंड्यावर बाहेरून लावावे. त्या गंधाचे नस्यही करावे.

कोंदट हवा

कोंदट हवेत नेहमी राहण्याने पांडू, क्षय, वजन घटणे, बारीक ताप, सांध्याचे विकार, दमा, खोकला असे प्राणवायूच्या अभावाचे विकार उत्पन्न होतात. त्याकरिता दीर्घश्वसन, प्राणायाम, तुळशीची पाने खाणे याबरोबरच अशा हवेत धूप, ऊद, वेखंड, ओवा, शोपा, निरगुडी यांची धुरी अधूनमधून करावी.

अतिऊन

सगळेच रोग जेवणखाण्यात कमी-अधिकपणे होतात असे नाही. अनेक रोगांचे मूळ आपल्या राहण्यासभोवतालचा परिसर, हवा, ऊन, पाऊस, पाणी, थंडी, वारा यावर अवलंबून असते. त्याचप्रमाणे आपल्या परिसरात, आपल्या राहणीत, निवासात किंवा दैनंदिन कार्यक्रमांत बदल केला तरी रोगांवर उपाय सापडतो. ऊठसूट औषधांकरिता दवाखान्यांत पळावे लागते असे नाही.

काम विभागून करणे

अति उन्हात काम करण्याची ज्यांना सवय आहे त्यांना सहसा उष्णतेचे, पित्ताचे, रक्ताचे, त्वचेचे विकार होत नाहीत. त्यांना त्याच्यापासून बचाव करण्याचे काही मार्ग माहीत असतात. उदाहरणार्थ, वारंवार भरपूर पाणी पिणे, टोपीत किंवा काखेत कांदा ठेवणे, धण्याचे पाणी पिणे, काम विभागून करणे इत्यादी. उत्तर हिंदुस्थानात अतिउन्हामुळे सनस्ट्रोक, मेंदूला इजा पोहोचणे, विलक्षण थकवा येऊन दुबळेपणा अशा क्वचित कथा ऐकायला मिळतात. असे होऊ नये म्हणून तिकडे पुदिन्याचे थंडाई सरबत पिण्याचा प्रघात आहे. आपल्याकडे तुळशीच्या बियांची खीर हा उपाय आहे.

अतिउन्हातील वावर हा उपायदेखील

अति उन्हामुळे शरीरातून ताकद गमावली जाते. त्याकरिता कोहळा रस, उसाचा रस, काकडी, कोथिंबीर, मनुका, ताडफळ असे ज्यांच्या त्यांच्या ऐपतीप्रमाणे व उपलब्धतेनुसार उपाय आहेत. अतिउन्हात काम झाल्यानंतर हातापायाची आग, भगभग, डोळ्यांचा दाह, लाली, दृष्टिक्षीणता, निद्रा कमी होणे, याकरिता एरंडेल, खोबरेल किंवा चांगले तूप; कानशिले, हातपाय, डोके, डोळ्यांच्या बाजूला हलक्या हाताने जिरवावे. अतिकफाच्या विकारात काही प्रमाणात अतिऊन वाईट नाही. विशेषत: क्षय, प्लुरसी या विकारांत अतिउन्हात वावर हा एक उपायच आहे. कफ प्रकृतीच्या स्थूल, बलवान व्यक्तींनी अति उन्हाचा वापर घाम निघण्याकरिता जरूर करावा. ज्यांना तीव्र ऊन चालत नाही अशा क्षयी किंवा कफग्रस्त रुग्णांनी सकाळी नऊ-दहा वाजेपर्यंत कोवळे ऊन पाठीवर घ्यावे. सूर्यप्रकाशात अनेक जीवनसत्त्वे आहेत.

अतिश्रम

तारुण्याच्या मस्तीत अतिश्रम एखादे वेळी किंवा काही काम केले तर खपून जातात. पण सदासर्वदा सर्वच ताकद पणाला लावून काम करू नये. ‘सिंह आपल्या ताकदीवर हत्तीचा पराभव करतो, पण स्वत:ची ताकद गमावतो’ असे संस्कृत सुभाषित आहे. त्याकरिता आपल्या ताकदीच्या निम्मीच ताकद खर्च होईल असे श्रम नेहमी करावेत. अतिश्रमाने क्षय, राजयक्ष्मा, छातीत दुखणे, गुडघे, खांदा, मान, पाठ यांचे वाताचे विकार उत्पन्न होतात. भगंदर, मूळव्याध, पोटदुखी, अल्सर, आम्लपित्त, हृद्रोग, रक्तदाबक्षय, पांडू, संधिवात, जीर्णज्वर हे विकार बळावतात. अतिश्रम होणार असतील तर त्या मानाने तूप, तेल, शेंगदाणे, उडीद, मूग, साखर, दूध, फळे असा झीज भरून येणारा आहार व मिळेल तेवढी विश्रांती व झोप याकडे लक्ष असावे.