Explore the ancient wisdom of treatment without medicine through Ayurvedic principles and daily lifestyle changes: आजच्या धावपळीच्या युगात आपण प्रत्येक छोट्या दुखण्यावर गोळी घेतो, पण आयुर्वेद सांगतो की, अनेकदा शरीराला औषधांची गरजच नसते. आपल्या शरीराचे ऐकणे आणि नैसर्गिक उपचारांचा अवलंब करणे हाच दीर्घायुष्याचा मार्ग आहे.

शरीराचे ऐका

निरोगी आयुष्यासाठी स्वतःचे शरीर समजून घेणे म्हणजेच शरीर जे काही सांगायचा प्रयत्न करते आहे, ते ऐकणे आणि त्यानुसार आपल्या दैनंदिन खाण्या- वागण्यात बदल करणे हे महत्त्वाचे असते. अनेकदा आपल्या औषधांची गरजच नसते. आणि अगदीच घरात किंवा स्वयंपाकघरात उपलब्ध असलेल्या गोष्टींचा वापर करून आपल्याला चांगल्या आरोग्याची काळजीही घेता येते. पण अलीकडे आधुनिक वैद्यकशास्त्र हे प्रत्येक बाबीवर औषध हाच उपाय सांगते. मात्र आजही या आधुनिक युगात औषधाविना उपचार शक्य आहेत, त्याच साठी माझा हा लेखन खटाटोप.

शरीराला हितकारक

आपल्या शरीराच्या गरजा काय आहेत, हे अनेकदा आपल्याला समजतेच असे नाही. मात्र आयुर्वेदाने त्यातले मर्म ओळखले असून मानवी गरजेनुसार उपाययोजना सांगितल्या आहेत. त्यातील काही उपाययोजना तर अगदीच घरगुती स्वरूपाच्या तुम्हाला- आम्हाला सर्वांनाच घरच्याघरी करणे शक्य होतील, अशाच आहेत. मात्र त्या कुणी तरी तज्ज्ञाने समजावून सांगणे आणि जनसामान्यांनी त्याचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. आयुर्वेदाने सांगितलेले काही उपाय सांगितले आहेत, कदाचित ते आपल्याला फारसे आवडणार नाहीत, पण शरीरासाठी गरजेचे असतात. यात अशाही एका उपायाचा समावेश आहे जो वापरला जातो पण मला स्वतः तितकासा पटलेला नाही. त्याचा स्पष्ट उल्लेखही केलेला आहे.

Ayurvedic treatment without medicine Marathi | वैद्य खडीवाले यांचे घरगुती उपाय | Natural healing with Ayurveda Marathi | औषधांशिवाय आरोग्य टिकवण्याचे मार्ग
निसर्गोपचार आणि आयुर्वेदाने मिळवा औषधाविना आरोग्य (Image- Gemini)

कोरडा मसाज, अंग रगडणे

हल्ली अ‍ॅक्युप्रेशर या शास्त्राची खूप मोठी चलती आहे. आयुर्वेदात एकशे सात मर्मस्थाने सांगितली आहेत. ती स्थाने व अ‍ॅक्युप्रेशरची दाबण्याची ठिकाणे फार भिन्न नाहीत. आपल्याकडे कोरड्या द्रव्यांचा मसाज किंवा अंग रगडून, चेपून घेण्याची प्रथा  आहे. ज्यांचे पूर्णपणे वाताचे दुखणे आहे, तेल मसाज करून त्रास होतो, दिवसभर श्रमाचे काम आहे त्यांनी अंग रगडून घेण्याचा अभ्यास जरूर करून घ्यावा.

संगजिरे चूर्णाचा मसाज

माझ्या वडिलांना नाना सत्याग्रहांत गोऱ्या सोजिऱ्यांच्या लाठ्या, काठ्या,  बुटाच्या लाथा खाव्या लागल्या होत्या. त्याशिवाय पाठीवर कापडाची ओझी वाहून त्यांनी फिरतीचा व्यवसाय केला. यामुळे उतार आयुष्यात कंबर खूप दुखायची. त्याकरिता मी नियमितपणे तेलाचा किंवा संगजिरे चूर्णाचा मसाज करायचो. वडिलांना बराच आराम पडायचा.

लेप

लेप ही आयुर्वेदाची स्पेशॅलिटी आहे. लेपांचा उद्देश दोन प्रकारचा असतो. सूज, दु:ख, जखडणे कमी करणे किंवा आग, उष्णता, लाली कमी करणे. यात पहिल्या प्रकाराचा लेप जाड असतो. त्याने दीर्घकाळ उष्णता धरून ठेवून दुसऱ्या भागाला ती उष्णता द्याायची असते. ही द्रव्ये कोणतीही असोत ती उष्ण असावीत. उष्णता कमी करण्याकरता जे लेप लावायचे ते गार, पातळ व पुन:पुन्हा लावावे. हा लेप सुकला की काढून टाकावा. या लेपाने त्या जागेची उष्णता शोषून घेतली जाते.

शोधन

शरीराचे स्वास्थ टिकवणे किंवा रोग हटविणे याकरिता आपल्या शरीरास थोडा वेळ क्लेश द्यावे लागतात. कष्ट होतात, न आवडणाऱ्या गोष्टी कराव्या लागतात. तसेच उलटी व जुलाब किंवा डाग देणे, रक्त काढणे या उपायांचे आहे. शरीरातील फाजील वाढलेले दोष जवळच्या मार्गाने काढून टाकणे काही वेळा फारच आवश्यक असते. जेव्हा कफ वा पित्त खूप वाढते, माणूस बलवान आहे तेव्हा हे उपचार जरूर करावे. ज्या उपायांनी तात्काळ आराम पडतो.

आपल्या सृष्टीत मांजराला अजीर्ण झाले तर ते गवत खाते व उलटी करवते. माकडाला खाणे जास्त झाले तर बाहाव्याच्या शेंगाचे झाड शोधून शेंगा खाऊन तो जुलाब करवतो. रानटी बैल किंवा हत्ती माजाला आले की, आपसात तुंबळ युद्ध करून माज उतरवितात. आम्हाला मात्र उलटीला किंवा रक्त काढायला भय वाटते, हे बरोबर नाही.

क्रोध, क्षुधानिग्रह, मद्यपान

शास्त्रात सर्वांना पटणारे अनेक उपाय आहेत, तसेच माझ्यासारख्या साशंक व्यक्तीला न पटणारे उपायही घाम काढण्याकरिता सांगितलेले आहेत. या उपायांमागचे मर्म लक्षात घेऊन तारतम्याने त्याचा वापर करावा. भरपूर मद्यापान केल्यास शरीरातून खूप घाम बाहेर पडतो. किंवा अनेकदा माणसाला खूप क्रोध करावयास भाग पडले तर त्याच्या शरीराला बऱ्यापैकी घाम फुटतो. उपाशी राहूनही घाम निघतो अशा उपायांवर चिंतनाची गरज आहे.

उलटी

आमाशयात फार कफ किंवा पित्त साठले, पच्माशयात साठले तर दमा, खोकला, पोटफुगी, तोंडाला पाणी सुटणे, उलटीची भावना, अंगाला खाज सुटणे, कफ-पित्ताच्या तक्रारीत मीठ पाणी पिऊन उलटी करावी. ती सुसह्य व्हावी, लवकर व्हावी असे वाटत असेल तर पाण्याअगोदर भरपूर दूध किंवा उसाचा रस किंवा दोन्ही प्यावे. त्यानंतर पुन्हा असे दोष वाढू नये म्हणून काळजी घ्यावी. मीठ पाण्याने उलटी होत नाही असे वाटले तर मोहरीचे पाणी वापरावे. हे व याशिवाय इतर पदार्थ तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच वापरावे. नवजात अर्भकाला वेखंड, मध चाटविण्याचा उद्देश फाजील कफ पडून जावा हाच आहे. मध मोठ्या प्रमाणात घेतला तर उलटी होते.