मुंबई : बदलापूर येथे उघडकीस आलेल्या स्त्रीबीज (एग डोनेशन) विक्री प्रकरणाने राज्यभर खळबळ उडवली आहे. २२ ते ४५ वयोगटातील मुली आणि महिलांना मोठ्या पैशांचे आमिष दाखवून या प्रक्रियेत ओढले जात असल्याचा गंभीर आरोप पुढे आला आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या महिलांना प्रक्रियेची संपूर्ण माहिती, संभाव्य दुष्परिणाम आणि आरोग्यधोके याबाबत स्पष्ट मार्गदर्शनच दिले जात नसल्याची तक्रार आहे.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, स्त्रीबीज काढण्याची प्रक्रिया ही अत्यंत संवेदनशील आणि वैद्यकीय देखरेखीखालीच पार पाडली जाणारी असते. हार्मोनल इंजेक्शन्स देऊन अंडाशयातील फॉलिकल्सची वाढ केली जाते आणि नंतर सूक्ष्म शस्त्रक्रियेद्वारे बीज काढले जाते. मात्र काही ठिकाणी ही प्रक्रिया ‘पाच ते दहा मिनिटांत पूर्ण होते’, ‘कोणताही त्रास होत नाही’ अशा भ्रामक दाव्यांद्वारे महिलांना फसवले जात असल्याचे समोर आले आहे. हजारो ते लाखो रुपयांच्या मोबदल्याचे आश्वासन देत दलालांचे जाळे सक्रिय असल्याची शंका व्यक्त होत आहे.

विशेष म्हणजे, आयव्हीएफ केंद्रांकडून लेखी संमती घेतली जात असल्याचा दावा केला जातो; पण त्या संमतीपूर्वी योग्य समुपदेशन, वैद्यकीय तपासण्या आणि दीर्घकालीन परिणामांची माहिती दिली जाते का, याबाबत मोठा प्रश्नचिन्ह आहे. काही महिलांना प्रक्रियेनंतर पोटदुखी, हार्मोनल बिघाड, मानसिक ताण यांसारख्या तक्रारी जाणवल्याचेही बोलले जात आहे. तरीही अधिकृत पातळीवर ठोस आकडेवारी उपलब्ध नाही.या प्रकरणामुळे राज्यातील सर्व आयव्हीएफ केंद्रांची चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. नियमांचे पालन होते का तसेच एकाच महिलेकडून वारंवार स्त्रीबीज घेतले जात नाही ना आणि दलालांच्या माध्यमातून व्यवहार होत नाही ना, अशा अनेक मुद्द्यांवर सरकार आणि आरोग्य यंत्रणेने तातडीने कारवाई करणे गरजेचे आहे.

Award Banner

महिलांच्या शरीराचा वापर केवळ ‘उत्पादन’ म्हणून केला जात असल्याची भावना व्यक्त होत आहे. आर्थिक गरजांचा गैरफायदा घेत महिलांना अंधारात ठेवून हा व्यवहार चालत असेल, तर तो केवळ अनैतिकच नव्हे तर गंभीर गुन्हा आहे. महिलांच्या आरोग्याशी आणि भविष्यातील प्रजननक्षमतेशी खेळ करणाऱ्या या साखळीचा पर्दाफाश करून दोषींवर कठोर कारवाई करणे ही काळाची गरज आहे. अन्यथा स्त्रीबीज विक्रीचे हे जाळे आणखी आक्रमकपणे पसरत राहील आणि अनेक निष्पाप महिलांचे आयुष्य धोक्यात येईल.

दरम्यान,बदलापूर येथे उघडकीस आलेल्या स्त्रीबीज विक्रीप्रकरणामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली असून या गंभीर प्रकारावर सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. विधान परिषदेत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी या प्रकरणाची दखल घेत दोषींवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला. आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू महिलांना आमिष दाखवून बेकायदेशीर पद्धतीने स्त्रीबीज संकलन व विक्री केल्याचा आरोप असून हा प्रकार मानवी मूल्यांनाच काळिमा फासणारा असल्याचे मत व्यक्त होत आहे.कदम यांनी स्पष्ट केले की, या प्रकरणात संबंधित केंद्रे, डॉक्टर आणि दलाल यांची सखोल चौकशी सुरू असून कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही. आवश्यक असल्यास ‘मकोका’सारख्या कठोर कायद्यांखाली गुन्हे दाखल करण्याचाही विचार केला जाईल. महिलांच्या आरोग्याशी आणि सन्मानाशी संबंधित अशा प्रकारांबाबत सरकार शून्य सहनशीलतेची भूमिका घेणार असल्याचे त्यांनी ठासून सांगितले.