Hibiscus Tea For Type 2 Diabetes: जी तुमची आवड तेच तुमचं औषध असं जर झालं तर जगात सगळेच किती निरोगी होतील नाही का? तुम्ही जर चहा प्रेमी असाल तर आम्ही आज तुम्हाला चहाची एक अशी रेसिपी सांगणार आहोत जी तुमच्या आरोग्याला सुद्धा हातभार लावू शकेल. सध्या ऑनलाईन चालू असणाऱ्या चर्चांनुसार तर ही रेसिपी तुम्हाला मधुमेह बरा करण्यासाठी सुद्धा मदत करू शकते असे समजतेय. अर्थात आपण चर्चांवर अवलंबून न राहता याविषयी थेट तज्ज्ञांचंच मत जाणून घेणार आहोत.

न्यूट्रिशनिस्ट आणि डिजिटल क्रिएटर चारमेन हा डोमिंग्वेझ यांनी सुचवलेला चर्चेतील पर्याय म्हणजे तुम्ही तुमचा टाइप 2 मधुमेह बरा करण्यासाठी “हिबिस्कस किंवा जमैका” म्हणजेच जास्वंदाच्या फुलांचा वापर करू शकता.

चारमेन यांनी त्यांच्या रीलमध्ये, तिने “जास्वंदाच्या पाकळ्यांचा चहा किंवा नुसतंच पाणी” पिण्याचा सल्ला दिला आहे. यात साखर न घालता तुम्हाला हे गरम पेय प्यायचे आहे. यामध्ये असणारे अँटिऑक्सिडंट्स व व्हिटॅमिन सी शरीराला महत्त्वाचे फायदे देऊ शकतात असेही त्यांनी सांगितले आहे.

आहारतज्ज्ञांचं मत काय, जास्वंदाचा चहा काय फायदे देतो?

धी हॉस्पिटलच्या मुख्य आहारतज्ज्ञ आणि पोषणतज्ज्ञ शुभा रमेश एल यांनी इंडियन एक्सस्प्रेसला सांगितले की, “हिबिस्कस किंवा जमैका टाइप 2 मधुमेह पूर्ण बरा करू शकतात हे सांगणारा कुठलाही ठोस पुरावा नसला तरी, काही अभ्यासांमध्ये असे सुचवले आहे की जास्वंदीचा चहा रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यात मदत करू शकतो.

जास्वंदामध्ये ऑरगॅनिक ऍसिडस्, फ्लेव्होनॉइड्स आणि अँथोसायनिन्स असतात, ज्यांचा फायदा उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी तसेच लिपिड-कमी करण्यासाठी होऊ शकतो. मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी सुद्धा याची मदत होऊ शकते. लक्षात घ्या हे उपाय तुम्हाला पूर्ण बरे करू शकत नाहीत पण तुमच्या आरोग्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी मदत करू शकतात.

जास्वंदाचा चहा किती प्रमाणात घ्यावा?

आहारतज्ज्ञ शुभा असेही सांगतात की, अमुक प्रमाणात जास्वंदाचे सेवन केल्याने मधुमेह नियंत्रणात ठेवता येतो असा काही लिखित निश्चित नियम नाही. पण बहुतांश अभ्यासांमध्ये समोर आलेल्या माहितीनुसार दररोज एक ते दोन कप जास्वंदाच्या चहाचे सेवन हे फायदेशीर ठरू शकते. अर्थात फायदे मिळवण्यासाठी तुम्ही किती वेळ जास्वंद पाण्यामध्ये भिजवता व किती प्रमाणात घेता हे सुद्धा महत्त्वाचे मुद्दे आहेत.

लक्षात ठेवायच्या गोष्टी!

शुभा सांगतात की, जास्वंद मध्यम प्रमाणात वापरल्यास बहुतेक लोकांसाठी सुरक्षित मानले जाते. मात्र हे लक्षात घ्यायला हवे की या औषधी वनस्पतीमध्ये लघवीचे प्रमाण वाढवणारे घटक असतात जे सामान्यतः मधुमेह नियंत्रणासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांमधील समान घटकांच्या संपर्कात आल्याने विपरीत परिणाम होऊ शकतो.

लक्षात घ्या, जास्वंद रक्तातील साखरेच्या पातळीवर देखील परिणाम करू शकतो. त्यामुळे मधुमेह असलेल्या लोकांनी नियमितपणे सेवन केल्यास रक्तातील साखरेचे बारकाईने निरीक्षण करणे आवश्यक आहे. टाईप 2 मधुमेह प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यासाठी विशेषत: आहारातील बदल, नियमित शारीरिक हालचाली आणि आवश्यक असल्यास, औषधोपचार यांचा एकत्रित फंडा वापरायला हवा.

हे ही वाचा<< दर ७ दिवसांनी एकदा कोबी खाल्ल्याने शरीराला मिळतात ‘हे’ मोठे फायदे; एक वाटी भाजीत किती कॅलरीज दडल्यात पाहा

एकंदरीत, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की जास्वंदाचे आरोग्य फायदे खरे असले तरी, मधुमेहावरील एकमेव उपचार म्हणून त्यावर अवलंबून राहू नये. मधुमेह नियंत्रणातील फायदे आणि जोखीम पूर्णपणे समजून घेण्यासाठी तुमच्या वैद्यकीय स्थितीशी परिचित असलेल्या तज्ज्ञांचा सल्ला आवर्जून घ्या.