How modern habits are damaging your eyesight बदलत्या जीवनशैलीत चाळिशी ओलांडली की पोटाचे विकार, वायू धरणे आणि अपचनाच्या तक्रारी सर्रास उद्भवतात. या समस्यांवर ‘रात्रीचे चालणे’ किंवा जेवणानंतरची शतपावली अत्यंत फलदायी ठरते. सकाळी फिरणे हे आरोग्यासाठी उत्तम असले तरी, रात्रीचे फिरणे हे प्रामुख्याने ‘रोगनिवारणा’साठी असते. रात्रीच्या शांत हवेत चालण्यामुळे केवळ पचन सुधारत नाही, तर मानसिक ताण कमी होऊन उत्तम झोपही लागते.

रात्री फिरणे उत्तम

चाळिशीतल्या वयानंतर बहुधा सर्व शहरवासीयांना, सुखासीन किंवा श्रमिकांना पोटाचा त्रास सुरू होतोच. वायू धरणे, पोट साफ न होणे, जेवणानंतर शौचाला लागणे, पोट डब्ब होणे, एवढ्या-तेवढ्या खाण्याने पोटाला तडस लागणे, सकाळी पोट साफ न होणे, शौचाला चिकट, आमांश किंवा खडा होणे इत्यादी वायूंचा प्रकोप झाल्याच्या रोगांचा प्रादुर्भाव या काळात सुरू होतो.

जेवणानंतर शतपावली

सगळ्या आरोग्याची, स्वास्थ्याची मजा निघून जाते. या साध्या विकारांव्यतिरिक्त आम्लपित्त, ‘अंग बाहेर येणे, उलट्या, निद्रानाश, रक्तदाबवृद्धी, मधुमेह, मूळव्याध, लठ्ठपणा, शय्यामूत्र, सगळ्या अंगावर सूज येणे या विकारांतही रात्री फिरणे- किमान पंधरा-वीस मिनिटे फार फलदायी आहे. जेवणानंतर शतपावली करावी असे म्हणतात. त्याऐवजी किमान तीन-चार हजार पावले चालावे, सावकाश चालावे. हे चालणे चालू असताना वायू तर मोकळा होतोच. शिवाय आल्या आल्या अंथरुणाला पाठ लागली की उत्तम झोप लागते.

Award Banner

रात्रीचे चालणे हे रोगनिवारणाकरता

या फिरण्यामुळे मनातील वाईट विचार घराबाहेर राहतात. डोक्यातील वायू निघून जातो. स्वप्ने खूप पडण्याची सवय आहे त्यांनी रात्री अवश्य फिरावे. स्वप्ने पडत नाहीत, उत्तम झोप लागते. बैठ्या कामामुळे ज्यांचे अन्नपचन होत नाही. व्यायामाचा अभाव आहे. झोपेच्या गोळ्या घेऊनच ज्यांना झोप येते त्यांनी हा रात्री फिरण्याचा प्रयोग अवश्य करावा. काही लोक सकाळी फिरायला जातात. ते योग्यच आहे. पण रात्रीचे फिरणे हे ‘रोगनिवारणा’करिता आहे, हे जरूर लक्षात ठेवावे.

सकाळी फिरणे आरोग्यदायी

पित्तप्रकृती, कृश व्यक्ती, पांडू, हर्निया, हृद्रोग, क्षय, दमा, जुलाब, रक्तदाबक्षय, छातीत दुखणे, ताप, सर्दी-खोकला, कफ, सायटिका, सायंकाळी अंगावर सूज येणाऱ्या रुग्णांनी रात्री फिरणे टाळावे.
‘सकाळी फिरणे’ कसे आवश्यक ते सांगण्याची गरज नाही. मात्र सकाळी फिरणे हे रोगनिवारणापेक्षा ‘आरोग्यरक्षणाकरिता’ आहे.

फुप्फुसांची ताकद वाढते

सकाळी आपण उठतो तेव्हा आपली सर्व इंद्रिये विश्रांती घेऊन ताजीतवानी झालेली असतात. मोकळी हवा घेऊन फुप्फुसे अधिक कार्यक्षम करता येतात. चक्कर येणे, छातीत दुखणे, रक्तदाबक्षय, क्षयविकारांच्या रुग्णांनी सावकाश का होईना सकाळी थोडे तरी फिरावयाचा प्रयास करावा. त्यामुळे त्यांच्या फुप्फुसाची ताकद वाढते. स्थौल्य, मधुमेह, अंगाला खाज येणे, आमवात, अग्निमांद्या, उदरवात, मलावरोध, आमांश, बैठे काम असणाऱ्यांनी किमान पंधरा मिनिटे किंवा दोन किलोमीटर फिरून यावे. या फिरण्यामुळे खूप घाम यावा व त्याचे श्रम व्हावेत अशी अपेक्षा नाही.

फिरून आल्यावर चहा- कॉफी टाळावी

फिरून आल्यावर लगेचच घाईघाईने स्नान करू नये. तसेच या फिरण्यानंतर चहा पिऊन फिरण्याचे गुण घालवू नयेत. चहा-कॉफी ही पेये अनेक रोगांची कारणे आहेत. त्यापेक्षा जिरेमिश्रित तांदळाची पेज घ्यावी किंवा गरम पाण्यात लिंबूपाणी वा सरबत घ्यावे. चांगल्या आरोग्याकरिता सकाळी फिरावयास जात असलात तर कृपया तोंडाला ‘कुलूप’ लावावे.

बैठे काम आणि विकार

बहुसंख्य शहरवासीयांना निरनिराळ्या कार्यालयांमधील ‘बैठे कामच’ भरपूर असते. बैठ्या कामामुळे अन्नवह स्रोतसाचे अनेक विकार उत्पन्न होतात. त्या बैठ्या कामाला सिगारेट, विडी, अधिक चहापान याची जोड असली तर मूळव्याध, भगंदर, उदरवात, अम्लपित्त, अल्सर, मलावरोध, गॅस, अपचन, स्थूलपणा या सगळ्या विकारांना सुरुवात होते. पूर्वीच हे विकार असले तर ते विकार वाढतात.

मूळव्याधीचा धोका

पाठदुखी, गुडघेदुखी, पायावर सूज, मुंग्या येणे, मधुमेह, खाज येणे हे विकार सुरू होऊ शकतात. त्याकरिता लक्ष जरूर असावे. ज्यांना शक्य आहे त्यांनी ऑफिसमधून परत जाताना पायी जावे. खूप खूप काळ बैठे काम केले तर गुदभाग उबतो. त्यामुळे मूळव्याध हा विकार होऊ शकतो. त्याकरिता आवश्यक अधेमधे उठावे. शक्य असल्यास वेताची खुर्ची किंवा भोके असलेली खुर्ची वापरावी.

झोपून, अतिबारीक वाचन

दिवसेंदिवस डोळ्यांचे दृष्टीचे, अंधत्वाचे विविध विकार वाढत आहेत. शहरी राहणी, तथाकथित मॉडर्न खाणे-पिणे यामुळे डोळ्यांचे विकार होतातच. मधुमेह व रक्तदाब वाढतो. यामुळे दृष्टी कमी होणे, अजिबात न दिसणे, पूर्ण अंधत्व या विकारांची वाढती संख्या ही नेत्रतज्ज्ञांच्या चिंतेची बाब झाली आहे. कदाचित मधुमेह व वाढता रक्तदाब हे टाळता येण्यासारखे नसतील पण झोपून वाचन, प्रवासात गतिमान वाहनात वाचन व अतिसूक्ष्म वाचन हे टाळता येण्यासारखे आहे.

झोपून वाचन करणे टाळा

काहींना कथा, कादंबऱ्या, पुस्तके, वर्तमानपत्रे, मासिके झोपून वाचायची सवय असते. या झोपून वाचण्याच्या सवयीने दोन मोठे दोष उद्भवतात. झोपून वाचण्यामुळे फार जवळ घेऊन पुस्तक वाचावे लागते, त्यामुळे ऱ्हस्व दृष्टी वाढतेच व कालांतराने जास्त वेळ वाचवत नाही. चष्म्याचा नंबर बदलत राहतो. मुख्य म्हणजे झोपून देहाला जी विश्रांती अपेक्षित आहे ती मिळत नाही. मेंदूला रक्तपुरवठा जास्त व्हावा लागतो, त्यामुळे चक्कर, तोल जाणे इत्यादी तक्रारी संभवतात.

प्रवासातही वाचनाने पडद्याचे विकार

काही अति ‘बिझी’ व्यक्तींना स्वत:च्या कारमध्ये ऑफिसातील कागदपत्रे वाचायची सवय असते. मुंबई-पुणे शहरांतील अनेक उद्याोगपती, बँकर्स, वकील, सल्लागार, पत्रकार, धनिक लोक हे आपल्या प्रवासातील वेळ निवांत वाचन करण्याकरिता उपयोगात आणतात. उद्देश स्तुत्य आहे, पण त्यामुळे डोळ्यांत लाली येणे, नेहमी लाली येऊन रक्त साकळणे, दृष्टी क्षीण होणे इत्यादी पडद्याचे विकार उत्पन्न होतात.

पित्तप्रकोपाने दृष्टी जाण्याचा धोका

डोळ्यांमध्ये वायूच्या जोडीला पित्तप्रकोपाची जोडी मिळून अनेकांची दृष्टी कायमची गेल्याची उदाहरणे आहेत. गतिमान वाहनांत सहजपणे डोळ्याला ताण पडणार नाही इतपत वर्तमानपत्रे, नियतकालिके यांच्या हेडलाइनचे ‘कॅज्युअल’ वाचन मी समजू शकतो, पण बारीक वाचन, लहान आकाराची आकडेमोड, सूक्ष्म टाइपामध्ये केलेले ड्राफ्टसचे वाचन यामुळे दृष्टी अकाली गमावून बसायची पाळी नक्की येते.

पूर्ण विश्रांती महत्त्वाची

रक्तदाबक्षय, चक्कर येणे, पांडूता, जिना चढून धाप लागणे, डोळ्याच्या पडद्यााचे विकार, पोटदुखी, कावीळ, जलोदर, यकृत प्लीहावृद्धी, हृद्रोग, हृदयविस्तृती, पाठीच्या मणक्याची झीज, स्लिप डिस्क, हाडांचा क्षय या विकारांत ‘पूर्ण विश्रांती’ उपयुक्त आहे. शक्य झाल्यास उताणे पडून राहावे. झोपेव्यतिरिक्त नुसते ‘स्वस्थपणे’ तासभर पडून राहण्याने अधिक काम करावयास वाव राहतो. या आसनाला शवासन असे म्हणतात. ‘रिलॅक्सड् फ्रेम ऑफ माइंड’ असे सर्व स्नायू सैल सोडून निर्विकार, निर्विचार शवासन दिवसातून एकदा तरी करावेच.

दीर्घकाळ टीव्ही पाहणे

बराच काळ आपल्या देशात टीव्हीचा वापर फक्त दिल्ली, कोलकाता, मुंबई, चेन्नईपुरता होता. तेव्हा आम्हा भारतवासीयांना आपण फार ‘मागासलेले’ आहोत असे वाटत होते. आता हा ‘इडियट बॉक्स’ भारतभर घरोघरी, दारोदारी, खेडोपाडी सर्वत्र पोचला आहे, पोचत आहे. ज्यांना उद्योग आहे व नाही अशी लहान-थोर, म्हातारी-कोतारी, घरातील कर्ती माणसे, स्त्रिया सर्वजण टीव्हीला कसे चिकटून बसतात! त्या टीव्हीला काहीही कार्यक्रम असला तरी तो या लोकांना चालतो.

डोळे तळावतात

आपण किती जवळून टीव्ही पाहावा, किती वेळ पाहावा याचे काही ताळतंत्रच नाही. एकेका सुट्टीच्या दिवशी ‘लगातार’ तीन-तीन सिनेमे पाहणारी मंडळी पुणे-मुंबईत आहेत. त्यांचे डोळ्यांचे विकार वाढतात. नंबर वाढतो. थोडे लिखाण-वाचन त्रास देते. डोकेदुखी, डोळे लाल होणे, डोळ्यांचा थकवा इत्यादी तक्रारी सुरू होतात. अशा नाना तऱ्हेच्या डोळ्यांच्या चुकीच्या वापराबरोबर, काहींना नाइलाज म्हणून खूप वाऱ्यात मोटारसायकल किंवा स्कूटरवर प्रवास करावा लागतो. काहींचा प्रवास खूप धूळ असलेल्या भागांत, खराब रस्त्यावर असतो. काहींना रणरणत्या उन्हात, भर उन्हाळ्यात विशेषत: मे व ऑक्टोबरमध्ये प्रवास करावा लागतो. या सर्व प्रकारच्या कारणांनी प्रथम डोळे तळावतात, दृष्टीचा थोडा त्रास होतो.

डिटॅचमेंट ऑफ रेटिना

मग एकदम केव्हा तरी दृष्टीपडद्याचा विकार सुरू होतो. मग पडदा सरकणे किंवा ‘डिटॅचमेंट ऑफ रेटिना’ हा गंभीर विकार उत्पन्न होतो. वरील सर्व विकारांत कारणे टाळावीतच, पण ज्यांना शक्य नाही त्यांनी रोज रात्री झोपताना तळपाय, तळहात, कानशिले यांना हलक्या हाताने चांगले तूप जिरवावे. उठल्याबरोबर व झोपताना गार पाण्याने डोळे धुवावेत. गार पाण्याने डोक्यावरून आंघोळ करावी. शक्य तेवढी डोळ्यांची काळजी ऊन व वारे यापासून घ्यावी.