Benefits Of Moringa Leaves: काही,महिन्यांपूर्वी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते अनेक तज्ज्ञ डॉक्टरांनी सुद्धा मोरिंगा म्हणजेच शेवग्याचा पाला व शेंगा या आरोग्यदायी आहेत असे सांगितले होते. तेव्हापासूनच या पारंपरिक भाजीला बरेच महत्त्व प्राप्त झाले आहे. तुम्हाला माहीत आहे का? शेवग्यामध्ये सुमारे ६.७ ग्रॅम प्रोटीन असते जे स्नायूंच्या आरोग्यासाठी सर्वोत्तम मानले जाते, इतकंच नाही तर शेवग्याच्या पाल्यामध्ये संत्र्यापेक्षा सातपट जास्त व्हिटॅमिन सी, पालकापेक्षा तिप्पट लोह आहे आणि दुधापेक्षा चारपट जास्त कॅल्शियम असते. उन्हाळ्यात तर शरीराचा नैसर्गिक कूलर म्हणून शेवग्याचा पाला किंवा शेंगा काम करू शकतात. आज आपण या शेवग्याच्या भाजीच्या सेवनाचे फायदे तसेच तुमच्या आहारात त्याचा समावेश कसा करता येईल याविषयी जाणून घेणार आहोत.

इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल्स, नवी दिल्ली येथील पोषणतज्ज्ञ कनिका नारंग यांनी इंडियन एक्सस्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार, शेवग्याच्या पानांमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, पोटॅशियम आणि लोह यासारख्या आवश्यक पोषक तत्वांचा साठा असतो. ही पोषक तत्त्वे दृष्टी, रोगप्रतिकारक शक्ती, हाडांची ताकद आणि रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. शेवगा हा १८ प्रकारच्या अमीनो ऍसिडने समृद्ध असतो.

शेवग्याच्या पानांचे व शेंगांचे फायदे (Benefits Of Moringa)

१) शेवग्यामध्ये क्वेर्सेटिन, क्लोरोजेनिक ऍसिड आणि बीटा-कॅरोटीन यांसारख्या अँटीऑक्सिडंट्स असतात. हे ऑक्सिडेटिव्ह तणावाचा सामना करण्यास मदत करतात, जळजळ कमी करतात आणि पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात, त्यामुळे हृदयविकाराचा झटका, कोलेस्टेरॉल आणि रक्तदाब यांसारख्या आजारांचा धोका कमी होतो.

२) शेवग्यामधील व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, शरीराला संक्रमण आणि आजारांशी लढण्यास मदत करते, जे विशेषतः उन्हाळ्यात फायदेशीर ठरते

३) शेवग्यामध्ये कमी-कॅलरी असल्याने पोषण पुरवून वारंवार लागणारी भूक कमी करण्यास याची मदत होते. शिवाय यातील फायबर पचनास विलंब करण्यासाठी उपयुक्त ठरते.

४) शेवग्याच्या पानातील आयसोथिओसायनेट्स नावाचे नैसर्गिक अँटिऑक्सिडंट रक्तातील साखरेची पातळी स्थिर करतात. ऑक्सिडेटिव्ह नुकसानापासून संरक्षण करणाऱ्या पॉलिफेनॉलमुळे यकृताच्या पेशींच्या दुरुस्तीला ही भाजी गती देते व यकृतातील प्रथिनांची पातळी देखील वाढते.

शेवग्याचे सेवन करताना काय लक्षात ठेवावे? (Precautions Of Eating Moringa)

दिवसातून दोनदा तुमच्या आहारात शेवग्याचा समावेश करता येईल. प्रत्येक वेळी एक चमचा शेवग्याची पावडर किंवा एक मूठभर शेवग्याची पाने खाणे पुरेसे ठरते. या प्रमाणाच्या प्रत्येक सर्व्हिंगमध्ये साधारण ३५ कॅलरीज असतात त्यानुसार आपण आपल्या आहारातील अन्य घटकांची निवड करू शकता. शेवग्याची पाने ही सर्वसाधारणपणे सेवनासाठी सुरक्षित असली तरी, गर्भवती किंवा स्तनपान देणाऱ्या महिलांनी त्यांचा आहारात समावेश करण्यापूर्वी त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आपल्या आहारात शेवग्याची पाने कशी जोडावी? (How To Include Moringa)

स्मूदीज: केळी, बेरी आणि आंबा यांसारख्या फळांसह ताजी किंवा पावडर केलेली शेवग्याची पाने मिसळून पेय बनवू शकता.

पेस्टो: पास्ता सॉस, किंवा चटणीमध्ये शेवग्याची पाने वापरता येऊ शकतात.

हे ही वाचा<< २००० लोकांच्या निरीक्षणातून तज्ज्ञांनी मांडलं आजार टाळण्याचं सूत्र; २४ तासांचे व कामाचे विभाजन कसं करावं, पाहा वेळापत्रक

चहा: हर्बल चहा बनवण्यासाठी गरम पाण्यात शेवग्याची पाने भिजवा. अतिरिक्त चव आणि फायद्यांसाठी मध आणि लिंबू घाला.

सॅलेड: नेहमीच्या काकडी, टोमॅटोच्या सॅलेडमध्ये आपण शेवग्याची पाने घालू शकता. कोशिंबिरीत सुद्धा आपण कोथिंबीरसह बारीक चिरून शेवग्याची पाने घालू शकता.