कांदा हा भारतीय स्वयंपाकातील अविभाज्य घटक आहे. चव, सुगंध व पोषण मूल्य वाढवण्यासाठी तो विविध प्रकारे वापरला जातो. भाजी, रस्सा, आमटी, कोशिंबीर, पराठे, सलाड, चटण्या, सूप, ग्रेव्ही यांमध्ये कांदा हा प्राथमिक घटक मानला जातो. त्यातील नैसर्गिक सल्फरयुक्त संयुगे आणि अँटीऑक्सिडंट्स अन्नाची चव वाढवतातच; पण त्यामुळे शरीरालाही महत्त्वाचे आरोग्यदायी फायदे देतात. कच्चा, परतलेला, तळलेला किंवा उकडून वापरलेला कांदा प्रत्येक स्वरूपात उपयुक्त ठरतो.
कांदा सोलताना त्यावर काळे डाग किंवा पट्टे दिसल्याचे तुम्ही अनेकदा पाहिले असेल. ते नेमके बुरशीचे डाग आहेत का? असा कांदा पूर्णपणे फेकून द्यावा का? अशी शंका अनेकांना येते. या प्रश्नांची शास्त्रीय व सुरक्षित माहिती मिळविण्यासाठी दी इंडियन एक्स्प्रेसने आहारतज्ज्ञांशी चर्चा केली.
कांदा हा पोषक द्रव्यांनी समृद्ध असा भाजीपाला आहे. त्यात जीवनसत्त्वे, फायबर, फ्लेवोनॉइड्स (उदा. क्वेर्सेटीन) व सल्फरयुक्त अँटीऑक्सिडंट्स असतात. हे घटक शरीराला अँटीऑक्सिडंट्स, दाहशामक (anti-inflammatory) आणि हृदयसंवर्धक फायदे देतात, असे सल्लागार, आहारतज्ज्ञ व प्रमाणित डायबेटीज एज्युकेटर कनिका मल्होत्रा यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला सांगतात.
काळे डाग नेमके का दिसतात?
कांद्यावरील काळे डाग दिसायला जरी अप्रिय वाटत असले तरी ते तुमच्या अपेक्षेपेक्षा अधिक सामान्य आहेत आणि बहुतेक वेळा घाबरण्याचे कारण नसते. ही बाब योग्य हाताळणी आणि साठवणुकीशी अधिक संबंधित आहे, अशी माहिती नोंदणीकृत आहारतज्ज्ञ गरिमा गोयल यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला दिली.
गोयल यांच्या मते, कांद्यावर दिसणारे हे काळे पट्टे किंवा डाग साधारणत: अॅस्परजिलस नायगर (Aspergillus niger) या बुरशीमुळे तयार होतात. ही एक सर्वसाधारण मातीतील व हवेत वाढणारी बुरशी आहे आणि त्यासाठी कांद्यावर दिसणाऱ्या ‘ब्लॅक मोल्ड’ची प्रमुख कारणीभूत मानली जाते. त्यामुळे कांदा जर दबला गेला असेल किंवा ओलसर वातावरणात ठेवला गेला असेल, तर अशा बुरशीची वाढ अधिक होते.
असा कांदा फेकून द्यावा का?
गरिमा गोयल यांनी, “असा कांदा नेहमीच फेकून द्यायची गरज नसते,” असे मत व्यक्त केले आहे.
परंतु तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, Aspergillus niger या बुरशीने संक्रमित कांद्यात मायकोटॉक्सिन्स (उदा. ओक्राटॉक्सिन्स) तयार होण्याची शक्यता असते. हे मायकोटॉक्सिन्स मूत्रपिंडांच्या हानीसह इतर आरोग्यदायी परिणामांशी संबंधित असल्याचे कनिका मल्होत्रा सांगतात. त्यामुळे ज्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी आहे किंवा जे आरोग्यदृष्ट्या कमकुवत आहेत, त्यांनी असे कांदे टाळलेलेच बरे.
निरोगी व्यक्तींसाठी, जर बुरशी फक्त बाहेरील थरांवर मर्यादित असेल, तर ते थर काढून टाकता येतात. त्या भागाभोवतीचा काही भाग कापून टाकून, उरलेला कांदा स्वच्छ धुऊन चांगला शिजवून वापरता येतो.
पण जर बुरशी आत खोलवर शिरलेली असेल किंवा कांदा मऊ, ओलसर किंवा कुरकुरीतपणा गमावलेला असेल, तर अशा कांद्याचे मूल्य पौष्टिकता आणि सुरक्षितता अशा दोन्ही दृष्टींनी कमी होते आणि त्यामुळे तो संपूर्ण कांदा फेकणेच अधिक सुरक्षित ठरते.
कांदा वापण्यास योग्य आहे की, कसे ठरववे?
गरिमा गोयल सांगतात की—
बुरशी फक्त बाहेरील थरांवरच असेल, तर तो भाग सोलून काढा. आसपासचा काहीसा भाग कापून टाका आणि उरलेला कांदा स्वच्छ धुऊन वापरा. अशा वेळी कांदा साधारणपणे सुरक्षित असतो.
बुरशी कांद्याच्या आतपर्यंत शिरली असेल किंवा कांदा मऊ, ओलसर, चिकट किंवा कुजल्यासारखा झाला असेल, तर संपूर्ण कांदा फेकणेच सुरक्षित.
ज्यांना गंभीर श्वसनाच्या अॅलर्जी आहेत, त्यांनी तर अशा बुरशी लागलेल्या कांद्याला स्पर्शही करणे टाळावे. कारण- बुरशीचे कण श्वसनमार्गाला त्रास देऊ शकतात.
कनिका मल्होत्रा यांचे मत आहे की, काळे डाग दिसणारा कांदा नीट तपासून घेणे अत्यावश्यक आहे. खराब भाग काढून टाकणे गरजेचे आहे. कारण- बुरशीमुळे तयार होणारे विषारी घटक (फंगल टॉक्सिन्स) अन्नाची पौष्टिकता कमी करतात आणि आरोग्यावर विपरीत परिणाम करू शकतात.
कांद्यावर काळे डाग येऊ नयेत, यासाठी काय करावे?
कांदा ताजा व बुरशीमुक्त ठेवण्यासाठी योग्य साठवणूक अत्यंत महत्त्वाची आहे.
कांदे थंड, कोरड्या, हवेशीर जागी साठवावेत.
तापमान १५°C (५९°F) च्या आसपास असेल, तर बुरशीची वाढ कमी होते.
कांदे लवकर वापरा; खूप दिवस साठवू नका.
बटाट्यासारख्या ओलसरपणा निर्माण करणाऱ्या भाज्यांबरोबर कांदे साठवू नयेत.
शेवटी काळजी घेतली, तर वापर सुरक्षित
बहुतांश वेळा कांद्यावर दिसणारे काळे डाग म्हणजे फक्त पृष्ठभागावरील बुरशी असते. काळे डाग असलेले थर काढून, वास व टेक्श्चर तपासून, योग्य रीत्या स्वच्छ करून व कांदा शिजवून वापरणे सुरक्षित असते. गरिमा गोयल सांगतात, “वासात बदल दिसला किंवा कांदा चिकट वाटला, तर त्याचा वापर टाळणेच योग्य ठरते.”

