Common Causes of Blood in Cough: खोकताना रक्ताचा एखादा थेंब किंवा रेष दिसली तरी अनेकांच्या काळजाचा ठोका चुकतो. मनात भीतीचे काहूर माजते आणि आपण एखाद्या गंभीर आजाराला तर बळी पडलो नाही ना, असा विचार सतावू लागतो. मात्र, प्रत्येक वेळी खोकल्यातून येणारे रक्त जीवघेणे असतेच असे नाही. जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमधील श्वसनविकार तज्ज्ञ डॉ. निमिष शाह यांनी दि इंडियन एक्सप्रेसशी बोलताना याबाबत काही महत्त्वाचे सल्ले दिले आहेत.

नेमकी कारणे काय असू शकतात?

डॉ. शाह यांच्या मते, खोकल्यावाटे रक्ताच्या छटा दिसणे हे अनेकदा घशातील साध्या जळजळीमुळे किंवा संसर्गामुळे असू शकते.

  • श्वसनमार्गाचा संसर्ग: फॅरिन्जायटिस किंवा लॅरिन्जायटिस यांसारख्या वरच्या श्वसनमार्गाच्या संसर्गामुळे घशाला आणि वायुमार्गाला सूज येते, त्यामुळे सौम्य रक्तस्त्राव होऊ शकतो.
  • अत्यधिक खोकला: ॲलर्जी किंवा घशातील खवखवेमुळे सतत खोकला येत असल्यास, घशातील नाजूक रक्तवाहिन्या फुटून श्लेष्मासोबत (mucus) रक्त येऊ शकते.
  • इतर कारणे: काहीवेळा हे न्यूमोनियाचे सुरुवातीचे लक्षण असू शकते. तसेच, नाकाच्या मागील भागातून घशात उतरणारे रक्त किंवा तीव्र ॲसिड रिफ्लक्समुळे स्वरतंतूंना होणारी इजादेखील यासाठी कारणीभूत ठरू शकते.

‘२ चमचे’ रक्ताचा नियम: कधी सावध व्हावे?

सामान्यतः निरोगी व्यक्तीला सर्दी किंवा घसा खवखवण्यासोबत रक्ताची रेघ दिसल्यास प्राथमिक देखरेख करता येते. पण जेव्हा परिस्थिती खालीलप्रमाणे असते, तेव्हा ते धोक्याचे लक्षण मानले जाते.

Award Banner

१. सह-व्याधी (Comorbidities): जर तुम्हाला डायबिटीज, हाय ब्लड प्रेशर असेल किंवा तुम्ही रक्त पातळ करण्याची औषधे घेत असाल.

२. इतर लक्षणे: ताप कमी न होणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे.

३. रक्ताचे प्रमाण: डॉ. शाह स्पष्ट करतात की, श्लेष्माविरहित शुद्ध रक्त पडणे (ज्याला वैद्यकीय भाषेत ‘हेमोप्टिसिस’ म्हणतात) अत्यंत गंभीर आहे. जर रक्ताचे प्रमाण दोन मोठे चमचे (2 tablespoons) किंवा त्यापेक्षा जास्त असेल, तर त्वरित आपत्कालीन वैद्यकीय मदत घेणे आवश्यक आहे, कारण ते जीवघेणे ठरू शकते.

डॉक्टर कशा प्रकारे तपासणी करतात?

निदानाची सुरुवात क्लिनिकल तपासणीने होते. त्यानंतर संसर्ग तपासण्यासाठी ‘चेस्ट एक्स-रे’ आणि रक्ताच्या चाचण्या केल्या जातात. जर यातून स्पष्टता आली नाही, तर छातीचा, सायनसचा किंवा नाकाचा ‘सीटी स्कॅन’ करण्याचा सल्ला दिला जातो.

ब्रॉन्कोस्कोपी: निदानाच्या अंतिम टप्प्यात जर वरील सर्व चाचण्यांनंतरही रक्ताचे कारण समजले नाही, तर ‘ब्रॉन्कोस्कोपी’ केली जाते. यात एका छोट्या कॅमेऱ्याच्या मदतीने फुफ्फुसांच्या आतील भागाचे थेट निरीक्षण केले जाते. स्कॅनमध्ये न दिसणारे छोटे दोष यातून स्पष्ट होतात आणि गरज पडल्यास बायोप्सीसाठी नमुनेही घेतले जातात.

गंभीर आजाराची शक्यता नाकारता येत नाही

खोकल्यातून रक्त येण्याची घटना एकदाच घडली तरी त्याकडे दुर्लक्ष करू नये. भारतात क्षयरोग (TB) हे याचे एक मुख्य कारण असू शकते. ज्यांना पूर्वी टीबी झाला होता, त्यांच्या फुफ्फुसातील जुनी जखम किंवा पोकळी (cavity) फुटल्यामुळे रक्तस्त्राव होऊ शकतो.

याशिवाय, जर खोकला आणि रक्त येण्याचे प्रमाण अनेक महिन्यांपासून असेल, तर कर्करोगासारख्या (Cancer) गंभीर आजाराची शक्यता तपासावी लागते. अशा परिस्थितीत वेळेवर केलेली तपासणी आणि योग्य उपचार हेच रुग्णाचे प्राण वाचवू शकतात. घाबरून न जाता लक्षणांकडे बारीक लक्ष द्या आणि ‘२ चमचे’ पेक्षा जास्त रक्तस्त्राव झाल्यास विलंब न करता डॉक्टरांकडे धाव घ्या.