When Is The Best Time To Walk With Diabetes : अनेक जण चालण्यासाठी योग्य वेळ कोणती, असा विचार करत असतात. मॉर्निग वॉक (सकाळचे चालणे) की इव्हिनिंग वॉक (संध्याकाळचे चालणे) हा नेहमीच एक वादविवादाचा विषय राहिला आहे; ज्यावर फिटनेसप्रेमी, डॉक्टर आणि अगदी कुटुंबातील व्हॉट्सॲप ग्रुप्सवरील लोकांचीही वेगवेगळी आणि ठाम मते असतात. काही लोकांना वाटते की, सकाळची वेळ शांत, प्रसन्न आणि ऊर्जा देणारी असते, तर काहींच्या मते, दिवसभराच्या कामानंतर संध्याकाळी चालणे अधिक फायदेशीर ठरते. पण, प्रसिद्ध मधुमेहतज्ज्ञ डॉ. व्ही. मोहन यांच्या मते याचे सत्य बहुतेकांना वाटते त्यापेक्षा खूप सोपे आहे.

डॉ. मोहन (चेअरमन, डॉ. मोहन डायबेटीस स्पेशालिटीज सेंटर आणि पद्मश्री पुरस्कार विजेते) यांनी नुकतेच एक्सवर चालणे आणि रक्तशर्करा नियंत्रण याभोवती असलेला संभ्रम दूर केला आहे.

  • “सर्वांसाठी एकच नियम लागू होत नाही”

डॉ. मोहन म्हणाले, “सकाळचे चालणे की संध्याकाळचे चालणे, हा प्रश्न मला लोक वारंवार विचारतात. मला असे वाटते की, येथे सर्वांसाठी एकच नियम (One-size-fits-all) लागू होत नाही. काही लोक ‘मॉर्निंग पर्सन’ असतात (त्यांना सकाळी उठायला आवडते), तर काही लोक ‘इव्हनिंग पर्सन’ असतात.”

वरिष्ठ मधुमेहतज्ज्ञांच्या मते, दिवसभरात तुम्ही कोणत्याही वेळी शारीरिक हालचाल केली तरी शरीर त्याला चांगला प्रतिसाद देते. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या जीवनशैलीला साजेशी अशी वेळ निवडणे आणि त्यात सातत्य ठेवणे.

  • डॉ. मोहन सकाळच्या चालण्याला का प्राधान्य देतात?

दोन्ही पर्याय उत्तम असले तरी डॉ. मोहन यांनी त्यांची वैयक्तिक पसंती सकाळच्या चालण्याला दिली असून, त्यामागचे कारणही स्पष्ट केले आहे. ते म्हणाले, “सकाळी हवा ताजी असते, प्रदूषण कमी असते आणि रात्रीच्या चांगल्या झोपेमुळे तुमचे शरीरही टवटवीत असते.”

ते पुढे म्हणाले की, सकाळी आपले शरीर आणि मेंदू गोष्टी स्वीकारण्यासाठी सर्वांत जास्त तयार असतात. त्याच वेळी मेंदू आणि शरीराला सर्व ऊर्जा मिळणे आवश्यक असते. म्हणूनच मी सकाळच्या चालण्याला प्राधान्य देईन.

अनेक तज्ज्ञही या गोष्टीशी सहमत आहेत की, सकाळी लवकर चालल्याने संपूर्ण दिवसाची सुरुवात चांगली होते, मूड सुधारतो आणि दिवसभर निरोगी पर्याय निवडण्यास प्रोत्साहन मिळते.

  • संध्याकाळचे चालणेही फायदेशीर!

डॉ. मोहन यांनी हेरी स्पष्ट केले की, एखाद्या दिवशी सकाळचे चालणे चुकले, तर याचा अर्थ असा नाही की, तुम्ही चालणेच सोडून दिले पाहिजे. “जर तुम्हाला सकाळी चालणे शक्य झाले नाही, तर तुम्ही संध्याकाळीही चालू शकता,” असे ते म्हणाले.

संध्याकाळचे चालणे लोकांना दिवसभराचा थकवा दूर करण्यास, कामाचा ताण कमी करण्यास आणि झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत करते. ज्यांचे सकाळचे वेळापत्रक खूप व्यग्र असते किंवा जे रात्रीच्या पाळीत (Night shift) काम करतात, त्यांच्यासाठी संध्याकाळ हाच एकमेव व्यावहारिक पर्याय असू शकतो आणि ते पूर्णपणे योग्य आहे.

जेवणानंतर चालणे (Post-meal Walk)

डॉ. मोहन यांनी अधोरेखित केलेला सर्वांत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सध्या कमालीची लोकप्रिय ठरत असलेली एक नवीन पद्धत— ती म्हणजे जेवणानंतर चालणे. ते म्हणाले, “आता एक नवीन पद्धत समोर आली आहे, ती म्हणजे जेवणानंतर चालणे.”

डॉ. मोहन प्रत्येक जेवणानंतर १० ते १५ मिनिटे चालण्याचा सल्ला देतात. त्यांनी स्पष्ट केले, “जर तुम्ही नाश्त्यानंतर १०-१५ मिनिटे, दुपारच्या जेवणानंतर १०-१५ मिनिटे व रात्रीच्या जेवणानंतर १०-१५ मिनिटे चालू शकलात, तर तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी वेगळे चालण्याची अजिबात गरज नाही.”

  • जेवणानंतर चालण्याने ब्लड शुगर कशी नियंत्रित राहते?

जेवणानंतर चालणे प्रभावी ठरण्यामागचे कारण जेवणानंतर रक्तातील साखरेच्या पातळीत होणाऱ्या बदलांशी जोडलेले आहे. डॉ. मोहन यांनी सांगितले, “जेवण केल्यानंतर शरीरातील साखर वाढू लागते आणि नेमक्या त्याच वेळी जेव्हा तुम्ही चालायला सुरुवात करता, तेव्हा साखरेची ही वाढ नियंत्रित (Blunted) होते.”

ते पुढे म्हणाले की, जेवणानंतर चालण्यामुळे पचनासदेखील मदत होते. ही कृती तुमच्या पचनसंस्थेचीही काळजी घेईल आणि ती एक अत्यंत प्रभावी नवीन पद्धत समोर आली आहे.

मधुमेह (Diabetes) किंवा प्री-डायबेटीस (Prediabetes) असलेल्या लोकांसाठी ही छोटीशी सवय साखरेच्या रीडिंगमध्ये लक्षणीय फरक आणू शकते.

दररोज किती पावले चालणे आवश्यक?

तुम्ही चालण्यासाठी कोणतीही वेळ निवडली तरी दररोज शारीरिक हालचाल करणे अत्यंत आवश्यक आहे, असे डॉ. मोहन सांगतात. “महत्त्वाची गोष्ट म्हणजे चालणे,” असे ते म्हणाले.

ते दररोज किमान ७,००० पावले चालण्याचे उद्दिष्ट ठेवण्याचा सल्ला देतात. तुम्ही जितकी जास्त पावले चालाल तितके चांगले; परंतु किमान ७,००० पावले चालण्याचा सल्ला दिला जातो, असे डॉ. मोहन यांनी स्पष्ट केले.

या लक्ष्यापर्यंत नियमितपणे पोहोचल्यास मधुमेह नियंत्रणात राहण्यास आणि एकूणच आरोग्य सुधारण्यास मदत होते. व्हिडीओमध्ये त्यांनी सांगितले की, जर तुम्ही हे करू शकलात, तर त्यामुळे केवळ तुमचा मधुमेहच नियंत्रणात राहणार नाही, तर तुम्हाला उत्तम आरोग्यही लाभेल.