Benefits Of Eating Blueberry Daily: हिवाळ्यात आपली रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते आणि त्वचा कोरडी होते. अशावेळी शरीराला आतून बळकटी देणाऱ्या पदार्थांचा, फळांचा आहारात समावेश कऱणं आवश्यक आहे. ऋतूनुसार येणाऱ्या फळांचा आपल्या शरीरासाठी खूप फायदा असतो. ब्लूबेरी हे असंच एक फळ आहे. त्याच्या सुंदर निळ्या रंगामुळे, सौम्य आंबट गोड चवीमुळे आणि समृद्ध पोषक तत्वांमुळे त्याला सुपरफूड मानले जाते. त्याच्या सेवनाने आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांपासून आराम मिळतो. तर मग जाणून घेऊ ब्लूबेरी खाण्याचे फायदे आणि कोणाला याचा जास्त फायदा मिळू शकतो…

ब्लूबेरी खाण्याचे फायदे

१. रोगप्रतिकार शक्ती मजबूत करतात
ब्लूबेरीमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. ते शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. हिवाळ्यात किंवा बदलत्या ऋतूंमध्ये वारंवार आजारी पडणाऱ्यांसाठी ब्लूबेरी अत्यंत फायदेशीर मानल्या जातात. शिवाय ते शरीराला विषाणू आणि बॅक्टेरियाच्या संसर्गाशी लढण्यास मदत करतात.

२. मेंदू शांत आणि सक्रिय करते
ब्लूबेरीमध्ये आढळणारे अँथोसायनिन्स मेंदूच्या पेशींना सक्रिय ठेवण्यास मदत करतात. ब्लूबेरीचे नियमित सेवन स्मरणशक्ती सुधारण्यासाठी लक्ष केंद्रित करण्यास आणि मनाला तीक्ष्ण करण्यासाठी प्रभावी मानले जाते. शाळेत किंवा ऑफिसमध्ये जास्त वेळ एकाग्रता ठेवणे किंवा ताण कमी करण्यास ब्लूबेरी मदत करू शकते.

३. त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवते
हिवाळ्यात त्वचा कोरडी होणे ही एक सामान्य समस्या आहे. वारंवार क्रीम लावूनही त्वचा कोरडी दिसू शकते. अशा परिस्थितीत ब्लूबेरीचे सेवन त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स त्वचेच्या पेशींच्या दुरूस्तीला गती देतात. त्यामुळे नैसर्गिक चमक येते. यामुळे सुरकुत्या कमी होतात आणि त्वचा तरूण दिसते.

४. हृदय निरोगी ठेवते
हृदयाच्या आरोग्यासाठी ब्लूबेरी हा एक उत्तम पर्याय आहे. त्यातील फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स खराब कोलेस्ट्रॉल (एलडीएल) कमी करण्यास मदत करतात. यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि ह्रदयरोगाचा धोका कमी होतो. हिवाळ्याच्या काळात जेव्हा ह्रदयाच्या समस्या वाढतात तेव्हा ब्लूबेरीचे सेवन फायदेशीर असते.

५. वजन कमी करण्यास उपयुक्त
जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर ब्लूबेरीज तुमच्या आहारात नक्कीच समावेश करा. त्यात उच्च फायबर गुण असल्याने तुम्हाला जास्त काळ पोट भरल्यासारखे वाटण्यास मदत होते. यामुळे भूक कमी होते आणि कॅलरीजचे सेवन नियंत्रित करण्यास मदत होते.