Post Pregnancy Weight Gain: ‘हम आपके हैं कौन’ या चित्रपटातील अभिनेत्री रेणुका शहाणे हिने अलीकडेच एक वैयक्तिक अनुभव शेअर केला. या अनुभवातून बाळंतपणानंतर अनेक नवीन आईंना जाणवणाऱ्या शरीरसौंदर्याच्या दबावासारख्या कठोर आणि क्वचितच बोलल्या जाणाऱ्या वास्तवावर प्रकाश पडतो.
गौहर खानच्या ‘माँनोरंजन’ या पॉडकास्ट शोमध्ये मनमोकळ्या गप्पांमध्ये रेणुका शहाणे यांनी आई होण्याच्या भावनिक आणि शारीरिक अनुभवाबद्दल सांगितलं. २००२ मध्ये जेव्हा त्यांना मुलगा झाला, त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांना एक धक्कादायक कमेंट ऐकावी लागली होती. त्या म्हणाल्या, “माझं पहिलं बाळ २००२ मध्ये झालं. खूप आशा होत्या, पण सगळं सोपं नव्हतं. खूप काही न बोलताच राहून जातं.”
रेणुका शहाणे म्हणाल्या, “डॉक्टर आणि त्यांची पत्नी मला हॉस्पिटलमध्ये भेटायला आले, तेव्हा डॉक्टरांचं पहिलं वाक्य होतं – ‘आता वजन कमी करावं लागेल.’ मला ते खूप विचित्र वाटलं,” असं त्यांनी सांगितलं.
त्या पुढे म्हणाल्या, “माझं बाळ कालच झालं होतं आणि मी विचार करत होते – हा कसला दबाव आहे, हे मला समजतच नव्हतं. मला फार धक्का बसला. तेव्हा माझ्याबरोबर खूप काही एकदम घडत होतं, मी जणू प्रेक्षकासारखी सगळं बघत होते आणि तो (डॉक्टर) काहीही बोलतोय. पण, हाच समाजाचा दबाव असतो हे त्यातून कळलं.
आईवर केवळ चांगली आई होण्याचाच नव्हे तर पटकन पूर्वीसारखी होण्याचाही (फिट दिसण्याचा) तितकाच दबाव असतो – जणू काहीच झालं नाही अशा थाटात.”
डॉ. शैली शर्मा, गायनाकॉलॉजिस्ट (क्लाउडनाईन हॉस्पिटल, फरीदाबाद) यांनी indianexpress.com ला सांगितलं, “बाळंतपणानंतर लगेच वजनाबद्दल कमेंट ऐकणं खूप विचित्र वाटू शकतं. अशा प्रकारच्या गोष्टी एका नव्या आईसाठी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या खूप त्रासदायक ठरू शकतात.
बाळ झाल्यावर महत्त्वाच्या शारीरिक प्रक्रियेतून शरीर सावरत असतं. त्या वेळेस हार्मोन्स बदलत असतात, झोप पूर्ण होत नाही आणि आई आधीच थकलेली किंवा भावनिकदृष्ट्या कमकुवत वाटत असते. अशा वेळी वजन कमी करायचा सल्ला दिला तर तिच्या मनात अपराधीपणा, लाज किंवा चिंता निर्माण होऊ शकते.
हे तिच्या आत्मसन्मानावर परिणाम करू शकतं, ती स्तनपान करण्यास नाखूष होऊ शकते आणि काही वेळा पोस्टपार्टम डिप्रेशन (बाळंतपणानंतर येणारे नैराश्य) देखील वाढू शकतं.
आईला त्या काळात समजून घेणं, सहानुभूती आणि आधार गरजेचा असतो — दबाव किंवा टीका नव्हे.”
डॉ. शर्मा सांगतात की, बाळंतपणानंतरची रिकव्हरी (सावरण्याची प्रक्रिया) ही हळूहळू आणि प्रत्येक आईच्या गरजेनुसार असावी.
भावनिक दृष्टिकोनातून पाहिलं तर कुटुंब, मित्र-मैत्रिणी किंवा काउन्सेलरकडून मदत घेणं फायदेशीर ठरू शकतं.
स्वतःवर प्रेम करणं, आपलं शरीर स्वीकारणं आणि इतर नवीन मातांशी संवाद साधणं यामुळे मनावरील ताण कमी होतो.
डॉ. म्हणतात, “शारीरिकदृष्ट्या पाहिलं तर नवीन आईने पुरेशी विश्रांती घ्यावी, संतुलित आहार घ्यावा, पाणी भरपूर प्यावं आणि हळूहळू चालणं किंवा बाळंतपणानंतरचा सौम्य योगाभ्यास करावा.
वजनात बदल हळूहळू नैसर्गिकरित्या व्हावा, डाएट किंवा जोरदार व्यायाम करून नाही.
या काळात बाळासोबत नातं मजबूत करणं, स्वतःचं मन शांत ठेवणं आणि शरीर सावरणं हेच खरे महत्त्वाचे आहे.”