मुंबई : वाढत्या वयासोबत स्मरणशक्ती कमी होणे, विचारांची गती मंदावणे आणि निर्णयक्षमता घटणे या समस्या सामान्य मानल्या जातात. मात्र याच प्रक्रियेतून पुढे जाऊन डिमेन्शिया (स्मृतिभ्रंश) सारखा गंभीर आजार होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर एक दिलासादायक बातमी समोर आली असून, मेंदूची नियमित व शास्त्रीय पद्धतीने केलेली ट्रेनिंग डिमेन्शियाचा धोका लक्षणीयरीत्या कमी करू शकते असा निष्कर्ष एका दीर्घकालीन अभ्यासातून काढण्यात आला आहे.
या अभ्यासात ६५ वर्षे आणि त्यापुढील वयाच्या सुमारे २,८०० नागरिकांचा समावेश होता. तब्बल २० वर्षे या लोकांचा अभ्यास करण्यात आला. सहभागी व्यक्तींना वेगवेगळ्या गटांत विभागून त्यांना विविध प्रकारच्या मेंदूवर्धक प्रशिक्षण पद्धती देण्यात आल्या. यामध्ये स्मरणशक्ती वाढवणारे व्यायाम, तर्कशक्तीवर आधारित प्रशिक्षण आणि माहिती प्रक्रिया करण्याच्या गतीवर (प्रोसेसिंग स्पीड) आधारित मेंदू प्रशिक्षणाचा समावेश होता.
अभ्यासात विशेष बाब अशी आढळली की, माहिती प्रक्रिया करण्याची गती वाढवणाऱ्या मेंदू प्रशिक्षणामुळे डिमेन्शियाचा धोका सुमारे २५ टक्क्यांनी कमी झाला. इतर प्रकारच्या मेंदू प्रशिक्षणामुळे तात्पुरते फायदे दिसून आले असले तरी दीर्घकालीन परिणाम या ‘स्पीड ट्रेनिंग’मध्येच स्पष्टपणे दिसून आले.संशोधकांच्या मते, या प्रशिक्षणामुळे मेंदू अधिक जलद निर्णय घेण्यास सक्षम होतो, प्रतिक्रिया वेळ सुधारते आणि मेंदूतील मज्जासंस्थांमधील संपर्क अधिक प्रभावी राहतो. यामुळे वयोमानानुसार होणारी मेंदूची झीज मंदावते आणि स्मरणशक्ती टिकून राहण्यास मदत होते.
महत्त्वाची बाब म्हणजे, हे प्रशिक्षण केवळ करमणुकीसाठी असलेल्या साध्या मेंदू गेम्ससारखे नव्हते. हे वैज्ञानिक पद्धतीने तयार केलेले, विशिष्ट उद्दिष्ट असलेले प्रशिक्षण होते. त्यामुळे सर्वच मोबाईल अॅप्स किंवा गेम्स डिमेन्शिया रोखू शकतात, असा दावा करता येणार नाही असे तज्ज्ञ स्पष्ट करतात. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, सध्या जगभरात सुमारे ५७ दशलक्ष लोक डिमेन्शियाने प्रभावित आहेत.
भारतातही वृद्धांची संख्या वाढत असल्याने हा प्रश्न भविष्यात अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे औषधोपचारांसोबतच जीवनशैलीत बदल, शारीरिक व्यायाम, सामाजिक सक्रियता आणि मेंदू सक्रिय ठेवणाऱ्या सवयी यांचे महत्त्व अधोरेखित होत आहे.या अभ्यासामुळे एक गोष्ट स्पष्ट होते की, मेंदू हा देखील स्नायूसारखा असून जितका वापर, तितका तो अधिक सक्षम. वाचन, कोडी सोडवणे, नवीन कौशल्ये शिकणे आणि शास्त्रीय पद्धतीचे मेंदू प्रशिक्षण हे डिमेन्शियाविरोधातील प्रभावी शस्त्र ठरू शकते. वृद्धत्व आरोग्यदायी आणि आत्मनिर्भर राहावे यासाठी ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे.

