Diabetic Blood Donation : मधुमेह (डायबिटीज) असला की रक्तदान करता येत नाही, असा अनेकांचा समज असतो. परंतु, हा केवळ एक गैरसमज आहे. यावर इंडियन एक्सप्रेसशी बोलताना दिल्लीतील कैलाश दीपक हॉस्पिटलचे कन्सल्टंट एंडोक्रिनोलॉजिस्ट डॉ. आशिष सैनी यांनी सविस्तर माहिती दिली आहे. डॉ. आशिष सैनी यांच्या मते, “मधुमेह असल्यामुळे कोणतीही व्यक्ती रक्तदान करण्यासाठी आपोआप अपात्र ठरत नाही. उलट, मधुमेहासह जगणारे अनेक लोक सुरक्षितपणे आणि नियमितपणे रक्तदान करू शकतात.

मधुमेही व्यक्ती रक्तदान करू शकते की नाही, हे कशावर ठरते?

यामध्ये महत्त्वाची गोष्ट केवळ मधुमेह असणे ही नसून, तो किती चांगल्या प्रकारे नियंत्रित केला आहे ही आहे. डॉ. सैनी सांगतात, “जर रक्तातील साखरेची पातळी स्थिर असेल आणि संबंधित व्यक्ती रक्तदानाचे इतर सर्व सामान्य निकष पूर्ण करत असेल, तर रक्तदान करणे शक्य आहे.”

रक्तदान करू इच्छित असलेल्या मधुमेही व्यक्तीची ब्लड शुगर पातळी बऱ्यापैकी स्थिर असावी आणि रक्तदानाच्या दिवशी त्यांना शारीरिकदृष्ट्या निरोगी वाटणे आवश्यक आहे. याशिवाय, इतर सामान्य रक्तदात्यांप्रमाणेच वय, वजन, हिमोग्लोबिनची पातळी आणि एकूण आरोग्य यांसारख्या सर्व अटी त्यांनी पूर्ण केल्या पाहिजेत.

पात्रता ही प्रामुख्याने रक्तातील साखरेच्या नियंत्रणावर आणि मधुमेहामुळे शरीरात इतर कोणती गुंतागुंत निर्माण झाली आहे का, यावर अवलंबून असते.

टाईप १ आणि टाईप २ मधुमेहाचा फरक पडतो का?

तज्ज्ञांच्या मते, तसा काही फरक पडत नाही. टाईप १ आणि टाईप २ मधुमेह हे दोन्ही वेगळे प्रकार असले, तरी रक्तदानाचा निर्णय घेताना हा प्रकार फारसा महत्त्वाचा ठरत नाही. डॉ. सैनी स्पष्ट करतात, “थोडक्यात सांगायचे तर, एखाद्या व्यक्तीची पात्रता केवळ त्याला टाईप १ आहे की टाईप २ मधुमेह आहे यावरून ठरत नाही, तर त्याच्या एकूण आरोग्य स्थितीवरून ठरते.”

इन्सुलिन घेणारे रुग्ण रक्तदान करू शकतात का?

इन्सुलिन घेणारे लोक रक्तदान करू शकत नाहीत, हा आणखी एक मोठा गैरसमज आहे. डॉ. सैनी म्हणतात, इन्सुलिनच्या वापरामुळे व्यक्ती रक्तदानासाठी थेट अपात्र ठरते हा समज चुकीचा आहे. अनेक प्रकरणांमध्ये, इन्सुलिन घेणारे लोक देखील रक्तदान करू शकतात. जर रक्तातील साखरेची पातळी स्थिर असेल आणि आरोग्याची इतर कोणतीही गंभीर समस्या नसेल, तर केवळ इन्सुलिन थेरपी सुरू आहे म्हणून रक्तदानास मनाई केली जात नाही.

मधुमेही व्यक्तीने रक्तदान कधी टाळावे?

जर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित नसेल, तब्येत बरी नसेल, व्यक्ती एखाद्या आजारातून बरी होत असेल किंवा तिला मधुमेहामुळे किडनी, डोळे, नसा किंवा हृदयाशी संबंधित गंभीर समस्या उद्भवल्या असतील, तर डॉक्टरांकडून रक्तदान न करण्याचा किंवा ते पुढे ढकलण्याचा सल्ला दिला जातो. ज्यांना वारंवार ‘लो शुगर’ (हायपोग्लायसेमिया) चा त्रास होतो किंवा शरीरात इन्फेक्शन आहे, त्यांनी तब्येत सुधारेपर्यंत थांबणे गरजेचे आहे.

मधुमेही रुग्णांनी कोणती काळजी घ्यावी?

ज्यांचा मधुमेह चांगला नियंत्रित आहे, अशा लोकांसाठी रक्तदान केल्याने ब्लड शुगरवर कोणताही गंभीर परिणाम होत नाही आणि ते पूर्णपणे सुरक्षित मानले जाते.

रक्तदान करण्यापूर्वी रुग्णांनी सकस आहार घ्यावा, भरपूर पाणी प्यावे (हायड्रेटेड राहावे) आणि साखरेची पातळी योग्य मर्यादेत असल्याची खात्री करावी. डॉक्टरांनी वेगळा सल्ला दिला नसल्यास आपल्या मधुमेहाच्या औषधांचे डोस नियमितपणे सुरू ठेवावेत.

रक्तदानानंतर भरपूर द्रवपदार्थ घ्यावेत, उर्वरित दिवस कष्टाची किंवा जड कामे करणे टाळावे आणि नेहमीप्रमाणे रक्तातील साखरेची पातळी तपासत राहावे. रक्तदानानंतर काही जणांना तात्पुरता थकवा किंवा चक्कर येऊ शकते, जी सामान्य दात्यांमध्येही दिसून येते. मात्र, त्रास जास्त काळ राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा