Silent Heart Attack Risk Signs: कोविडच्या आजारानंतर हृदयविकारांचे प्रमाण अधिक वाढले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने तरुणांच्या मृत्यूंची नोंद सुद्धा झालेली आहे. देशभरात नोंदवल्या जाणार्या अशा प्रकरणांची वारंवारता आणि संख्येच्या आधारावर अनेकांना असे वाटू शकते की हृदयविकार ही अचानक उदभवणारी परिस्थिती आहे. यात काही अंशी तथ्य असले तरी मूक हृदयविकाराची शक्यता पूर्वलक्षणांमधून ओळखली जाऊ शकते. रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे आल्याने जेव्हा तणावपूर्ण स्थितीत वाहिन्यांवरील दबाव वाढतो तेव्हा हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. अलीकडेच जामनगरमध्ये ४१ वर्षीय हृदयरोग तज्ज्ञाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते आणि आता यानंतर नव्याने हार्ट अटॅक (विशेषतः सायलंट हार्ट अटॅक) चर्चेत आला आहे. आज आपण या मूक हृदय रोगांचे निदान कसे करावे? ईसीजी पुरेसे आहे का? आज आपण, डॉ संजीव गेरा, संचालक आणि प्रमुख, हृदयरोग, फोर्टिस नोएडा यांच्या मार्गदर्शनातून आपण संबंधित प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत. मुख्य मुद्दा जो लक्षात घ्यायला हवा तो असा की, मूक (सायलंट) हार्ट अटॅकमध्ये स्पष्ट लक्षणे दिसत नाहीत. म्हणजेच दिसणारी लक्षणे ही अन्य आजारांशी संलग्न असू शकतात पण याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. हात, मान, जबडा आणि छातीत वेदना, चक्कर येणे, चिंता आणि घाम येणे या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. याशिवाय हृदय विकाराच्या रुग्णांमध्ये बर्याचदा असे दिसते की यांना जठरासंबंधी अस्वस्थता जाणवू शकते. आपण लक्षात घ्यायला हवे कोणत्याही प्रकारच्या हृदयविकाराच्या झटक्यात ह्दय स्नायूंना होणारे नुकसान सारखेच असते. अमेरिकन मेडिकल असोसिएशनच्या जर्नलमध्ये १० नोव्हेंबर २०१५ रोजी झालेल्या एका अभ्यासात ४५ ते ८४ वयोगटातील जवळपास २,००० लोकांचा अभ्यास करण्यात आला, जे चाचणीच्या वेळी हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीच्या आजारांपासून मुक्त होते. मागील एका दशकात, आठ टक्के मायोकार्डियल स्कार्सच्या रुग्णांना आलेला हृदयविकाराचा झटका हा याचा पुरावा आहे. यापैकी सुमारे ८० टक्के लोकांना त्यांच्या स्थितीबद्दल माहिती नव्हती. हृदयरोग शोधण्यासाठी ईसीजी हा एकमेव मार्ग आहे आणि ते सामान्य असल्यास, हृदय ठणठणीत आहे असे म्हणायला हरकत नाही असे आपल्याकडे समजले जाते. ईसीजी केवळ जुन्या हृदयविकाराचे निदान करू शकते म्हणजेच हृदयविकाराचा झटका किंवा चाचणीच्या क्षणी रुग्णाला हृदयविकाराचा झटका आला असेल तर तेवढेच निदान होऊ शकते. त्यामुळे, आपण साध्या ईसीजीने मूक हृदयरोगाचे निदान करू शकत नाही. मूक हृदयरोग ओळखण्यासाठी ECG च्या शिवाय काही चाचण्यांची शिफारस केली जाते. खात्री करण्यासाठी, Troponin T किंवा Trop T चाचणी घ्या. हे रक्तातील ट्रोपोनिन T किंवा ट्रोपोनिन I प्रथिनांचे स्तर मोजते. जेव्हा हृदयाच्या स्नायूंना हानी पोहोचते तेव्हा ही प्रथिने सोडली जातात, सामान्यतः आक्रमणानंतर. हृदयाला जितके जास्त नुकसान होईल तितके रक्तातील ट्रोपोनिन टीचे प्रमाण जास्त असते. हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा कसा शोधायचा? (How To Spot Heart Veins Problem) महत्त्वाच्या चाचण्यांपैकी एक म्हणजे इकोकार्डियोग्राफी, जी हृदयाचा १० -मिनिटांचा अल्ट्रासाऊंड आहे. ही एक सोपी ओपीडी प्रक्रिया आहे. दुसरी प्रक्रिया म्हणजे ट्रेडमिल चाचणी. या दोन्ही चाचण्यांमध्ये काही असामान्यता दिसून आल्यास, हृदयरोगतज्ज्ञ अतिरिक्त चाचण्यांची शिफारस करतात. ट्रेडमिल चाचणी किंवा टीएमटी ही एक सोपी चाचणी आहे जिथे रुग्ण त्याच्या व्यायाम क्षमतेनुसार ट्रेडमिल मशीनवर चालतो. व्यायामादरम्यान ईसीजीमध्ये काही बदल झाल्याचे दिसल्यास समस्या ओळखता येऊ शकते. एक लक्षात घ्या, TMT चे निकाल सकारात्मक किंवा नकारात्मक असले तरी काही १० ते २० टक्के प्रकारांमध्ये चुकीचे सुद्धा असू शकतात म्हणूनच हृदयरोगतज्ज्ञ फक्त टीएमटीवर अवलंबून नसतात. तिसरी सर्वात महत्वाची चाचणी कॅल्शियम स्कोअरिंग आहे, जी धमन्यांमध्ये प्लेक्सचे प्रमाण शोधते. स्कोअर १०० पेक्षा जास्त असल्यास, याचा अर्थ रुग्णाला गंभीर हृदयविकाराचा धोका आहे. परंतु या चाचण्यांबद्दलचा चांगला भाग म्हणजे निदान होताच लवकरात लवकर उपचार सुरु केले जाऊ शकतात. हेल्दी हृदयासाठी कोणत्या चाचण्या करायला हव्यात? (Healthy Heart Tests) दरवर्षी हृदयाच्या काही सोप्या चाचण्या करायला हव्यात. लिपिड प्रोफाइल, एचएससीआरपी (उच्च संवेदनशीलता सी-रिअॅक्टिव्ह प्रोटीन) चाचणी, होमोसिस्टीन पातळी दर्शवणारी चाचणी, लिपोप्रोटीन पातळी आणि HbA1c चाचणी या चाचण्यांची तज्ज्ञ शिफारस करतात. प्री-डायबिटीज अवस्थेत असलेल्यांना मूक हृदयविकाराचा धोका असतो. कार्डिओलॉजिस्टच्या सल्ल्यानुसार आपण अन्य चाचण्या करून घेऊ शकता. हे ही वाचा<< Health Special: कॅल्शियम, लोह व अन्य पोषकसत्वांचे पूर्ण फायदे मिळण्यासाठी कोणते पदार्थ आहारात जोडावे? सेवनाचे नियम काय? सायलंट हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कोणाला आहे? (Who Has More Threat Of Silent Heart Attack) मधुमेह, स्त्रिया आणि उच्च वेदना असलेल्या कोणत्याही व्यक्तीला हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. काहींना ह्रदयाचा इस्केमिया असतो, जेथे कोरोनरी धमनी अचानक बंद होते परंतु ७० ते ९० टक्के प्लेक असूनही रक्त वाहत असते. या परिस्थितीत, तुम्हाला कोणतीही वेदना जाणवत नाही. चालताना अस्वस्थता किंवा तत्सम लक्षणे दिसू शकतात, परंतु तुम्ही थांबल्यावर आणि विश्रांती घेतल्यावर ही लक्षणे कमी होऊ शकतात पण या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये.