मुंबई : जगभरातील महिलांमध्ये आढळणाऱ्या गर्भाशय मुखाच्या कर्करोगाबाबत दिलासा देणारी पण तितकीच चिंताजनक बाब समोर आली आहे. एका नव्या अभ्यासानुसार उच्च उत्पन्न असलेले देश २०४८ पर्यंत या कर्करोगाचे जवळपास उच्चाटन करण्यात यशस्वी होऊ शकतात, मात्र कमी व मध्यम उत्पन्न देशांमध्ये याविरोधातील लढा अद्यापही संथ गतीनेच पुढे जात आहे.
गर्भाशय मुखाचा कर्करोग हा महिलांमध्ये आढळणारा चौथ्या क्रमांकाचा कर्करोग आहे. २०२२ मधील आकडेवारीनुसार, जगभरात सुमारे ६.६ लाख नवीन रुग्णांची नोंद झाली तर ३.५ लाख महिलांचा या आजारामुळे मृत्यू झाला. विशेष म्हणजे, या मृत्यूंपैकी सुमारे ९४ टक्के मृत्यू हे कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये झाले, ही बाब जागतिक आरोग्य व्यवस्थेतील असमानता अधोरेखित करणारी आहे.
अभ्यासानुसार, योग्य प्रमाणात एचपीव्ही (ह्युमन पॅपिलोमा व्हायरस) लसीकरण, वेळेवर तपासणी आणि प्रभावी उपचार या तीन गोष्टींचा एकत्रित वापर केल्यास गर्भाशय मुखाचा कर्करोग पूर्णपणे नियंत्रणात आणता येऊ शकतो. याच पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने ‘९०-७०-९०’ ही रणनीती मांडली आहे. त्यानुसार १५ वर्षांपूर्वी ९० टक्के मुलींना एचपीव्ही लस देणे, ३५ आणि ४५ व्या वर्षी ७० टक्के महिलांची तपासणी करणे आणि निदान झालेल्या ९० टक्के रुग्णांना उपचार उपलब्ध करून देणे हे उद्दिष्ट आहे.
उच्च उत्पन्न देशांमध्ये ही उद्दिष्टे मोठ्या प्रमाणात साध्य होत असल्याने तेथील परिस्थिती वेगाने सुधारत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ठरवलेल्या निकषांनुसार, एखाद्या देशात दर एक लाख महिलांमागे चारपेक्षा कमी रुग्ण आढळल्यास त्या कर्करोगाचे सार्वजनिक आरोग्य समस्येतून उच्चाटन झाले असे मानले जाते.
सध्याच्या गतीने प्रगती सुरू राहिल्यास अनेक विकसित देश २०४८ पर्यंत हा टप्पा गाठतील असे या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.मात्र याउलट कमी व मध्यम उत्पन्न देशांमध्ये परिस्थिती अजूनही गंभीर आहे. सध्याच्या धोरणांमध्ये बदल न झाल्यास या देशांमध्ये गर्भाशय मुखाच्या कर्करोगाच्या प्रमाणात केवळ २३ टक्क्यांची घट अपेक्षित आहे. यामागे एचपीव्ही लसीकरणाचा अभाव, तपासणीसाठी अपुरी सुविधा, आरोग्य यंत्रणेतील कमतरता आणि सामाजिक-आर्थिक अडचणी ही प्रमुख कारणे असल्याचे तज्ञांचे मत आहे.
तपासणीच्या बाबतीतही मोठी तफावत दिसून येते. उच्च उत्पन्न देशांमध्ये सुमारे 84 टक्के महिलांनी आयुष्यात किमान एकदा तपासणी करून घेतली आहे, तर कमी उत्पन्न देशांमध्ये हे प्रमाण केवळ ९ ते ११ टक्क्यांपर्यंत मर्यादित आहे. यामुळेच या देशांमध्ये आजार उशिरा लक्षात येतो आणि मृत्यूदर वाढतो.गर्भाशय मुखाच्या कर्करोगाच्या सुमारे ९९ टक्के प्रकरणांमागे एचपीव्ही संसर्ग कारणीभूत असल्याने लसीकरणाला अत्यंत महत्त्व आहे. तरीही अनेक गरीब देशांमध्ये लसीची उपलब्धता, किंमत आणि जागरूकतेचा अभाव ही मोठी अडचण ठरत आहे.
तज्ज्ञांच्या मते, स्वस्त लसी उपलब्ध करणे, मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम राबवणे, तपासणी सुविधा वाढवणे आणि प्राथमिक आरोग्य व्यवस्थेला बळकट करणे या उपाययोजनांमुळे ही दरी कमी करता येऊ शकते. तसेच मुलांनाही एचपीव्ही लसीकरणात समाविष्ट करण्याचा विचार काही देश करत आहेत. एकंदरीत, गर्भाशय मुखाचा कर्करोग हा टाळता येण्याजोगा आजार असला तरी जागतिक स्तरावर आरोग्य सेवांमधील विषमता ही मोठी अडचण ठरत आहे. विकसित देश २०४८ पर्यंत या आजारावर नियंत्रण मिळवतील मात्र विकसनशील देशांसाठी ही लढाई अजूनही दीर्घकालीन आणि आव्हानात्मक ठरणार आहे.
