आपली स्मृतिभ्रंशाने आजारी असलेली पत्नी, पती किंवा आपले वडील यांची काळजी घरामध्ये सर्वसाधारणपणे आपणच घेतो. स्मृतिभ्रंशाच्या रुग्णांची काळजी घेणारे बहुतेकदा त्यांचे नातेवाईक म्हणजे त्यांचा जोडीदार किंवा मुलगा, मुलगी, सून, जावई असे असतात. काही घरांमध्ये स्मृतिभ्रंशाच्या रुग्णांची काळजी घेण्यासाठी कोणी काळजीवाहक नेमला जातो.

जेव्हा आपल्या घरातील वृद्ध व्यक्तीच्या वागण्यात होणारे बदल, कमी होणाऱ्या बौद्धिक क्षमता या गोष्टी नातेवाईकांच्या लक्षात येतात तेव्हाच डॉक्टरांची मदत घेतली जाते आणि विविध तपासण्यानंतर स्मृतिभ्रंशाचे निदान होते, हे आपण मागील काही लेखांमध्ये पाहिले. याचा अर्थ स्मृतिभ्रंशाच्या रुग्णांची काळजी घेणाऱ्या नातेवाईकांची भूमिका, रोगाचे निदान आणि त्यांचे उपचार यामध्ये महत्त्वाची ठरते. त्याचबरोबर ही रुग्णांची काळजी घेताना या काळजीवाहकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते आणि खूप मोठा भार बराच काळपर्यंत सोसावा लागतो.

हेही वाचा…चालण्याचा व्यायाम करताना हृदयाची धडधड वाढणे चांगले की वाईट? काय सांगतात तज्ज्ञ पाहा

“ डॉक्टर, काय सांगू तुम्हाला? गेल्यावर्षी शेवटी मी नोकरी सोडली. गेली तीन वर्षे हळूहळू आईमध्ये होणारे बदल मला समजत होते. एखाद्या वेळेला स्वयंपाक करायलाच विसरायची. मी दमून भागून घरी आलो की घरात जेवायलाच काही नसायचे. एखादे वेळेला घरातून निघून जायची आणि आता गेल्या काही महिन्यांपासून तर तिला कसलेच भान राहिले नाही. गेली तीन वर्षे माझी खूप धावपळीची, कष्टाची आणि काळजीची गेली. आईची काळजी एकट्याने कशी घ्यायची, हा खूप मोठा प्रश्न होता. भाऊ खूप दूर राहतो, तो काहीच जबाबदारी घेऊ शकत नाही. त्यामुळे असे वाटू लागले आहे की मी एकटा हा भार सोसतो आहे. शेवटी सतत रजा, काही वेळेला महिना महिना कामावर न जाऊ शकणे या सगळ्याने नोकरीवरचे लोक तर कंटाळलेच, परंतु मीही कंटाळलो आणि शेवटी राजीनामा दिला. किती वर्ष असं चालणार.

कोणाला माहित?” राजेश मोठ्या कळवळीने डॉक्टरांना सांगत होता. राजेशच्या आईचा इलाज करणारे सायकियाट्रिस्ट आपल्या रुग्णांच्या नातेवाईकांची दर बुधवारी एक मीटिंग घेत असत. या मीटिंगमध्ये या सगळ्या नातेवाईकांना आपल्या रुग्णांची काळजी घेताना काय अडचणी येतात याची ते चर्चा करत. राजेश आपली व्यथा व्यक्त केल्यानंतर एक बाई उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या, “माझे पती गेली सहा वर्षे आजारी आहेत. दोन्ही मुले परदेशात असतात. सुरुवातीची काही वर्षे विशेष जाणवले नाही. परंतु गेली दोन वर्षे हळूहळू त्यांची खालावत जाणारी स्थिती पाहून मलाच आजारी पडल्यासारखे वाटते आहे. एक विचित्र निराशा मनात दाटली आहे. आपल्या अशा जगण्याला अर्थ काय? असे आता वाटू लागले आहे. इतकी वर्ष सुखाने संसार केला, पण आता शेवटच्या काही वर्षांमध्ये मात्र मी एकटी पडले, ही भावना सतत मनामध्ये येते. खूप कंटाळले हो आता मी!”

हेही वाचा…आलं, हळदीसह ‘हे’ ४ मसाले एकत्रित पाण्यात मिसळून प्यायल्याने फॅट्स झटपट वितळतील? डाएटिशियनने सांगितले फायदे तोटे

मीटिंगमध्ये आठ ते दहा नातेवाईक आपल्या डिमेन्शियाच्या पेशंटची काळजी घेणारे होते. प्रत्येकाला आपली कहाणी सांगायची होती आणि आपल्या मनाची व्यथा देखील. आपल्या पेशंटची आपापल्या क्षमतेप्रमाणे काळजी घेणारे हे सगळेजण. प्रत्येकाच्या मनात वेगवेगळ्या भावना होत्या, अपराधीपणाची भावना होती, कारण आपल्याच रुग्णाची काळजी घेणे कठीण होते आहे हे मोकळेपणाने सांगावेसे वाटत नव्हते. पण दुसरीकडे मनावर जाणवणारा भार हलका करण्याचे हे ठिकाण आहे हेही जाणवत होते. एका बाजूला मनामध्ये जबाबदारीची जाणीव होती, तर दुसरीकडे कधी एकदा सुटका होईल असा भाव होता. काळजीवाहकांना जाणवणारा हा स्वाभाविक भाव असतो. हा जो भार त्यांना जाणवतो त्याची वेगळी वेगळी कारणे असतात. एक म्हणजे या रुग्णाची काळजी एक दोन वर्षे नाही तर कितीतरी वर्षांपर्यंत घ्यावी लागते. या पेशंटच्या अनेक प्रकारच्या वर्तणुकीच्या समस्या असतात. रागावणे, आक्रमक बनणे, न झोपणे, संशय वाटणे, भीती वाटणे, अंगावर धावून येणे, घरातून निघून जाणे, समाजामध्ये अयोग्य वर्तन, लैंगिक वर्तणुकीवर कधी कधी नियंत्रण न राहणे अशा प्रकारच्या विविध समस्यांना नातेवाईकांना सामोरे जावे लागते.

प्रत्येक वेळेस आरोग्यसेवा जवळ उपलब्ध असतील असे नाही. तसेच प्रत्येक वेळेस आरोग्य सेवेपर्यंत पोहोचून सुद्धा पुरेशी सेवा मिळेल अशी खात्री नसते. आपले वडील, आपली पत्नी, आपल्या सासूबाई यांचे झालेले निदान, त्यांची हळूहळू बिघडत जाणारी स्थिती, ज्या व्यक्तीला आपण पूर्ण क्षमतेने काम करताना पाहिले आहे, जिच्याबरोबर आनंदाचे अनेक क्षण व्यतीत केले आहेत. अशा व्यक्तीची हळूहळू प्रकृती खालावत जाताना बघणे हे खूप मानसिक त्रास देणारे असते. त्याचप्रमाणे वर्तणुकीच्या समस्या तीव्र असतील तर सतत डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागते. आपली नोकरी व्यवसाय, कौटुंबिक जबाबदाऱ्या, सामाजिक जबाबदाऱ्या उदाहरणार्थ लग्नकार्य, मित्रमंडळींना भेटणे इत्यादी पार पाडताना आपल्या रुग्णाकडेही लक्ष द्यावे लागते.

हेही वाचा…Healthy sleep: तुम्हीही रात्री १ वाजता झोपता का? डॉक्टरांनी सांगितले गंभीर परिणाम

एवढेच नाही तर त्यामध्ये अनेक तास व्यतीत करावे लागतात. रुग्णाची काळजी घेणे हे म्हणूनच सोपे नाही. तसेच उपचारांचा खर्च, उपचार उपलब्ध आहेत अशा ठिकाणी जाण्या-येण्याचा खर्च प्रत्येकाला परवडतो असे नाही. भावनिक भार असह्य झाला की सतत चिंता मनामध्ये निर्माण होऊ शकते किंवा मन उदास बनू शकते. झोपेवर, भुकेवर परिणाम होऊ शकतो, मनात निराशा दाटून येते आणि अतिचिंता आणि उदासपणा असे विकार काळजीवाहकांमध्ये निर्माण होऊ शकतात. अनेक शास्त्रीय अभ्यासामध्ये हे सिद्ध झाले आहे की काळजीवाहकांना डिमेन्शियाच्या रुग्णांची काळजी घेण्याचा खूप भार जाणवतो आणि
त्यामुळे विविध मानसिक विकारही होऊ शकतात. काळजीवाहकांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे हेही त्यामुळे तितकेच आवश्यक असते.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे रोगाचे निदान झाल्यानंतर त्याविषयी पुरेशी माहिती नातेवाईकांना किंवा रुग्णाची जे काळजी घेणार आहेत अशांना देणे गरजेचे असते. त्यांच्या मनातील अनेक प्रश्नांना आणि शंकांना समाधानकारक उत्तरे देण्याचा प्रयत्नही डॉक्टरांनी करावा लागतो. त्याचप्रमाणे वेळोवेळी त्यांना जाणवणाऱ्या समस्या मनात निर्माण होणाऱ्या शंका यांचे निरसन करण्याची व्यवस्था उपलब्ध केली तर त्यांच्यावरचा भार कमी व्हायला मदत होते. ठराविक काळानंतर गटागटांमध्ये काळजीवाहकांबरोबर चर्चा करण्यातून त्यांच्या मनावरचा भार हलका होतो. तसेच आपल्या रुग्णाची काळजी घेण्याचा नवीन हुरूप मिळतो.

हेही वाचा…तुम्हाला इतरांपेक्षा जास्त घाम येतो का? हे कोणत्या आजाराचे कारण तर नाही ना? वाचा डॉक्टरांचे मत

गटामध्ये सदस्य एकमेकांकडून आलेल्या परिस्थितीला कसे तोंड द्यायचे हे शिकतात, एकमेकांच्या भावना समजून घेतात आणि त्यातून भावनिक आधार निर्माण होतो. सतत काळजीवाहकाची भूमिका निभावणे हे कठीण असते. त्यामुळे अधूनमधून विश्रांती किंवा दुसऱ्या कोणीतरी काळजीवाहकाची भूमिका घेणे, थोडी जबाबदारीतून सुटका, कधी कधी सुट्टी या गोष्टी खूप आवश्यक ठरतात. केवळ आपणच आपल्या रुग्णाची काळजी घ्यायला जबाबदार आहोत असे न मानता जर मोकळेपणाने मदत मागितली, उदाहरणार्थ भावाकडे, मित्राकडे, शेजाऱ्यांकडे किंवा एखाद्या संस्थेकडे तर आपोआप काळजीवाहनाचा भार हलका होऊ शकतो. मदत मागण्यात कमीपणा वाटून घेण्याची गरज नाही. स्वतःला भावनिक आधार शोधणे हे आवश्यक असते. थोडा वेळ मोकळीक मिळाली की आपोआप काळजीवाहक नवीन उत्साहाने परत येऊन जबाबदारी पेलू शकतात. आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे काळजीवाहकाला स्वतः लक्ष द्यावे लागते. नियमित आहार, झोप, व्यायाम या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मित्रमंडळी, नातेवाईक, शेजारीपाजारी यांना भेटणे, गप्पा मारणे, बिल्डिंगमध्ये, कुटुंबातील कार्यक्रमांमध्ये सामील होणे, आवर्जून एखादा छंद जोपासणे, आपले मन कोणाकडे तरी मोकळे करणे अशा गोष्टी करत राहिले तर वर्षानुवर्षे काळजी घेताना देखील मन कोमेजून जात नाही. डिप्रेशन किंवा चिंता हे मानसिक विकार जडले तर त्याचा वेळच्यावेळी उपचार करणे हेही गरजेचे असते. रुग्णाच्या बरोबरीने काळजीवाहकाची घेणेही आवश्यक हेच खरे!