डॉ. अविनाश सुपे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सगळ्यांना आपली मुले सशक्त, अत्यंत हुशार, खेळात प्रवीण असावीत असे वाटते. पण ती काही जादू नाही. सात्विक, सकस आहार असला की, मुलांचा सर्वांगीण विकास होतो, प्रतिकारशक्ती वाढते. ती मुले थोड्या हवा बदलामुळे, थोड्या संसर्गाने आजारी पडत नाहीत.

मुलांचा मेंदू तल्लख होण्यासाठी, त्यांना सुदृढ करण्यासाठी लहानपणापासूनच चांगला पोषक आहार घेण्याची सवय पालकांनी लावणे आवश्यक असते. लहान मुले या सवयी स्वतः अनुभवून आणि मोठ्यांना पाहून शिकतात. म्हंटले आहे वी आर व्हॉट वी इट! शालेय पुस्तकात आपण घ्यावयाच्या आहाराची सखोल माहिती आणि ती शरीराला कशी आवश्यक आहेत याचे समग्र ज्ञान दिलेले असते. पण ती माहिती फक्त परीक्षेत रट्टा मारण्यासाठी व पुढे एमसीक्यू सोडवण्यासाठी वापरली जाते. प्रत्यक्षात लहानपणापासून तो आहार त्याचे महत्व मुलांना समजेल या भाषेत सांगत त्यांना खायला लावणे  मोठ्यांचे काम आहे.

हेही वाचा >>> Health special: नॉर्मल काय नि ॲबनॉर्मल काय? कसा ओळखाल मानसिक विकार?

काही पथ्ये लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वानीच पाळली पाहिजेत. स्वच्छतेचे महत्व लहानांसाठी खूप मोलाचे आहे कारण त्यांची प्रतिकारशक्ती थोडी कमी असते.

सवयी – १)जेवणापूर्वी व नंतर स्वच्छता हात धुणे, तोंड चूळ  भरून खळखळून स्वच्छ करणे. २) नेहमी स्वच्छ ताटात जेवावे. ३) ताजे, सकस, स्वच्छ अन्न खावे ४) शुद्ध  स्वच्छ पाणी प्यावे. ५)रोज मोसमी फळे, हिरव्या पालेभाज्या व फळभाज्या खाव्या. ६) अन्न सावकाश चावून चावून, लाळेत घोळवून खावे. ७) जंक फूड म्हणजे पिझ्झा, बर्गर, चिप्स, चॉकोलेट्स सतत खावू नयेत. ८) अन्न गरजेपेक्षा जास्त खाऊ नये आणि ताटात वाया घालवू नये. ९) सकाळी व रात्री दात स्वच्छ घासणे  १०)ठराविक व योग्य  वेळी खाणे.

आपली साधारणपणे ३ जेवणे असतात. १) सकाळी न्याहारी २) दुपारचे जेवण आणि ३) रात्रीचे जेवण. रोज भरपेट सकस न्याहारी करणारी मुले कधी अशक्त नसतात. घरी तयार केलेला संस्कारयुक्त आहार मुलांची बौद्धिक वाढ, अभ्यासात प्रगती करतोच पण ती मुले शांत, समंजस होतात. पाकिटातील फास्ट फूड भूक मारतात, मुले लठ्ठ आणि आळशी होतात. शरीर कुपोषित होते.  तीन वेळी पोटभर सकस, संतुलित आहार घेतला की, पांढऱ्या पेशी वाढतात व त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. पालकांचे कितीतरी काम आणि चिंता दूर होतात फक्त वयाच्या ६ ते ७ पर्यंत त्यांनी त्यांच्या आहाराच्या उत्तम सवयी मुलांना लावल्या पाहिजेत.  त्यासाठी त्यांनी खालील गोष्टी कटाक्षाने पाळाव्या –

हेही वाचा >>> Health special: नेटफ्लिक्सवरील मालिकांचा आणि डोपामिन व व्यसनाचा काय संबंध?

 • एकत्र आनंदाने जेवण करा

लहान मुलांना शिकवा की सर्वांनी एकत्र बसले पाहिजे. शक्यतो कधीतरी पंगत करून जेवा. यासोबत तुम्ही लहान मुलांसमोर सर्व प्रकारच्या भाज्या खायला पाहिजेत. एकत्र सोबत जेवण केल्याने ते मोबाइल आणि टीव्हीपासून दूर होतील. त्यांना तुमचा सहवास मिळेल.

• मुलांना योग्य पदार्थामधून त्यांची  निवड करू द्या

आपण खात असलेल्या सर्व गोष्टी मुलांनी खाव्यात असे नाही. लहान मुलांवर खाण्यासाठी जबरदस्ती करू नये. त्यांना आवडेल ते खावू द्यावे. यामुळे त्यांना कोणते पदार्थ योग्य आहे याची निवड करता येईल.

• तुम्हाला त्यांना चांगल्या सवयी लावण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील.

लहान मुलांना निरोगी आणि पोषक आहार घेण्याची सवय शिकवण्यासाठी वेळ लागू शकतो. त्यामुळे तुमचे प्रयत्न सोडू नका. तुम्ही प्रयत्न करत राहिल्यास मुलांच्या सवयीही बदलतील. कधी कधी जेवणात कोणती भाजी असावी हे मुलांना निवडू द्या. यामुळे ते जंक फूड खाणे टाळतील.

• गरज असेल तेवढेच  खायला द्या

लहान मुलाना गरज असेल तेवढेच खायला द्यावे. लहान मुलांना त्यांच्या भुकेनुसार खायला शिकवावे. त्यामुळे ते भूक ओळखायला शिकतील, आपल्या हाताने खातील आणि यामुळे त्यांचे आरोग्य चांगले राहील.

प्रतिकारशक्ती वाढवायची तर मुलांनी खायलाच हवे सकस पदार्थ व  संतुलित आहार. जर अवांतर खाणे दिले तर त्यांना सकस पदार्थांची चव लागणार नाही.  योग्य आहाराची  माहिती आधी  पालकांनी करून घेतली पाहिजे.

हेही वाचा >>> Health special: ऊन वाढले की, शरीरात नेमके कोणते व कसे बदल होतात?

मूल मोठं होऊ लागलं की त्याला अमुक एक नको, तमुक गोष्ट हवी अशी आवड निर्माण व्हायला लागते. लहानपणी आपण देऊ ते गपचूप खाणाऱ्या मुलांचे खायच्या बाबतीत नखरे सुरू होतात. अनेकदा त्यांना दूध, पालेभाज्या, पौष्टीक गोष्टी नको असतात. पण हेच त्यांना जंक फूड दिले तर मात्र ते अतिशय आवडीने खातात. मूल खात नाही ही सबब न देता पालकांनी वेगवेगळ्या पद्धतीने विशिष्ट पदार्थ त्यांच्या पोटात कसे जातील याची काळजी घ्यायला हवी. त्यामुळे आहारात आवर्जून असायलाच हवेत असे पदार्थ कोणते पाहूया…

• हिरव्या पालेभाज्या- रक्तवाहिन्यांचे संरक्षण करण्यासाठी आणि डायबिटीसपासून दूर राहण्यासाठी हिरव्या पालेभाज्या अतिशय उपयुक्त असतात.

• बिन्स -भाज्यांमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या बिन्स आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात. कार्बोहायड्रेटसचा उत्तम साठा असलेल्या बिया असलेल्या भाज्या, मटार, मसूर यांसारख्या गोष्टींचा आवर्जून समावेश करायला हवा. साखर नियंत्रित राहते व  कॅन्सरपासून संरक्षण होण्यासाठी यांचा वापर आहारात उपयुक्त ठरतो.

• मशरुम -छातीचा, पोटाचा कॅन्सर होऊ नये म्हणून आठवड्यातून किमान एक ते दोन वेळा मशरुम आवर्जून खायला हवेत. चीनमध्ये झालेल्या एका संशोधनानुसार ज्या महिला नियमित मशरुम खात होत्या त्यांना ब्रेस्ट कॅन्सर व्हायची शक्यता ६४ टक्क्यांनी कमी होती. पण मशरुम कायम शिजवून खायला हवेत. ते कच्चे खाल्ले तर त्यातून काही इन्फेक्शन होण्याची शक्यता असते.

• बेरीज -ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी आणि ब्लॅकबेरी या गोष्टी आहारात अतिशय उपयुक्त असतात म्हणून त्यांना सुपरफूड म्हटले जाते. यामध्य साखरेचे प्रमाण कमी आणि पोषणमूल्य अधिक असते. यामध्ये अँटीऑक्सिडंटस जास्त प्रमाणात असल्याने शरीर स्वच्छ होण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होतो. मेंदूसाठी ह्या बेरी खाणे अतिशय फायदेशीर असते. त्यामुळे स्मरणशक्ती आणि मोटरस्कील सुधारण्यास मदत होते.

• बिया -जवस, चिया सीडस, मगज बिया यांसारख्या बी वर्गातील गोष्टी मुलांच्या आहारात आवर्जून असायला हव्यात. दाणे प्रकारापेक्षा बियांमध्ये खनिजे, प्रथिने जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे शरीराचे चांगले पोषण होते. तसेच बियांमध्ये अँटीऑक्सिडंट आणि ओमेगा ३ फॅटी असिड असल्याने त्याचा पोषण होण्यास चांगला उपयोग होतो.

• ओट्स -ई, बी कॉम्प्लेक्स आणि जास्त असते त्यामुळे मेंदू ऊर्जेचा चांगला स्रोत आहे. फायबर खूप असते. यात तुम्ही सफरचंद,केळी, बदाम घालून ते अधिक पौस्टिक करू शकता. मुलांनाही आवडते.

• दूध,दही आणि चीझ -यात प्रथिने आणि जीवनसत्वे असतात. हे सर्व मेंदूमध्ये महत्वाची भूमिका बजावतात. निरोगी दात आणि हाडांसाठी कॅल्शियम ची गरज असते.

• अंडी – यात प्रथिने जास्त प्रमाणात असतात. कोलिन असते जे स्मरणशक्ती वाढविते..

• ऑईली मासे जसे कि बांगडा, टुना आणि इतर मासे यात ओमेगा-३ फॅटी ऍसिड चे प्रमाण जास्त असते. हे मेंदूच्या विकासासाठी फायदेशीर आहे.

• रंगीबेरंगी भाज्या -यात अँटी-ऑक्सिडंट्स व व्हिटॅमिन्स असतात ज्यामुळे मेंदूच्या पेशी निरोगी राहतात. आहारात टोमॅटो, भोपळा, गाजर, पालक असायला हवे.

हेही वाचा >>> Health special: तृणधान्ये कोणती एकत्र करावीत? कोणती करू नयेत?

न्याहारी आहारात अल्कली पदार्थ असावेत. पीएच १ ते ७ असल्यास तो पदार्थ ऍसिडिक -आम्ल असतो आणि ७ पेक्षा जास्त असल्यास तो अल्कली असतो. आपल्या जठरात अन्नपचनासाठी हैड्रोक्लोरिक आम्ल असते व त्याची पीएच २ ते ३ असते. त्यामुळे ते तीव्र आम्लअसते. जर जेवणात सतत तिखट, तेलकट, चमचमीत मसालेदार पदार्थ असले तर पोटातली पीएच वाढते आणि त्या व्यक्तीला पोटाचे मुख्यतः: अॅसिडिटीचा  त्रास सुरु होतात. म्हणून आहारात अल्कली पदार्थ असले की, एक प्रकारचं समतोल होतो. पोटाचेच नाहीतर हृदयाचे आणि मूत्रपिंडाचे त्रासही कमी होतात. पालेभाज्या, कोबी, फ्लॉवर, ब्रोकोली या अल्कली स्वाद निर्माण करतात. कंदमुळे शिंगाडे, बीट, मुळा, गाजर, रताळे हे अल्कली आणि खनिज, प्रथिनांची युक्त आहेत. ती सलाड स्वरूपात खूपच चांगली असतात. मोसमी फळे अल्कली असतातच शिवाय त्यात जीवनसत्वे आणि खनिजे भरपूर असतात. सुकामेवा किंवा कठीण कवचाची फळे यांचा आपल्या आहारात खिशाला परवडेल इतक्या प्रमाणात समावेश जरूर करावा. रसयुक्त फळें लिंबू, संत्री, मोसंबी, अननस ही आंबट वाटली तरी अल्कली गुणधर्माची असतात. कांदा, लसूण आले यांचा आपण मांसाहाराबरोबर समावेश करतो आणि तो योग्यच आहे. 

थोडक्यात भारतीय पारंपरिक जेवण सत्त्वयुक्त आणि परिपूर्ण आहे. तुम्ही फास्ट आणि जंक फूड दूर ठेवलेत तर निश्चित आरोग्यपूर्ण व्हाल अशी माझी खात्री आहे. जाताजाता पालकांना धोक्याची कल्पना देतो जागतिक आरोग्य संघटनेने २०४० सालंदरम्यान १० ते २५ वयोगटाच्या मुलामुलींच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त करून त्यांच्यात आतड्याचे कर्करोग, दातांचे विकार, क्षयरोग, रक्तदाब, मधुमेह आणि हृदयविकार मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता वर्तविली आहे.  हे अनुमान खोटे ठरविणे आपल्याच  हातात आहे तेंव्हा मुलांनो आणि तरुणांनो सावध व्हा.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Child health issues tips to protecting child from infections treatment of childhood disease hldc zws
First published on: 28-05-2023 at 17:09 IST