Health Special टाकळ्याप्रमाणेच पावसाळ्यात सहज उपलब्ध होणारी दुसरी भाजी म्हणजे अळू. श्रावणातले वेगवेगळे उपवास सोडताना अळुच्या वड्या तयार करणे, हा तर एक शिरस्ता बनून गेला आहे. काय कारण असेल या अळूच्या वड्यांमागे? पावसाळ्यात इतर भाज्यांची अनुपलब्धी आणि अळूच्या पानांची सहज उपलब्धी हे पहिले कारण. अळुच्या वड्यांचा चटकदार स्वाद हे दुसरे कारण. मात्र मराठी जेवणामध्ये मानाचे स्थान मिळवलेल्या या अळूमधून शरीराला किती पोषण मिळते माहीत आहे? जाणून घ्या.

काळा व हिरवा अळू

काळ्या रंगाच्या पानांचा अळू आणि हिरव्या रंगाचा अळू असे दोन प्रकारचे अळू उपलब्ध असतात आणि गंमत म्हणजे रंगभेदच नाही तर यांच्यामधून मिळणार्‍या पोषणामध्ये सुद्धा फरक आहे. काळ्या अळूच्या पानांमधून ६.८ ग्रॅम तर हिरव्या अळूमधून ३.९ ग्रॅम प्रथिने मिळतात. महत्त्वाचं म्हणजे अळूमधून मिळणारी प्रथिने ही प्राणिज नाहीत तर वनस्पतीज आहेत, जी प्राणिज प्रथिनांच्या तुलनेमध्ये आरोग्याला अतिशय उपकारक आहेत. काळ्या अळूमधून ४६० मिलीग्रॅम तर हिरव्या अळूमधून २२७ मिलीग्रॅम कॅल्शियम मिळते, तर फ़ॉस्फ़रस १२५ आणि ८२ मिलीग्रॅम आणि खनिजे अनुक्रमे २.५ आणि २.२ ग्रॅम इतक्या प्रमाणात मिळतात.

हेही वाचा : Health Special: पावसाळ्यात कढवून आटवलेले पाणीच का प्यावे?

सुकलेल्या अळूमध्ये अधिक प्रथिने

अळूच्या पानांमधून मॅग्नेशियम, क्लोरिन ही खनिजे सुद्धा मिळतात. अळूच्या पानांमधून मिळणारे पोषण वाढवण्याचा सोपा मार्ग म्हणजे ताज्या पानांऐवजी सुकलेली पाने वापरणे. अळू वड्या सुक्या पानांपासून तयार केल्या तर वर दिलेले पोषण दुपटीपेक्षाही जास्त होते. सुकलेल्या अळूच्या पानांमधून प्रथिने मिळतात १३.७ ग्रॅम, तर कॅल्शियम मिळते १५४६ मिलीग्रॅम.

सुकवलेल्या अळूच्या पानांमधील खनिजांचे प्रमाण तर सहापटीने वाढून १२.८ ग्रॅम पर्यंत पोहोचते. शरीराला नित्य अत्यावश्यक असणारी खनिजे इतर कोणत्याही भाजीमध्ये इतक्या अधिक प्रमाणात नसतात जितकी ती अळुच्या पानांमध्ये असतात.

इतर भाज्यांशी तुलना

कोबी -०.६, फ्लॉवर – ३.२, भेंडी- ०.७, गाजर – १.१, बीट – ०.८, पालक – १.७ (प्रत्येकी ग्रॅममध्ये) याशिवाय रातांधळेपणावर उपयोगी बीटा- कॅरोटिन हे वनस्पतीज अ जीवनसत्त्व काळ्या अळूमधून १२००० यूजी तर हिरव्या अळूमधून १०२७८ यूजी मिळते.बी१ व बी२ ही जीवनसत्वे अत्यल्प प्रमाणात तर बी३ जीवनसत्व १.९ व १.१ एमजी इतक्या प्रमाणात मिळते. याशिवाय शरीराला ज्या उर्जेची व ती उर्जा पुरवणार्‍या चरबीची नितांत गरज पावसाळ्यात असते,ती चरबी तर सुक्या अळूच्या पानांमधून ५.९ ग्रॅम मिळते. प्राणिज चरबी शरीराला घातक म्हणतात, मात्र अळूमधील चरबी वनस्पतीज असल्याने आरोग्यास उपकारक सिद्ध होते.

हेही वाचा : Health Special: निवांत झोप आणि आरोग्याचं नातं

अळूचे मार्केटिंग व्हायला हवे

पूर्वजांनी अळूच्या वड्यांना रोजच्या जेवणामध्ये का स्थान दिले, ते आता वाचकांच्या आता लक्षात आले असेल. अस्सल महाराष्ट्रीय असलेल्या आपल्या अळूच्या वडीचे आता संपूर्ण जगात मार्केटिंग कसे होईल, ते पाहिले पाहिजे. बाकरवडी जर जगप्रसिद्ध होऊ शकते. तर अळूवडी का होऊ शकणार नाही?

गरीबांची पोषक भाजी

एकंदर पाहता गरीबांची भाजी म्हणून ओळखला जाणारा अळू हा बहुगुणी आहे व शरीराला उत्तम पोषण देतो, हे तर लक्षात आले असे असले तरी हिरव्या पानांचा अळू, काळ्या पानांचा अळू आणि प्रत्यक्ष अळूकंद (आरवी) यांपासून मिळणारे पोषण भिन्न आहे,ते समजून घेऊन अळूचे औषधी गुणधर्मसुद्धा जाणून घेऊ, सोबत दिलेल्या तक्त्यांमधून.