Colorectal Cancer Risk And Prevention: कॅन्सरचे लवकर निदान हे प्रतिबंधाचे सर्वात मोठे शस्त्र आहे. कोलोरेक्टल कॅन्सर म्हणजेच मोठ्या आतड्याचा आणि गुदाशयाचा कॅन्सर याचे प्रमाण जगभरात झपाट्याने वाढत आहे. दरवर्षी मोठ्या आतड्याच्या या कॅन्सरच्या सुमारे १२ लाख नवीन केसेस आढळतात. जेव्हा आतड्याच्या पेशी अनियंत्रितपणे वाढू लागतात, तेव्हा कोलोरेक्टल कॅन्सर होतो. याची सुरूवात सहसा लहान गाठींपासून (पॉलिप्स) होते, त्यांचे कालांतराने कॅन्सरमध्ये रूपांतर होऊ शकते. कौटुंबिक इतिहास आणि अनुवांशिक कारणे या कॅन्सरसाठी जबाबदार असू शकतात. चुकीचा आहार, खालावलेली जीवनशैली, लठ्ठपणा, धूम्रपान, अति मद्यपान आणि वाढते वय या आजाासाठी कारणीभूत ठरू शकतात.

कानपूरमधील गॅस्ट्रो लिव्हर हॉस्पिटलमधील डॉ. व्ही. के. मिश्रा यांनी दि इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, जर या कॅन्सरचे लवकर निदान झाले आणि आहार तसंच जीवनशैलीत बदल केले तर तो बरा होऊ शकतो. या कॅन्सरची शरीरात कोणती लक्षणे दिसतात आणि त्याचा प्रतिबंध कसा करता येऊ शकतो याबाबत तज्ज्ञांकडून जाणून घेऊया…

कोलोरेक्टल कॅन्सरची लक्षणे

  • शौचाच्या सवयींमध्ये बदल, कधीकधी बद्धकोष्ठता तर कधी अतिसार
  • मलामध्ये रक्त
  • पोटदुखी, ब्लोटिंग किंवा सततची अस्वस्थता
  • वारंवार गॅस किंवा पोटफुगी
  • शौचास जाऊन आल्यानंतरही पोट पूर्णपणे स्वच्छ झाल्यासारखे वाटत नाही
  • विनाकारण वजन कमी होणे
  • अशक्तपणा आणि थकवा
  • सैल किंवा रिबनसारखे स्टूल

कोलोरेक्टल कॅन्सर कसा टाळावा?

निरोगी आहार महत्त्वाचा – मोठ्या आतड्याचा कॅन्सर टाळण्यासाठी आरोग्यदायी आहार घ्या. आहारात तंतुमय पदार्थांचा समावेश करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. संतुलित आहार राखण्यासाठी, अधिक फळे आणि भाज्या खाणे महत्त्वाचे आहे. आपल्या आहारात ओटमील, ओट्स आणि ब्राउन राईस यासारख्या अख्ख्या धान्यांचा समावेश करा. बदाम आणि अक्रोड यासारखा सुकामेवा खा. आहारात राजमा आणि इतर कडधान्यांचा समावेश करा.

आहारात हे पदार्थ टाळा

मोठ्या आतड्याचा कॅन्सर टाळण्यासाठी लाल मांस, प्रोसेस्ड फूड आणि अति प्रक्रिया केलेले पदार्थ टाळा. हे पदार्थ तुमच्या पचनक्रियेत अडथळा आणू शकतात आणि मोठ्या आतड्याच्या कॅन्सरची लक्षणे अधिक गंभीर करू शकतात.

दररोज शारीरिक व्यायाम

बैठी जीवनशैली कॅन्सरचा धोका वाढवू शकते. दररोज किमान ३० मिनिटे व्यायाम करा. आठवड्यातून पाच दिवस वेगाने चाला, बागकाम करा किंवा खेळ खेळा. व्यायामामुळे आतड्यांची हालचाल सुधारते आणि सूज कमी होते.

वजन नियंत्रणात ठेवा

जास्त वजन किंवा लठ्ठपणा हा कोलेरेक्टल कॅ्सरसाठी एक प्रमुख धोकादायक घटक आहे. २५पेक्षा जास्त बीएमआय असल्यास धोका आणखी वाढतो. शरीरातील अतिरिक्त चरबीमुळे दाह, इन्सुलिन प्रतिरोध आणि हार्मोनल असंतुलन होऊ शकते.

मद्यपान आणि धूम्रपान वर्ज्य करा

अति प्रमाणात मद्यपान केल्याने कॅन्सरचा धोका वाढतो. शरीरात अल्कोहोलचे विघटन होऊन असिटाल्डिहाइड तयार होते. हे रसायन डीएनएला नुकसान पोहोचवू शकते. तसंच बिडी, सिगारेट, गुटखा किंवा तंबाखूचे सेवन टाळा. कोणत्यागी स्वरूपात निकोटीनच्या सेवनाने कॅन्सरचा धोका वाढतो.

कौटुंबिक इतिहासदेखील महत्त्वाचा

तुमच्या कुटुंबात कोणाला हा कॅन्सर झाला असेल, तर तुम्हाला तो होण्याची शक्यता जास्त असू शकते. अशा लोकांनी अधिक सतर्क राहून नियमित आरोग्य तपासणी करून घेणे आवश्यक आहे.

वेळोवेळी तपासणी आवश्यक

वयाच्या ४५ वर्षांनंतर तुमची पहिली कोलोनोस्कोपी करून घेणे महत्त्वाचे आहे. त्यानंतर तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमित तपासण्या करून घ्या. वेळेवर तपासणी केल्यास कॅन्सर सुरूवातीच्या टप्प्यातच ओळखता येतो, त्यामुळे उपचार करणे सोपे होते. मोठ्या आतड्याच्या कॅन्सरचा धोका निश्चितपणे वाढत आहे, मात्र योग्य आहार, सक्रिय जीवनशैली आणि नियमित तपासणीने तो बऱ्याच अंशी टाळता येतो.