सिडनी : करोनाकाळात संसर्गापासून बचाव करण्यासाठी लोकांनी घरातील वस्तू, दरवाजांचे हॅन्डल आदींच्या स्वच्छतेकडे अधिक लक्ष दिले; पण बहुसंख्य लोकांनी मोबाइल स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले. करोना साथीत मोबाइलचा सर्वाधिक वापर करण्यात आला आणि साथीचा वेगाने संसर्ग होण्यामागे हीच वस्तू कारण ठरली. करोनाकाळात करण्यात आलेल्या एका संशोधनाने ही माहिती उघड झाली. हेही वाचा >>> आरोग्य वार्ता : दमाग्रस्तांसाठी मेणबत्तीचा धूर धोकादायक ऑस्ट्रेलियातील ‘बॉन्ड युनिव्हर्सिटी’च्या संशोधकांनी १० देशांतील मोबाइलवर केलेल्या १५ संशोधनांचे अत्यंत काटेकोरपणे विश्लेषण केले आहे. करोना साथीच्या काळात ४५ टक्के मोबाइलमध्ये करोना विषाणू आढळला. फ्रान्समध्ये करोनाकाळात तपासलेल्या १९ पैकी १९ मोबाइलमध्ये करोनाचे विषाणू आढळले होते. या आजाराची साथ शिखरावर असताना सिडनीमध्ये तपासलेल्या मोबाइलपैकी अध्र्या मोबाइलमध्ये करोना विषाणू आढळले होते. हे निष्कर्ष ‘जर्मन ऑफ इन्फेक्शन अॅन्ड पब्लिक हेल्थ’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत. ‘बॉन्ड युनिव्हर्सिटी’चे प्रमुख संशोधक डॉ. लोटी ताजौरी यांनी सांगितले की, करोनाकाळात टाळेबंदी, सीमाबंदी, सामाजिक अंतर आदी उपाय योजण्यात आले होते. त्यानंतरही या आजाराचा वेगाने प्रसार करण्यात मोबाइल प्रमुख कारण ठरले.