Dangerous side effects of cosmetics and why you should switch to Ayurvedic skin care: आजच्या धावपळीच्या युगात आणि शहरी संस्कृतीत लिपस्टिक, नेलपॉलिश आणि विविध क्रीम्सचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. मात्र, नकळत आपण आपल्या शरीराची हानी करत आहोत हे आपल्या लक्षात येत नाही. कृत्रिम रसायनांमुळे ओठांचा नैसर्गिक रंग जाणे, त्वचा रूक्ष होणे आणि केसांच्या समस्या निर्माण होणे अशा अनेक तक्रारी समोर येत आहेत. आजच्या झगमगत्या फॅशनच्या युगात लिपस्टिक, नेलपॉलिश आणि ‘राजस्थानी’ मेंदीचा वापर वाढला असला, तरी त्याचे छुपे दुष्परिणाम भयंकर आहेत. अनेकदा सुंदर दिसण्याच्या नादात आपण रसायने अंगाला लावतो, ज्यामुळे ओठ काळे पडणे, त्वचा रूक्ष होणे आणि केसांच्या गंभीर समस्या निर्माण होतात. जाहिरातींच्या भुलभुलैयाला बळी न पडता, आपल्या घरात उपलब्ध असलेल्या नैसर्गिक घटकांकडे वळण्याची हीच खरी वेळ आहे. ओठांच्या विकारावर ‘शतधौत घृत’, केसांसाठी ‘शिकेकाई’ आणि दातांच्या आरोग्यासाठी ‘नैसर्गिक दंतमंजन’ वापरून आपण हे नुकसान टाळू शकतो. आरोग्याशी तडजोड करून मिळवलेले सौंदर्य टिकणारे नसते, हे वेळीच ओळखणे गरजेचे आहे.

लिपस्टिक वापरावी का?

काही रोग आपण विकत घेत असतो. आपण आपल्या शरीराची हानी करतो, हे प्रथम लक्षातच येत नाही. नकळत आपण चूक करतो. शरीराला त्रास होतो आणि मग आपण त्याकरिता औषध शोधतो. लिपस्टिक हा सौंदर्यप्रसाधनाचा प्रकार असा आहे की, शहरी संस्कृतीत तरुण मुली व मध्यमवयीन स्त्रियांत नकळत ओठाच्या त्वचेचा रंग बिघडवणारा आहे.

लिपस्टिकचे रंग ओठांना कोरडे करतात

खरं म्हणजे लिपस्टिकने ओठ रंगविलेल्या स्त्रियांची लिपस्टिक ओळखता येते. त्यांच्या चेहऱ्याच्या सौंदर्यात फार फरक पडलेला जाणवतही नाही. उलट ओठ पुढे पुढे पांढरट होत जातात. लिपस्टिकचे कृत्रिम रंग हे ओठांना कोरडे करतात. काहींच्या ओठावर कोडासारखे पांढरे डाग दिसू लागतात. किंवा ओठ एकदम काळपट पडतात. यावरचा उतारा चांगले तूप किंवा साय, लोणी हा आहे. तांब्याच्या परातीत तांब्याच्याच भांड्याने थोड्या पाण्यात पुन:पुन्हा तूप घोटावे. पाणी बदलावे. असे शंभर वेळा पाणी बदलून घोटलेले तूप ओठांच्या विकृतीत लावावे. लिपस्टिकच्या गैरवापरावरचा हा एक उत्तम उतारा आहे.

राजस्थानी मेंदीची फसवेगिरी?

‘मेहंदी लगे मेरे हाथ’ हा महिलांचा मोठा आवडीचा विषय आहे. एके काळी पंजाबातील अमृतसर भागात टॉप क्वालिटीची मेंदी लागवड होत असे. अभ्यासकांनी त्याकरिता ‘वेल्थ ऑफ इंडिया’ याचा संबंधित भाग जरूर वाचावा. मेंदी हा विषय असाच चमत्कारिक आहे. ‘राजस्थानी मेंदी’ म्हणून जाहिरात होत असलेली पावडर ही मुळात मेंदी पावडर नव्हेच. कोणत्याही पानांचे चूर्ण व बहुधा चुना, हळद असे मिश्रणाची ती मेहंदी असते. राजस्थानात बाजारात मेंदीची जेवढी मागणी आहे तेवढ्या महाप्रचंड प्रमाणावर मेंदी होतच नाही. मेंदीचा धंदा करणारे मेंदी या नावाने काय बनवतात यावर संशोधन हवे.

मेंदीची अॅलर्जी

असो, ही मेंदी काही स्त्रिया केसांकरिताही वापरतात. त्यामुळे कपाळ, कानाचा भाग यावर सोरायसिससारख्या खरपुड्या येतात. ज्यांना केमिकल्सची अ‍ॅलर्जी आहे त्यांना नवीन रोग मिळतो. हाताच्या नखांना व इतर ठिकाणी त्वचेचा रंग खराब होतो. त्यावर वरीलप्रमाणेच (लिपस्टिकच्या अखेरीस सांगितल्यानुसार) ‘शतधौत घृत’ तयार करून लावावे.

केस धुण्यासाठी आवळकाठी चूर्ण

फसव्या मेंदीमुळे ज्यांच्या केसांचे आरोग्य बिघडले आहे, केस अधिक पांढरे झाले आहेत, त्यांनी केस धुण्याकरिता आवळकाठी चूर्ण वापरावे. त्यामुळे केसांना नवीन जीवन प्राप्त होते. केस मुलायम होतात. मेंदीमुळे केसांत खवडे झाले तर शिकेकाईमध्ये बावची बियांचे चूर्ण मिसळून त्या पाण्याने केस धुवावेत.

नेलपॉलिशने होणारे विकार

नेलपॉलिश लावण्याने काहींची नखे चांगली दिसत असतील, पण नखांचे कुनख किंवा नखे फुटणे, तडकणे हे विकार काही काळाने होतात. मुळात रक्तवर्धक आहार नियमितपणे घेतला तर नखे तजेलदार दिसतात. त्यांना रंगवून बटबटीत करायचे कारण नाही. खराब नखांना शतधौत घृत, चंदनगंध, खोबरेल तेल लावावे.

कृत्रिम रसायनांच्या वापराने त्वचा रूक्ष होते

शहरी जीवन व त्याबरोबर लहान लहान नगर, गावातून कृत्रिम सौंदर्यप्रसाधनांचे फॅड वाढत चालले आहे. शरीराचे आरोग्य व मनाचे सौंदर्य यांचा विचार कोणालाच नको आहे. तरुण मुले-मुली चेहरा सुंदर दिसावा, डाग लपावे, खड्डे बुजावे, मुरुमे जावी म्हणून किती खटाटोप करत असतात. बघून वैताग येतो. त्याकरिता तथाकथित सौंदर्य पॅक, व्हॅनिशिंग क्रीम, कोल्डक्रीम अशा गोष्टींवर वायफळ खर्च होत असतो. त्यांच्यापासून काडीचाही फायदा न होता त्वचा खूप जाडजूड, अधिक रूक्ष होते. मात्र दीर्घकाळ वापरानंतर हे जाणवते, तेव्हा वेळ निघून गेलेली असते.

पेट्रोलियम पदार्थांचा वापर टाळा

तुम्ही काही दिवसांचे बारा तास चेहरा चोपडून किंवा रंगवून बसू शकत नाही. या कृत्रिम सौंदर्यप्रसाधनांऐवजी चेहऱ्याचा तजेलदारपणा, खड्डे, पुटकुळ्या, तेलकटपणा याकरिता अनुक्रमे दुधावरची साय, तूप, चंदन किंवा हळद उगाळून त्याचे गंध व हळद चूर्णाचा लेप याचा वापर करावा. चेहऱ्याचे फोड न फोडणे, साबण, सोडा चेहऱ्यास न लावणे ही तर काळजी घ्यावीच, पण त्याचबरोबर पेट्रोलियम पदार्थांपासून तयार होत असलेल्या सर्व कृत्रित प्रसाधनांना लांब ठेवावे.

टूथपेस्ट- जाहिरात लवंगाची तीही नावापुरती

आपला समाज चुकीच्या मार्गाने वाटचाल करीत आपल्या व पुढील पिढ्यांची वाट कशी लावत आहे हे बघावयाचे असेल तर टूथपेस्टचा वाढता वापर बघा. शहरांच्या सीमा ओलांडून टूथपेस्ट व ब्रश गावोगाव, घरोघर पोचत आहेत. टी.व्ही.वरील आक्रमक जाहिरातींमुळे कोलगेट, प्रॉमीस, फोरान्स इत्यादी टूथपेस्ट पोरेसोरे वापरत आहेत. आम्हाला देशी दातवण, बाभूळ, खैर, कडुनिंब यांच्या काड्या वापरायची लाज वाटते. टूथपेस्टमध्ये दातांच्या आरोग्याचे नाव नसते असे सरकारी रिपोर्टच सांगतात. लवंगाची जाहिरात करून खपवणारी कंपनी खरोखर किती लवंग वापरते याचा तपास लावावयास हवा. जाणत्या वाचकांनी टूथपेस्टवर बहिष्कार टाकावा. आपले दातांचे आरोग्य सांभाळावे. आपल्या घरातील कच्च्याबच्च्यांना आदर्श घालून द्याावा. आपल्या दातांच्या आरोग्याकरिता कडुनिंब आंतरसाल, खैरसाल, हळद, गेरू , कापूर अशा घटकद्रव्यांचे दंतमंजन जरूर वापरावे.

शिकेकाई केव्हा वापराल?

तरुण मुले-मुली आपले केस गळणे कसे थांबेल, केस तेलकट कसे दिसणार नाहीत, कोंडा कसा कमी होईल, टक्कल पडणार नाही ना या विलक्षण चिंतेत असतात. कलप, शांपू व कृत्रिम केशतेल, जाहिरातींना भुलून वापरतात. त्यामुळे केस सुधारण्याऐवजी अंती केसांची मुळे कुमकुवत होतात. केसांची गळती वाढते. केस अधिक पांढरे व रूक्ष नि:सत्त्व होतात. म्हणून या फसव्या दिखाऊ, शांपू व तेलांपेक्षा शिकेकाई वापरा. आवळकाठी, बावची, नागरमोथा, कापूर काचरी, शिकेकाई अंशाची घटकद्रव्ये असणारे ‘केश्य चूर्ण’ केस धुण्याकरिता वापरले तर केसातील कोंडा (डॅन्ड्रफ), खरबा, खवडे, खपल्या नाहीशा होतात. केसांत कोंडा असेपर्यंत कोणतेही तेल केसांना लावू नये.