Dark Chocolate Vs. Milk Chololate Benifits : इस्टर सण जवळ आला की सुपरमार्केटच्या शेल्फवर विविध प्रकारची चॉकलेट्स दिसू लागतात. विशेषतः पाश्चिमात्य देशांमध्ये इस्टर बनी हा सणाचा महत्त्वाचा प्रतीक मानला जातो. या सणानिमित्त चॉकलेटपासून अंडी आणि बनी तयार करण्याची परंपरा आहे. इस्टरशिवाय नववर्ष, नाताळ, व्हॅलेटाईन डे या सणांच्या वेळी देखील बाजारात विविध प्रकारचे चॉकलेट दिसतात. खरं तर चॉकलेट खाण्यासाठी लोकांना कोणत्याही सणाची आवश्यकता नाही पण या सणांच्या काळात चॉकलेटची मागणी जास्त असते.

चॉकलेट म्हटलं की अनेकांना आरोग्याची चिता वाटू लागते. त्यामुळे आजकाल अनेक लोक थेट मिल्क चॉकलेटकडे वळतात, तर काहीजण ‘डार्क चॉकलेट’ला पसंती देतात. गेल्या काही वर्षांत डार्क चॉकलेटकडे ‘हेल्दी’ पर्याय म्हणून पाहिले जाते कारण त्यामध्ये कोकोचे प्रमाण जास्त आणि साखर तुलनेने कमी असते. मात्र खरोखरच डार्क चॉकलेट हे मिल्क चॉकलेटपेक्षा अधिक आरोग्यदायी आहे का, हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. या प्रश्नाचे उत्तर जाणून घ्या.

चॉकलेट तयार कसं होतं? (How chocolate is made)

कोणत्याही प्रकारचे चॉकलेट हे कोको (किंवा काकाओ) बीयांसपासून तयार केले जातात. या बिया ‘थिओब्रोमा काकाओ’ उष्णकटिबंधीय झाडापासून (Tropical tree) मिळतात. या बियांवर प्रक्रिया केल्यानंतर दोन मुख्य घटक तयार होतात, एकतर कोको सॉलिड्स (कडवट, कोरडा घनस्वरुपातील भाग) आणि कोको बटर (तेलकट भाग). कोको सॉलिड्स हा चॉकलेटचा कडवट भाग असतो, तर कोको बटरमुळे चॉकलेटला मऊ आणि गुळगुळीत पोत मिळतो.

सामान्यतः चॉकलेट तयार करताना कोको सॉलिड्स, कोको बटर आणि साखर यांचा वापर होतो. मिल्क चॉकलेटमध्ये याशिवाय दूध पावडर किंवा कंडेन्स्ड मिल्क वापरले जाते. डार्क चॉकलेटमध्ये कोको सॉलिड्सचे प्रमाण साधारण ५० ते ९० टक्क्यांपर्यंत असते, तर मिल्क चॉकलेटमध्ये हे प्रमाण साधारण २० ते ३० टक्के असते. बाकी घटकांमध्ये साखर आणि दूध घटक याचा वापर होतो.

डार्क आणि मिल्क चॉकलेटमधील पोषणमूल्य (Nutritional differences between dark and milk chocolate)

डार्क चॉकलेटमध्ये कोकोचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्यामध्ये काही महत्त्वाचे खनिज (मिनरल्स) जास्त प्रमाणात आढळतात. उदाहरणार्थ, मॅग्नेशियम, आयर्न (लोह) आणि झिंक ही खनिजे डार्क चॉकलेटमध्ये तुलनेने अधिक असतात. याशिवाय त्यामध्ये कॅफिनचे प्रमाणही थोडे जास्त असते, मात्र ते एका कप कॉफीइतके नसते.

दुसरीकडे, मिल्क चॉकलेटमध्ये दूध घटक असल्यामुळे कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. मात्र त्याचवेळी त्यामध्ये साखरेचे प्रमाण तुलनेने जास्त असण्याची शक्यता असते.

कोकोमध्ये ‘पॉलीफेनॉल्स’ नावाचे वनस्पतीजन्य घटक असतात. हे घटक अँटिऑक्सिडंट म्हणून काम करतात आणि शरीरातील पेशींना नुकसान होण्यापासून काही प्रमाणात संरक्षण देतात. डार्क चॉकलेटमध्ये कोकोचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्यामध्ये ‘फ्लॅव्हॅनॉल्स’ नावाचे पॉलीफेनॉल्सही जास्त प्रमाणात असतात. काही अभ्यासांनुसार डार्क चॉकलेटमध्ये मिल्क चॉकलेटपेक्षा जवळपास पाच पट जास्त फ्लॅव्हॅनॉल्स असू शकतात.

डार्क चॉकलेट खाल्ल्याने खरंच आरोग्य सुधारते का? (Does dark chocolate really improve health?)

कोको आणि डार्क चॉकलेटवर झालेल्या काही संशोधनांमध्ये हृदयाच्या आरोग्यासंबंधी काही सकारात्मक निष्कर्ष दिसून आले आहेत. कोकोमधील फ्लॅव्हॅनॉल्स रक्तवाहिन्यांना सैल(प्रसरन पावण्यास) होण्यास मदत करू शकतात, ज्यामुळे रक्तप्रवाह सुधारतो. काही क्लिनिकल अभ्यासांमध्ये कोकोयुक्त पदार्थ सेवन केल्यानंतर रक्तदाबात थोडी घट दिसून आली आहे.

याशिवाय फ्लॅव्हॅनॉल्सने समृद्ध आहार घेतल्यास हृदयविकाराचा धोका कमी होण्याची शक्यता असल्याचे काही अभ्यास सूचित करतात. मात्र या निष्कर्षांबाबत काही महत्त्वाच्या मर्यादा आहेत. अनेक अभ्यासांमध्ये सामान्य बाजारात मिळणाऱ्या चॉकलेटऐवजी विशेष प्रकारचे कोको एक्स्ट्रॅक्ट वापरले गेले होते. तसेच या अभ्यासांमध्ये वापरलेले प्रमाण हे सामान्य व्यक्ती रोज खात असलेल्या चॉकलेटपेक्षा खूप जास्त होते.

एका मोठ्या अभ्यासात, ज्यामध्ये दहा लाखांहून अधिक लोकांचा समावेश होता, चॉकलेट खाणे आणि हृदयविकार, स्ट्रोक किंवा मधुमेहाचा धोका कमी असणे यामध्ये काही संबंध आढळला. मात्र या अभ्यासांची गुणवत्ता ‘कमकुवत’ किंवा ‘अतिशय कमी’ असल्याचे नमूद करण्यात आले. कारण हे अभ्यास निरीक्षणात्मक (observational) स्वरूपाचे होते, जे कारण-परिणाम सिद्ध करू शकत नाहीत.

डार्क चॉकलेटमध्ये साखर कमी असते का? (Is dark chocolate always lower in sugar?)

अनेकांना वाटते की, “डार्क चॉकलेटमध्ये साखर कमी असते. मात्र हे नेहमीच खरे नसते. डार्क चॉकलेटमधील कोकोचे प्रमाण आणि तयार करण्याच्या पद्धतीनुसार साखरेचे प्रमाण खूप बदलू शकते. काही डार्क चॉकलेटमध्ये ४० ते ५० टक्क्यांपर्यंत साखर असू शकते.

उदाहरणार्थ, १५० ग्रॅम वजनाच्या डार्क चॉकलेटच्या एका मोठ्या सणासुदीच्या आकारात (जसे ईस्टर बनी) ५० टक्के साखर असल्यास त्यामध्ये सुमारे १९ चमचे साखर असू शकते. त्यामुळे केवळ ‘डार्क’ हा शब्द पाहून ते आरोग्यासाठी चांगले आहे असे गृहित धरणे चुकीचे ठरू शकते.

यासाठी चॉकलेट खरेदी करताना त्यावरील घटकांची यादी (ingredients list) तपासणे अत्यंत महत्त्वाचे असते. जर यादीमध्ये ‘साखर’ हा घटक पहिल्या क्रमांकावर असेल, तर त्याचा अर्थ त्या उत्पादनात साखरेचे प्रमाण सर्वाधिक आहे.

चॉकलेट निवडताना काय लक्षात ठेवावे? (What to consider when choosing chocolate)

डार्क चॉकलेटला काही पोषणात्मक फायदे असले तरी ते किती आरोग्यदायी ठरेल, हे त्यातील कोकोचे प्रमाण आणि गुणवत्तेवर अवलंबून असते. सर्वसाधारणपणे ७० टक्के किंवा त्याहून अधिक कोको असलेले डार्क चॉकलेट निवडण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. तसेच घटकांच्या यादीमध्ये ‘कोको मास’ किंवा ‘कोको पावडर’ हे घटक सुरुवातीला असणे ही चांगल्या गुणवत्तेची खूण मानली जाते.

याशिवाय, आपण कोणते चॉकलेट खाता यापेक्षा त्याचे प्रमाण किती आहे, हे अधिक महत्त्वाचे ठरते. चॉकलेट हे ऊर्जा-घन (calorie-dense) अन्न असल्यामुळे ते मर्यादित प्रमाणात खाणे आवश्यक असते.

एकूण आहार महत्त्वाचा (Overall diet matters most)

तज्ज्ञांच्या मते, डार्क चॉकलेटमध्ये काही पोषणात्मक फायदे असले तरी ते आरोग्यासाठी ‘औषध’ मानता येत नाही. संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि योग्य जीवनशैली या गोष्टी दीर्घकालीन आरोग्यासाठी अधिक महत्त्वाच्या असतात.

शेवटी, सणासुदीच्या काळात चॉकलेट खाण्याचा खरा आनंद हा कुटुंबीय आणि मित्रांसोबत ते वाटून खाण्यात आहे. योग्य प्रमाणात आणि योग्य निवड करून चॉकलेटचा आस्वाद घेतला, तर चव आणि आरोग्य यामध्ये संतुलन साधता येऊ शकते.