Sudden Cardiac Arrest During Sleep : इंडियन आयडॉल सीझन ३ चा विजेता आणि पाताल लोक २ मधून अभिनयात पुन्हा स्वतःची ओळख निर्माण करणारा गायक प्रशांत तमंग यांचे वयाच्या अवघ्या ४३व्या वर्षी अचानक हृदयविकाराने निधन झाले. तो रात्री नेहमीप्रमाणे झोपलो होता; मात्र सकाळी जागा झालाच नाहीत. कुटुंबियांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेले; मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले.

झोपेत होणारा अचानक हृदयविकार (Sudden cardiac arrest during sleep) हा आजही वैद्यकीय दृष्टिकोनातून दुर्लक्षित केला जाणारा विषय आहे. मात्र हा प्रकार दुर्मिळ नाही, असे तज्ज्ञ सांगतात. “बाहेरून पूर्णपणे निरोगी दिसणारे अनेक लोक नेहमीप्रमाणे झोपतात; पण पुन्हा कधीच जागे होत नाहीत. अशा बहुतेक लोकांना स्वत:ला कोणताही हृदय विकार आहे, याची जाणीव नसते. हृदयातील दडलेली, न ओळखलेली समस्या अचानक सक्रिय होऊन झोपेतच हृदय बंद पडण्यास कारणीभूत ठरू शकते,” असे बंगळूरू येथील स्पर्श हॉस्पिटलचे प्रमुख हृदयरोग तज्ज्ञ आणि मेडिकल डायरेक्टर डॉ. रंजन शेट्टी सांगतात.

झोपेतच अचानक येणारा कार्डिअ‍ॅक अरेस्ट हा प्रकार अनेकांसाठी अजूनही गूढ आहे. याबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी दी इंडियन एक्स्प्रेसने तज्ज्ञांशी संवाद साधला.

Award Banner

झोपेत अचानक हृदयविकार का होतो? (Why sudden cardiac arrest happens during sleep)

रात्री झोपेत असताना शरीर पॅरासिंपॅथेटिक( parasympathetic) म्हणजे विश्रांतीच्या अवस्थेत जाते. या काळात हृदयाचे ठोके मंदावतात. “हृदयाच्या प्रत्येक ठोक्याबरोबर त्यातून विद्युत संकेत प्रवास करत असतात. झोपेत या संकेतांच्या लयीत बदल होऊ शकतो. त्यामुळे कधी हृदयाचे ठोके अतिशय वेगवान, तर कधी अत्यंत मंद होतात. काही वेळा या बदलांमुळे तीव्र अ‍ॅरिदमिया (arrhythmia) म्हणजेच हृदयाच्या लयीतील गंभीर बिघाड निर्माण होतो आणि त्यातून हृदय अचानक थांबण्याची स्थिती उद्भवू शकते. विशेषतः ज्यांना आधीपासून हृदयाच्या लयीचे विकार आहेत, त्यांच्यासाठी मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंतचा काळ अधिक धोकादायक ठरतो,” असे डॉ. शेट्टी सांगतात.

घोरणे आणि स्लीप अ‍ॅप्निया धोकादायक का? (Sleep apnea and snoring risk)

स्लीप अ‍ॅप्नियामध्ये श्वासोच्छ्वास वारंवार थांबतो व सुरू होतो, त्यामुळे रक्तातील ऑक्सिजन पातळी कमी होते. यामुळे हृदयावर ताण येतो आणि त्याची लय अस्थिर होतात. “अनेक लोक जोरात घोरतात, पण त्यांना स्लीप अ‍ॅप्निया असल्याचे निदानच झालेले नसते. अशा स्थितीत झोपेत अचानक हृदयविकाराचा धोका वाढतो,” असे डॉ. शेट्टी स्पष्ट करतात.

झोपेत असतानाच येतो ‘सायलेंट’ हार्ट अ‍टॅक (Silent heart attack at night)

काही वेळा धमन्यांतील प्लाक सहसा धोकादायक वाटत नाही; पण पहाटेच्या सुमारास होणार्‍या हार्मोनल बदलांमुळे रक्तदाब आणि हृदयगती वाढते. यामुळे हृदयावर ताण येऊ प्लाक फुटून रक्ताची गुठळी तयार होऊ शकते आणि हृदयाला थेट रक्तपुरवठा करणारी धमनी ( coronary artery) अचानक बंद होऊ शकते. त्यामुळे हृदयाच्या स्नायूंना ऑक्सिजन मिळत नाही, घातक अ‍ॅरिदमिया होते आणि हृदय थांबते. झोपेत असल्याने रुग्णाला कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत,” असे तज्ज्ञ सांगतात.

इलेक्ट्रोलाइट असंतुलन कारणीभूत ठरू शकते का? (Electrolyte imbalance)

पोटॅशियम किंवा मॅग्नेशियमची कमतरता—विशेषतः निर्जलीकरण, दारूचे सेवन किंवा काही औषधांमुळे—हृदयाच्या लयी बिघडवू शकते. “झोपण्यापूर्वी मद्यपान टाळण्याचा सल्ला याच कारणामुळे दिला जातो,” असे डॉ. शेट्टी नमूद करतात.

चाळिशीनंतर वाढणारे सहव्याधी (Rising co-morbidities after 40)

तणावपूर्ण जीवनशैलीमुळे चाळिशीपर्यंत पोहोचेपर्यंत अनेक तरुण भारतीयांमध्ये उच्च कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब किंवा मधुमेहासारख्या समस्या निर्माण झालेल्या दिसतात. “नियमित आरोग्य तपासणी न झाल्यास हे आजार बराच काळ कोणतीही लक्षणे न देता नकळतपणे वाढत राहतात आणि एखाद्या क्षणी हृदयाच्या लयीतील घातक बिघाड अचानक जीवघेणा ठरू शकतो.

सर्वात गंभीर बाब म्हणजे दीर्घ कामाचे तास, सतत बसून काम करणे, अपुरी झोप, करिअरविषयक ताणतणाव आणि आर्थिक अस्थिरता यांमुळे निर्माण होणारा मानसिक ताण. या ताणामुळे कॉर्टिसोल आणि अ‍ॅड्रेनालिनसारखी तणाव हार्मोन्स वाढतात आणि त्यातून हृदयाच्या लयी धोकादायक पातळीवर बिघडू शकतात. हृदयाच्या धमन्यांमध्ये ब्लॉकेज (अडथळा) नसतानाही तीव्र मानसिक किंवा शारीरिक ताण अचानक हृदय बंद पडण्यास कारणीभूत ठरू शकतो.

याशिवाय पोटावर साचलेली चरबी, फॅटी लिव्हर, इन्सुलिन रेसिस्टन्स आणि शरीरातील सूज हे घटक धोका अधिक वेगाने वाढवतात. “म्हणूनच हृदयाची काळजी ही या सर्व घटकांना नियंत्रणात ठेवण्यापासूनच सुरू होते,” असे डॉ. शेट्टी सांगतात.

चाळिशीत धोका कसा कमी कराल? (How to reduce risk in your 40s)

हृदयाच्या आरोग्याचा आढावा घेण्यासाठी काही मूलभूत तपासण्या अत्यंत महत्त्वाच्या असल्याचा सल्ला डॉ. शेट्टी देतात. यामध्ये लिपिड प्रोफाइल, रक्तातील साखरेची तपासणी, रक्तदाब मोजणी, ईसीजी (Electrocardiogram) आणि इकोकार्डिओग्राम यांचा समावेश होतो. कुटुंबात हृदयरोगाचा इतिहास असल्यास स्ट्रेस टेस्ट करणे अनिवार्य असल्याचे ते स्पष्ट करतात. या तपासण्यांमधून हृदयातील दडलेली समस्या आणि त्याची विद्युत क्रिया समजते.

“या प्राथमिक तपासण्यांमध्ये काहीही संशयास्पद आढळल्यास कार्डिअ‍ॅक होल्टर टेस्ट केली जाते. ही एक पोर्टेबल ईसीजी मशीन असून ती २४ ते ४८ तास शरीरावर लावली जाते, ज्यामुळे दैनंदिन कामकाजादरम्यान होणार्‍या अ‍ॅरिदमिया नोंदवता येतात. काही रुग्णांसाठी कार्डिअ‍ॅक इव्हेंट मॉनिटर वापरला जातो, जो अधिक काळ घालता येतो. अस्वस्थता जाणवली की रुग्णाने बटण दाबल्यावर त्या क्षणातील हृदयाची नोंद घेतली जाते. या नमुन्यांवरून अ‍ॅरिदमिया किती धोकादायक आहे याचा अंदाज येतो आणि योग्य औषधोपचार करून ती दुरूस्त करता येते,” असे डॉ. शेट्टी सांगतात.