Hair Loss Causes & Solutions : केस स्वच्छ धुण्यासाठी तुमच्यापैकी अनेक जण शॅम्पूचा वापर करत असतील. केस मुलायम, चमकदार आणि दाट होण्यासाठी हल्ली अनेक प्रकारचे शॅम्पू बाजारात उपलब्ध आहेत. पण, कोणत्याही शॅम्पूचा वापर करताना एक प्रश्न हमखास विचारला जातो तो म्हणजे, शॅम्पू वापरल्याने खरच केस गळतात का? केसांची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि केस गळती रोखण्यासाठी केस स्वच्छ ठेवणे महत्त्वाचे असते, ज्यासाठी तुमच्या केसांच्या रचनेनुसार विविध शॅम्पू मिळतात. या शॅम्पूने प्रदूषण आणि घाणीमुळे अस्वच्छ झालेले केस, कोंडा आणि डेड सेल काढून केस स्वच्छ केले जातात, असे सांगितले जाते. पण, खरच शॅम्पूने तुमचे केस स्वच्छ तर होतात, मात्र केस गळतीची समस्या वाढते का? याच विषयावर त्वचारोगतज्ज्ञ डॉ. स्वाती मोहन यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शॅम्पूच्या वापराने खरच केस गळतात का?

फरीदाबादच्या त्वचारोगतज्ज्ञ आणि हेअर ट्रान्सप्लांट सर्जन डॉ. राधिका रहेजा यांच्या मते, शॅम्पूमुळे केस गळत नाहीत. पण, केस धुतल्यावर केसांचा गठ्ठा गळताना पाहून लोक खूप घाबरतात. केसांच्या वाढीच्या चक्रात चार टप्पे असतात. ॲनाजेन (सक्रिय वाढ), कॅटेजेन (संक्रमण), टेलोजन (विश्रांती) आणि एक्सोजेन (गळणे) फेज. दररोज सरासरी ५०-१०० केस गळतात. हे केसांच्या वाढीच्या चक्राचा हा एक नैसर्गिक भाग आहे. टेलोजन अवस्थेतील केसांचे कूप सैल असतात, ज्यामुळे शॅम्पूने केस धुतल्यानंतर गळतात. पण, हे केस गळतीचे लक्षण नाही.

शॅम्पूने केस धुणे चुकीचे आहे का?

जरी शॅम्पू केस स्वच्छ करत असला, तरीही त्याचा वारंवार वापर केल्याने तुमच्या केसातील नैसर्गिक तेल निघून जाऊ शकते, ज्यामुळे कोरडेपणा आणि संभाव्य केस तुटण्याची समस्या जाणवू शकते. दुसरीकडे पुरेश्या प्रमाणात शॅम्पूचा वापर न केल्यास टाळूवर तेल आणि मृत त्वचेच्या पेशी जमा होऊ शकतात, ज्यामुळे अस्वस्थता किंवा कोंड्यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

केसांचा प्रकार आणि टाळूच्या स्थितीवरून तुम्ही आठवड्यातून किती वेळा केस धुतले पाहिजे हे ठरते. यावर डॉ. रहेजा यांच्या सल्ल्यानुसार, तुमचे केस सामान्य असल्यास दर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी ते शॅम्पूने धुवू शकता. जर तुम्ही तुमचे केस नियमितपणे कलर करत असाल तर आठवड्यातून एक ते दोन वेळा केस धुवा. पण, कोरडेपणा टाळण्यासाठी काही दिवसांचे अंतर ठेवा. केसांमध्ये कोंड्याची समस्या जाणवत असल्यास सॉफ्ट शॅम्पू (कॅफिन आणि बायोटिनसारखे घटक असलेला) किंवा औषधी वनस्पतींपासून तयार केलेला शॅम्पू वापरा.

केस शॅम्पूने धुताना केस गळतीची समस्या कशी कमी कराल?

१) केस शॅम्पूने धुतल्यानंतर ते ओले असताना विंचरणे टाळा. कारण ओले केस सर्वात कमकुवत आणि सर्वात नाजूक स्थितीत असतात. जर तुम्ही असे करत असाल तर ते टाळा, कारण केस गळण्याचे हेच एक प्रमुख कारण आहे. अनेक जण चुकीचा शॅम्पू वापरल्यामुळे केस गळतात किंवा तुटतात असे म्हणतात, पण तसे नाही; तुम्ही केस धुतल्यानंतर ते विंचरता तेव्हा मुख्यत: या समस्या जाणवतात, असे डॉ. रहेजा म्हणाले.

लैंगिक संबंधांतून वेगाने पसरतोय ‘हा’ नवा दुर्मीळ आजार; कोणाला अधिक धोका? जाणून घ्या लक्षणे

२) केस शॅम्पूने धुतल्यानंतर कंडिशनरचा वापर करणे विसरू नका. कंडिशनर न वापरल्यामुळे तुमचे केस विस्कटल्यासारखे कोरडे होतात, ज्यामुळे केस गळण्याची शक्यता असते.

३) केस धुण्यासाठी गरम पाण्याचा वापर करू नका. जर तुम्हाला गरम शॉवरखाली अंघोळ करायला आवडत असेल, तरी केस धुण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करा. गरम पाण्याने तुमच्या टाळूवरील तेल कमी होते आणि रोम छिद्रे उघडतात, ज्यामुळे केस सैल होतात. यामुळे केस धुण्यासाठी गरम पाणी न वापरता थोड्या कोमट पाण्याचा वापर करा, असे डॉ. रहेजा यांनी सांगितले.

तुमच्या शॅम्पूमध्ये कोणते घटक असले पाहिजे?

फरीदाबादमधील फोर्टिस हॉस्पिटलच्या वरिष्ठ सल्लागार त्वचारोगतज्ज्ञ डॉ. स्वाती मोहन म्हणाल्या की, केसांच्या प्रकारानुसार लोक शॅम्पूची निवड करत नाहीत, अशाने केसांच्या गळतीसाठी शॅम्पूला दोष दिला जातो. कारण लोक शॅम्पूच्या बाटलीवरील लेबल नीट वाचत नाही आणि कोणताही मनाला वाटेल तो शॅम्पू वापरतात. शक्यतो सोडियम लॉरेथ सल्फेट असलेले शॅम्पू वापरणे टाळा. कारण हे घटक केसांमधील केराटिनसह प्रोटीनवर परिणाम करतात. DMDM हायडेंटोइन किंवा फॉर्मेल्डिहाइट असे जर शॅम्पूच्या बाटलीच्या लेबलवर लिहिले असेल, तर त्यापासून दूर रहा. या घटकांमुळे तुमच्या टाळूवर त्वचेसंबंधित समस्या जाणवतात, ज्यामुळे तुमचे केस कूप सैल होतात, अशाने केस गळती होऊ शकते. तसेच सेलेनियम सल्फाइड हा घटक कोंड्यावर उपचार करण्यासाठी वापरला जातो, पण कधीकधी यामुळेही केस गळती होऊ शकते, असेही डॉ. रहेजा म्हणाल्या. पण, असे अनेक बदल करूनही तुमचे केस गळत असल्यास त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diy hair care tips does shampoo really cause hair fall know what your hair care protocol should be does washing your hhair everyday cause hair loss sjr