Do really Fruits cause cold : निरोगी आयुष्यासाठी पौष्टिक आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे. आहारात फळांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. पण, तुम्ही कधी असे ऐकले आहे का की, नीट न पचलेल्या फळांमुळे सर्दी होऊ शकते. हे खरंय का? याविषयी दी इंडियन एक्स्प्रेसने केअर हॉस्पिटलच्या आहारतज्ज्ञ डॉ. जी सुषमा यांच्या हवाल्याने सविस्तर माहिती जाणून घेतली.
फळांचे सेवन केल्याने सर्दी होऊ शकते?
डॉ. सुषमा सांगतात, “व्यवस्थित न पचलेल्या फळांचा सर्दी आणि रक्त गोठण्याशी थेट संबंध नाही. सर्दी हा एक प्रकारचा व्हायरल संसर्ग आहे; जो राइनो व्हायरसमुळे होतो. तरीसुद्धा काही प्रकरणांत फळांमुळे सर्दीचा त्रास होऊ शकतो.”
“जेव्हा तुमची रोगप्रतिकार शक्ती कमकुवत असते तेव्हा तुमच्या शरीराकडून अॅलर्जीला प्रतिसाद मिळाल्यास सर्दी, पोटदुखी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात”, असे डॉ. सुषमा पुढे सांगतात.
“हिस्टामाइन हे शरीरात दिसून येणारे एक रसायन आहे; जे आपल्याला असलेल्या अॅलर्जीवर प्रतिसाद देते. तुम्हाला फळांची अॅलर्जी असेल, तर त्यावर शरीर प्रतिसाद देते आणि त्यामुळे शिंका येतात आणि नाकातून सतत पाणी वाहते. पपई, केळी व संत्री यांसारख्या फळांमध्ये हिस्टामाइनचे प्रमाण जास्त असते”, असे डॉ. सुषमा सांगतात.
“जेव्हा फळे नीट पचत नाहीत, तेव्हा त्यांच्यावर किण्वन प्रक्रिया (fermentation) होऊ शकते; ज्यामुळे पोटाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. याची लक्षणे सर्दी झाल्यानंतरच्या लक्षणांसारखीच असतात”, असे त्या सांगतात.
डॉ. सुषमा यांच्या मते, “रोगप्रतिकार शक्ती कमकुवत असणाऱ्या लोकांना पचनाच्या समस्या आणि सर्दी होण्याची शक्यता जास्त असते.”
हेही वाचा : आठवड्यातून एकदा दुधीचा रस प्यायल्यास तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? जाणून घ्या डॉक्टरांकडून…
तुम्हाला फळांची अॅलर्जी आहे का?
डॉ. सुषमा सांगतात, “जर तुम्हाला कोणत्याही पदार्थाची अॅलर्जी असेल, तर तुमच्या आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि त्यानुसार आहार घ्या.
जर व्हिटॅमिन सीसारख्या पोषक घटकांमुळे आरोग्याच्या समस्या वाढत असतील, तर व्हिटॅमिन सी असलेली फळे खाणे टाळा. फळांचे सेवन कमी प्रमाणात करा आणि फळे खाण्याऐवजी इतर पोषक घटकांचा आहारात समावेश करा. संतुलित आहारासाठी ताज्या भाज्या, बिया आणि सुका मेवा व प्रोटीन्सचे सेवन करा.
फळे कधी खावीत?
“फळांचे सेवन हे तुम्ही कोणत्या प्रकारचा आहार घेता आणि तुमचे आरोग्य यांवर अवलंबून असते. कमी प्रमाणात फळे खाणे हे खूप महत्त्वाचे आहे. कारण- अति प्रमाणात फळे खाल्ल्याने आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो,” असे डॉ. सुषमा सांगतात.
उपाशीपोटी फळांचे सेवन केल्याने शरीरास चांगले पोषक घटक मिळतात आणि फळांमध्ये असलेली नैसर्गिक साखर ऊर्जेची पातळी संतुलित ठेवण्यास मदत करू शकते. जेवण करताना किंवा नंतर स्नॅक म्हणून फळे हा एक चांगला पर्याय असू शकतो.