पाणी म्हणजे शरीराचा प्राण. पण तुम्हाला ठाऊक आहे का, पाणी प्यायल्यानंतर ते शरीराला तत्काळ शरीरातील पाण्याची पातळी राखण्यासाठी मदत करत नाही. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, पाणी शरीरात गेल्यानंतर लगेच कामाला लागतं, मात्र ते पेशींपर्यंत पोहोचण्यासाठी आणि संपूर्ण शरीराला ताजेतवाने करण्यासाठी एक ठराविक वेळ घेतं.
पाणी शरीरात कसं शोषलं जातं? (How water gets absorbed in the body)
याबाबत दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना पोषणतज्ज्ञ दीपिका शर्मा सांगतात की, “पाणी प्यायल्यानंतर साधारण ५ ते १० मिनिटांत ते रक्तप्रवाहात शिरायला सुरुवात करतं. मात्र, संपूर्ण शरीरातील पाण्याची पातळी राखण्यासाठी म्हणजेच पाणी शरीराच्या ऊतींपर्यंत, अवयवांपर्यंत आणि पेशींपर्यंत पोहोचणं — साधारण ३० ते ४५ मिनिटांत होतं.” ही वेळ प्रत्येक व्यक्तीच्या शरीराची स्थिती, द्रवपातळी आणि त्या वेळी शरीरातील पाण्याची पातळी किती कमी आहे यावर अवलंबून असते.
पाणी शोषणावर परिणाम करणारे घटक (Factors affecting water absorption)
शर्मा सांगतात, “रिकाम्या पोटी पाणी अधिक वेगाने शोषलं जातं. तसेच सोडियम, पोटॅशियम, आणि ग्लुकोजसारखे इलेक्ट्रोलाइट्स शरीराला पाणी धरून ठेवण्यास मदत करतात. थंड (पण बर्फासारखं नव्हे) पाणी गरम पाण्यापेक्षा अधिक प्रभावीपणे शोषलं जातं.”
व्यायामादरम्यान शरीराला तातडीने द्रवांची गरज भासल्यामुळे त्या वेळी पाणी जलद शोषलं जातं. उलट काही आरोग्य समस्या — जसे की अतिसार, उलट्या किंवा मूत्रपिंडाशी संबंधित अडचणी — पाणी शोषणाचा वेग कमी करू शकतात.
घटाघट की हळूहळू पाणी पिणं योग्य? (Is chugging water better than sipping?)
अनेकांना वाटतं जास्त पाणी एकदम प्यायलं की शरीरातील पाण्याची पातळी झटपट वाढते. पण तसं नाही. शर्मा स्पष्ट करतात, “दिवसभरात थोडं-थोडं पाणी पिणं अधिक प्रभावी ठरतं, त्यामुळे शरीरात सतत द्रवपातळी संतुलित राहते आणि रक्तातील मिठाचं प्रमाण योग्य राहतं.”
याउलट, एकदम खूप पाणी प्यायल्यास पोट फुगणं, वारंवार लघवी लागणं आणि शरीरातील पाण्याची पातळी वाढल्याचा भास होऊ शकतो. एवढंच नाही तर जेवणाच्या वेळी जास्त पाणी घेतल्यास पोटातील आम्ल (stomach acid) विरळ होतं आणि पचन प्रक्रियेवर परिणाम होतो.
खाण्यापिण्याच्या सवयींचाही परिणाम (Food habits and hydration)
“आपण जे खातो-पितो त्याचाही शरीरातील पाण्याच्या पातळीवर परिणाम होतो,” असं शर्मा सांगतात. सूप, नारळ पाणी, संत्रं, कलिंगड यांसारख्या नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्सयुक्त पदार्थांमुळे शरीरातील पाण्याची पातळी सुधारते; तर दारू, कॅफिन, साखरयुक्त पेये आणि अतिखारट पदार्थ शरीरातील पाणी कमी करून निर्जलीकरण वाढवतात.
शरीराला पुरेसं पाणी मिळणं म्हणजे फक्त तहान भागवणं नव्हे. शरीरातील पाण्याची पातळी राखणे ही एक प्रक्रिया आहे, जी हळूहळू आणि सातत्याने घडते; त्यामुळे दिवसभरात थोडं-थोडं पाणी पिण्याची सवय लावल्यास शरीर तंदुरुस्त, ऊर्जा भरलेलं आणि पेशींपर्यंत पोषण मिळते.
