Priyanka Chopra : बिनधास्त आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी प्रियांका चोप्रा प्रत्येक विषयावर आपले ठाम मत मांडते. ती तिच्या भावना उघडपणे व्यक्त करते. नुकत्याच हार्पर बाजार या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या एका मुलाखतीत तिने सांगितले की, तिला खूप पटकन रडू येते. काही लोक छोट्याशा गोष्टीवरून पटकन रडतात, तर काही लोक क्वचितच रडतात; असं का? काही लोकांना पटकन रडू का येतं? ते भावनिकदृष्ट्या इतरांपेक्षा जास्त भावनिक का असतात? याविषयी द इंडियन एक्स्प्रेसने मानसशास्त्रज्ञ सृष्टी वत्स यांच्याशी संवाद साधून माहिती जाणून घेतली. त्या सांगतात, “रडणे ही एक नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. पण, काही लोकांना भावनिक संवेदनशीलता, तणाव, भूतकाळातील अनुभव आणि हार्मोनल घटकांच्या एकत्र संयोजनामुळे खूप पटकन रडू येतं.”…

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

काही लोकांना इतरांच्या तुलनेत पटकन रडू का येतं?

भावनिक संवेदनशीलता आणि व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य

वत्स यांच्या मते, ज्या व्यक्तीमध्ये खूप जास्त भावनिक संवेदनशीलता आणि सहानुभूती असते, त्या इतर व्यक्तीच्या तुलनेत पटकन रडू शकतात. “जे लोक भावनिकदृष्ट्‍या पूर्णपणे खचलेले असतात, त्यांना रडू येण्याची शक्यता जास्त असते,” असे त्या सांगतात. काही लोक बांध फुटायच्या आधी त्यांच्या भावनांवर आवर घालतात, ज्यामुळे त्यांना रडू येत नाही.

तणाव, एंग्झायटी किंवा भूतकाळातील वाईट अनुभव

तणाव, एंग्झायटी किंवा भूतकाळातील वाईट अनुभवामुळे अनेकदा लहान गोष्टींवरूनही भावनिक उद्रेक होऊ शकतो. वत्स याची तुलना प्रेशर कुकरशी करतात. जेव्हा तुम्ही भावना खूप साठवून ठेवता, तेव्हा रडणे एकमेव मार्ग उरतो. हे बऱ्याचदा कामाच्या ठिकाणी, जिथे खूप कामाचे प्रेशर असते तिथे दिसून येते; अशावेळी तेथील कर्मचाऱ्यांना तीव्र दडपण येते.

हार्मोन्सची भूमिका

हार्मोन्समध्ये बदल झाल्यामुळे रडण्यावर लक्षणीय परिणाम होतो. इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन या दोन हार्मोन्समध्ये चढ-उतार दिसून येतात. विशेषत: मासिक पाळी, गर्भधारणा किंवा मेनोपॉजदरम्यान हा प्रभाव अधिक दिसून येतो. या दरम्यान कोणत्याही क्षुल्लक कारणावरून रडण्याची शक्यता अधिक असते, म्हणून अनेक महिलांना पाळीदरम्यान याचा अनुभव जास्त येतो.

झोप कमी होणे आणि मानसिक आरोग्य

झोपेच्या कमतरतेमुळे भावनांवरील नियंत्रण कमकुवत होते, ज्यामुळे लोक एखाद्या गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया देतात किंवा भावूक होतात. याशिवाय सातत्याने अनियंत्रित रडणे भावनिक त्रास दर्शवतो. जसे की, नैराश्य किंवा एंग्झायटी इत्यादी. जर रडल्यामुळे तुमच्या दैनंदिन जीवनात व्यत्यय येत असेल तर तज्ज्ञांची मदत घेऊन मानसिक आरोग्य तपासणे गरजेचे आहे.

रडणे निरोगी आहे का?

हो, रडणे हा एक नैसर्गिक आणि निरोगी मार्ग आहे, ज्याद्वारे भावना व्यक्त केल्या जातात. वत्स सांगतात, भावना मनात साठवून ठेवण्यापेक्षा एका सुरक्षित जागी रडणे महत्त्वाचे आहे. भावना व्यक्त केल्या तर भावनिक ओव्हरलोड टाळता येतो. जर तुम्ही सतत रडत असाल आणि तुम्हाला त्याचा त्रास होत असेल तर अशावेळी तुम्ही तज्ज्ञांची मदत घ्या. थेरेपी घेऊन तुम्ही त्यामागील कारण जाणून घेऊ शकता, ज्यामुळे तुम्हाला पुढच्या वेळी समस्येचा सामना करता येईल.

तुम्ही जर प्रियांका चोप्रासारखे असाल, जी तिची भावनिक बाजू स्वीकारते आणि लवकर व्यक्त होते किंवा क्वचितच रडणारी व्यक्ती असाल तर ही पूर्णपणे सामान्य गोष्ट आहे. काही लोकांना त्यांच्या भावना मोकळेपणाने व्यक्त करण्यास अधिक सोयीस्कर वाटते, तर काही लोक भावनांवर आवर घालण्यास जास्त प्राधान्य देतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या भावनांवर काम करणे आणि भावना व्यक्त करण्यासाठी निरोगी मार्ग शोधणे गरजेचे आहे.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do you cry or tear up at the smallest provocation like bollywood actress priyanka chopra why this happened ndj