Pain After Sex Symptoms : शारीरिक संबंध (Sex) ठेवल्यानंतर अनेकदा महिलांना आणि पुरुषांना वेदना होत असल्याचे जाणवते. शारीरिक संबंधानंतर होणाऱ्या वेदनांना Dyspareunia असे म्हणतात योनीमार्गातील कोरडेपणा किंवा संसर्ग यांसारख्या कारणांमुळे अशी वेदना होऊ शकते. तुम्हालाही शारीरिक संबंध ठेवल्यानंतर ताप, रक्तस्राव आणि तीव्र वेदना जाणवत असतील, तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या.

लैंगिक संबंधांदरम्यान (सेक्स) होणाऱ्या वेदनांच्या शारीरिक कारणांमध्ये विविध प्रकारचे संसर्ग, दुखापती आणि अंतर्निहित आजारांचा समावेश होतो.

१. योनीमार्गातील यीस्ट आणि बॅक्टेरियल संसर्ग (Yeast and Bacterial Infections)

यीस्ट संसर्ग आणि बॅक्टेरियल संसर्ग (बॅक्टेरियल योनिओसिस किंवा BV) हे योनिमार्गाच्या संसर्गाचे दोन वेगळे प्रकार आहेत. यीस्ट संसर्ग कॅन्डिडा (Candida) नावाच्या बुरशीच्या अति वाढीमुळेळे होतो, तर बॅक्टेरियल संसर्ग योनीतील चांगल्या आणि वाईट बॅक्टेरियांचे संतुलन बिघडल्यामुळे होतो

स्टॅटपर्ल्स पब्लिशिंगद्वारे २०२६ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘Dyspareunia’ आणि २०२४ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘Balanitis’ तसेच मेडलाइनप्लसच्या मूत्रमार्गाच्या संसर्गावरील (Urinary Tract Infections) संशोधनानुसार, लैंगिक संबंधांनंतर सूज, वेदना किंवा जळजळ होऊ शकणाऱ्या संसर्गांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो:

  • बॅक्टेरियल व्हॅजिनोसिस (BV) – योनीमध्ये नैसर्गिकरित्या असलेल्या बॅक्टेरियांचे संतुलन बिघडल्यामुळे होणारी सामान्य स्थिती.
  • मूत्रमार्गाचा संसर्ग (UTI) – मूत्रमार्गात जंतूंचा संसर्ग झाल्यामुळे होणारी स्थिती.
  • यीस्ट संसर्ग (Yeast Infection) – Candida नावाच्या बुरशीची अतिवाढ झाल्यामुळे होणारा संसर्ग.

उपचार

मेडलाइनप्लसवर प्रकाशित झालेल्या यीस्ट संसर्गावरील संशोधनानुसार, यीस्ट संसर्गावर बुरशीविरोधी औषधांनी उपचार केला जाऊ शकतो. मूत्रमार्गाच्या संसर्गावर (UTI) आणि बॅक्टेरियल व्हॅजिनोसिसवर (BV) सामान्यतः प्रतिजैविकांनी उपचार केले जातात.

सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनच्या ‘Urinary Tract Infection Basics’ या माहितीनुसार, UTI टाळण्यासाठी लैंगिक संबंधांनंतर लघवी करणे, पुरेसे पाणी पिणे आणि गुप्तांगांवर सुगंधी उत्पादने वापरणे टाळणे उपयुक्त ठरू शकते.

२. लैंगिक संबंधातून पसरणारे संसर्ग (Sexually Transmitted Infections – STIs)

लैंगिक संबंधातून पसरणारे संसर्ग (Sexually Transmitted Infections – STIs) म्हणजे असे आजार किंवा संसर्ग, जे प्रामुख्याने असुरक्षित लैंगिक संबंधांद्वारे (योनी, गुदद्वार किंवा तोंडाद्वारे केलेले लैंगिक संबंध) एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरतात. हे संसर्ग जिवाणू (Bacteria), विषाणू (Virus) किंवा परजीवी (Parasites) मुळे होतात.

स्टॅटपर्ल्स पब्लिशिंगच्या ‘Dyspareunia’ या संशोधनानुसार, लैंगिक संबंधातून पसरणाऱ्या संसर्गांमध्ये (STIs) क्लॅमिडिया (Chlamydia), गोनोरिया (Gonorrhea), हर्पिस (Herpes) आणि ट्रायकोमोनियासिस (Trichomoniasis) यांचा समावेश होतो. या संसर्गांमुळे योनीमध्ये दाह होऊ शकतो आणि त्यामुळे लैंगिक संबंध वेदनादायी ठरू शकतात.

उपचार

बॅक्टेरियामुळे होणाऱ्या लैंगिक संक्रमित आजारांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर प्रतिजैविके लिहून देऊ शकतात. हर्पिसवर सध्या कोणताही कायमस्वरूपी इलाज नाही; मात्र, विषाणूविरोधी औषधे त्याचा प्रसार आणि प्रादुर्भाव होण्याचा धोका कमी करू शकतात.

मेडलाइनप्लसवर प्रकाशित माहितीनुसार, कंडोमसारख्या प्रतिबंधात्मक पद्धतींचा वापर केल्याने लैंगिक संक्रमित आजारांचा धोका कमी करण्यास मदत होऊ शकते.

३. पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसीज (Pelvic Inflammatory Disease – PID)

पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसीज (PID) हा स्त्रियांच्या जननसंस्थेचा (Reproductive System) होणारा एक गंभीर संसर्ग आहे. जेव्हा योनी (Vagina) किंवा गर्भाशयाच्या मुखातून (Cervix) बॅक्टेरिया वरच्या बाजूला सरकून गर्भाशय (Uterus), फॅलोपियन ट्यूब (Fallopian tubes) किंवा अंडाशयात (Ovaries) पोहोचतात, तेव्हा तिथे सूज आणि संसर्ग निर्माण होतो.हा आजार बहुतांश वेळा उपचारांशिवाय राहिलेल्या लैंगिक संसर्गांमुळे (STIs) होतो.

स्टॅटपर्ल्स पब्लिशिंगच्या ‘Dyspareunia’ या संशोधनानुसार, पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसीज (PID) म्हणजे स्त्रियांच्या वरच्या प्रजनन अवयवांमध्ये होणारा संसर्ग. गोनोरिया किंवा क्लॅमिडिया यांसारखे लैंगिक संक्रमित संसर्ग हे त्यामागील सामान्य कारणे असू शकतात. मात्र, अनेक प्रकरणांमध्ये PID नेमक्या कोणत्या कारणामुळे झाला आहे, हे स्पष्ट होत नाही.

सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनच्या माहितीनुसार, PID ची संभाव्य लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत:

पू भरलेली गाठ किंवा संसर्गामुळे झालेली पूयुक्त सूज (Abscess)
मासिक पाळीच्या वेळी किंवा दोन पाळींमधील काळात रक्तस्राव होणे
लैंगिक संबंधांदरम्यान पेल्विसच्या आतील भागात खोलवर वेदना होणे
ताप येणे
खालच्या पोटात किंवा पेल्विसच्या भागात वेदना होणे
लघवी करताना वेदना किंवा जळजळ होणे

उपचार

प्रतिजैविकांनी PID वर उपचार करता येतो. मात्र, व्रण पडणे किंवा फॅलोपियन ट्यूबला झालेली इजा यांसारखे नुकसान कायमस्वरूपी असू शकते.

४. योनिमार्गातील कोरडेपणा (Vaginal Dryness)

योनिमार्गातील कोरडेपणा (Vaginal Dryness) म्हणजे योनिमार्गातील (Vagina) त्वचेमधील नैसर्गिक ओलसरपणा (Moisture) व लचकता कमी होणे. सामान्यतः योनिमार्गाच्या भिंतींमधून एक पातळ, द्रव स्राव होतो जो तिथे ओलसरपणा टिकवून ठेवतो. जेव्हा हा स्राव कमी होतो, तेव्हा योनिमार्गात कोरडेपणा जाणवतो.

हा आजार नसून एक सामान्य वैद्यकीय स्थिती आहे, जी कोणत्याही वयातील स्त्रीला होऊ शकते; परंतु रजोनिवृत्तीच्या (Menopause) काळात किंवा नंतर ही समस्या सर्वाधिक आढळते. यामुळे योनिमार्गात पुरेशी स्निग्धता किंवा स्नेहन नसल्यास घर्षणामुळे जळजळ होऊ शकते आणि त्यातून योनीमध्ये वेदना होऊ शकतात.

BMJ Open मध्ये प्रकाशित झालेल्या प्रथम प्रसूती झालेल्या महिलांमधील प्रसूतीदरम्यान झालेल्या पेरिनियल जखमा, लैंगिक कार्यक्षमता आणि संभोगादरम्यान होणाऱ्या वेदनांबाबतच्या संशोधनानुसार, हार्मोनल बदलांमुळे योनिमार्गात कोरडेपणा आणि वेदना होऊ शकतात.

इस्ट्रोजेनची पातळी कमी होण्याची काही कारणे पुढीलप्रमाणे आहेत:

  • स्तनपान
  • रजोनिवृत्ती
  • गर्भधारणा

उपचार

अमेरिकन कॉलेज ऑफ ऑब्स्टेट्रिशियन्स अँड गायनॅकॉलॉजिस्टच्या ‘When Sex is Painful’ या माहितीनुसार, हार्मोनल बदलांमुळे आलेला योनिमार्गातील कोरडेपणा कमी करण्यासाठी डॉक्टर योनिमार्गातील इस्ट्रोजेन, मॉइश्चरायझर्स किंवा ल्युब्रिकंट्स वापरण्याचा सल्ला देऊ शकतात.

कामोत्तेजनेच्या अभावामुळे (Lack of Arousal) कोरडेपणा येत असल्यास, अधिक वेळ कामक्रीडेसाठी (Foreplay) देण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.

५. जननेंद्रियांना झालेली इजा (Genital Injury)

जननेंद्रियांना झालेली इजा (Genital Injury) म्हणजे स्त्री किंवा पुरुष जननेंद्रियांना अपघातामुळे, आघातामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे झालेली शारीरिक दुखापत होय. ही इजा बाह्य अवयवांना (उदा. पुरुषांचे लिंग किंवा महिलांची योनीचा बाह्य भाग) किंवा अंतर्गत अवयवांना होऊ शकते.

BMJ Open मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, एपिसिओटॉमी किंवा बाळाला जन्म देताना स्त्रियांच्या जननेंद्रियांना इजा झाल्यास लैंगिक संबंधांदरम्यान वेदना होऊ शकतात. विशेषतः जखम पूर्णपणे भरून आलेली नसल्यास या वेदना अधिक जाणवू शकतात.

पुरुषाच्या जननेंद्रियाच्या टोकाला (Penis Head) किंवा पुढील त्वचेला (Foreskin) झालेल्या इजेमुळे घर्षणाच्या वेळी वेदना होऊ शकतात किंवा त्वचा फाटू शकते.

उपचार

BMJ Openच्या अहवालानुसार, जखमा बऱ्या होत असताना जळजळ आणि वेदना टाळण्यासाठी काही काळ लैंगिक संबंध टाळण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो.

पेरिनियल मसाज किंवा दुखऱ्या/नाजूक व्रणाच्या जागेवर लिडोकेन जेल (Lidocaine Gel) लावल्याने दीर्घकाळ टिकणाऱ्या वेदनांवर उपचार करण्यास मदत होऊ शकते. मात्र, कोणतेही बाह्य उपचार करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

६. त्वचेला त्रास देणारे घटक (Skin Irritants)

लैंगिक संबंधांदरम्यान जननेंद्रियांच्या त्वचेला त्रास देणारे घटक (Sexual Skin Irritants) म्हणजे असे घटक किंवा परिस्थिती ज्यामुळे गुप्तांगांच्या संवेदनशील त्वचेवर जळजळ, खाज, लालसरपणा किंवा पुरळ (Irritation / Dermatitis) निर्माण होते.

नॅशनल एक्झिमा सोसायटीद्वारे प्रकाशित ‘Female Genital Eczema’ या संशोधनानुसार, विशेषतः एखाद्या घटकाची ॲलर्जी असल्यास सुगंधित योनी उत्पादने (Scented Vaginal Products), शुक्राणूनाशके (Spermicides) आणि लेटेक्स कंडोममुळे त्वचेला जळजळ होऊ शकते. त्यामुळे लैंगिक संबंध वेदनादायी ठरू शकतात.

२०२२ मध्ये बायोसायंटिफिकामध्ये प्रकाशित ‘Effects of Nonoxynol-9 (N-9) on Sperm Functions: Systematic Review and Meta-analysis’ या संशोधनानुसार, नॉनॉक्सिनॉल-९ हा शुक्राणूनाशकांमधील एक घटक असून, त्यामुळे योनी आणि पुरुषाच्या जननेंद्रियाला जळजळ होऊ शकते.

उपचार

ऑफिस ऑन वुमन्स हेल्थच्या ‘Douching’ या माहितीनुसार, योनीचा आतील भाग स्वच्छ करण्यासाठी सुगंधित क्लीन्झर किंवा डूश (Douches) वापरू नयेत. BMJ Openच्या संशोधनानुसार, यामुळे योनीच्या नाजूक त्वचेला त्रास होऊ शकतो आणि जंतुसंसर्गाचा धोका वाढू शकतो.

७. ॲलर्जीक प्रतिक्रिया (Allergic Reactions)

लैंगिक संबंधांशी संबंधित ॲलर्जीक प्रतिक्रिया (Sexual Allergic Reactions) म्हणजे लैंगिक संपर्कादरम्यान किंवा त्यानंतर वापरल्या जाणाऱ्या वस्तू (उदा. लेटेक्स कंडोम) किंवा शारीरिक द्रव (उदा. वीर्य) यांच्या संपर्कात आल्यामुळे जननेंद्रियांवर किंवा शरीरावर होणारी दाहक प्रतिक्रिया होय.

लेटेक्स कंडोमच्या ॲलर्जीमुळे खाज सुटणे, जळजळ होणे आणि वेदना होऊ शकतात. लैंगिक संबंधांदरम्यान ही लक्षणे अधिक वाढू शकतात.

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित ‘Genital Contact Allergy: A Diagnosis Missed’ या संशोधनानुसार, काही लोकांना वीर्याची ॲलर्जी देखील असू शकते. मात्र, ही स्थिती दुर्मिळ आहे. मानवी वीर्यद्रव्याच्या (Human Seminal Plasma – HSP) अतिसंवेदनशीलतेमुळे शुक्राणूंमधील प्रथिनांवर प्रतिक्रिया होऊन योनीमध्ये दाह आणि वेदना होऊ शकतात.

उपचार

या संशोधनानुसार, वेदना टाळण्यासाठी पॉलीयुरेथेन कंडोम (Polyurethane Condoms) किंवा नैसर्गिक लँबस्किन कंडोम (Natural Lambskin Condoms) वापरले जाऊ शकतात. मात्र, लँबस्किन कंडोम लैंगिक संक्रमित आजारांपासून (STIs) संरक्षण देत नाहीत.

८. एंडोमेट्रिओसिस (Endometriosis)

एंडोमेट्रिओसिस (Endometriosis) हा महिलांच्या प्रजनन संस्थेशी संबंधित असा एक आजार आहे, ज्यामध्ये गर्भाशयाच्या आतील अस्तर किंवा आवरण (Endometrium) गर्भाशयाच्या बाहेर इतर अवयवांवर वाढू लागते.

स्टॅटपर्ल्स पब्लिशिंगच्या ‘Dyspareunia’ या संशोधनानुसार, एंडोमेट्रिओसिसमुळे लैंगिक संबंधांदरम्यान किंवा त्यानंतर योनी किंवा ओटीपोटात तीव्र आणि खोलवर वेदना होऊ शकतात.

ऑफिस ऑन वुमन्स हेल्थच्या एंडोमेट्रिओसिसवरील माहितीनुसार, गर्भाशयाच्या अस्तरासारखी ऊती गर्भाशयाच्या बाहेर वाढल्यास एंडोमेट्रिओसिस होतो. या ऊतींच्या वाढीमुळे दाह आणि वेदना होऊ शकतात.

एंडोमेट्रिओसिसच्या इतर लक्षणांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो:

  • पचनसंस्थेशी संबंधित अस्वस्थता
  • वंध्यत्व
  • अनियमित रक्तस्राव
  • वेदनादायक मासिक पाळीच्या कळा
  • श्रोणिच्या स्नायूंचे कार्य बिघडणे

उपचार

या संशोधनानुसार, शस्त्रक्रियेद्वारे वाढलेल्या ऊती काढून टाकल्या जाऊ शकतात आणि त्यामुळे वेदना कमी होण्यास मदत होऊ शकते. मात्र, गाठी पुन्हा येऊ शकतात. हार्मोनल गर्भनिरोधक आणि वेदनाशामक औषधेही उपयुक्त ठरू शकतात.

९. पुरुषाच्या जननेंद्रियाचा आकार आणि रचना ( Penis Shape and Size)

जोडीदाराचे लिंग खूप जाड किंवा लांब असल्यास संभोगाच्या वेळी किंवा त्यानंतर वेदना होऊ शकतात.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डायबेटिस अँड डायजेस्टिव्ह अँड किडनी डिसीजेसच्या ‘Penile Curvature (Peyronie’s Disease)’ या संशोधनानुसार, पुरुषाचे जननेंद्रिय अधिक वाकलेले असल्यास लैंगिक संबंध वेदनादायी होऊ शकतात. लिंग वाकण्याचे एक सामान्य कारण म्हणजे पेरोनी रोग (Peyronie’s Disease). यामध्ये व्रणाच्या ऊतींमुळे (Scar Tissue) लिंग वाकू शकते.

पुरुषाच्या जननेंद्रियाच्या टोकावर किंवा बाहेरील भागावर केलेल्या पिअर्सिंगमुळे (Piercing) संभोगादरम्यान वेदना होऊ शकतात. त्यामुळे योनीच्या आतील भागाला फाटणे किंवा जखम होण्याची शक्यता असते आणि त्यासाठी वैद्यकीय उपचारांची आवश्यकता भासू शकते.

उपचार

‘Penile Curvature (Peyronie’s Disease)’ या संशोधनानुसार, वाकलेल्या लिंगावरील उपचारांमध्ये व्रणाच्या ऊतींवर उपचार करण्यासाठी इंजेक्शनचा समावेश असू शकतो. गंभीर प्रकरणांमध्ये शस्त्रक्रियेची आवश्यकता भासू शकते.

१०. झुकलेले गर्भाशय (Tilted Uterus)

झुकलेले गर्भाशय (Tilted Uterus किंवा Retroverted Uterus) म्हणजे गर्भाशय मूत्राशयाकडे (Bladder) पुढील बाजूस झुकलेले नसून, पाठीच्या कण्याकडे किंवा गुदाशयाकडे (Rectum) मागच्या बाजूस झुकलेले असणे.सामान्यतः महिलांमध्ये गर्भाशय पुढच्या बाजूला झुकलेले असते, परंतु सुमारे २०% ते २५% महिलांमध्ये ते नैसर्गिकरीत्या मागच्या बाजूला झुकलेले आढळते.

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित ‘Anatomy, Abdomen and Pelvis: Uterus’ या संशोधनानुसार, गर्भाशय मागे झुकलेले असल्यास लैंगिक संबंधांदरम्यान वेदना होऊ शकतात. गर्भाशयमुख (Cervix) योनीमार्गाच्या जवळ झुकलेले असल्यामुळे काही महिलांना वेदना जाणवू शकतात.

उपचार

या संशोधनानुसार, गर्भाशय तिरके असण्याचा अर्थ असा नाही की लैंगिक संबंध वेदनादायी असलेच पाहिजेत. जोडीदाराशी संवाद साधून अशा लैंगिक स्थिती निवडता येतात, ज्यामुळे उथळ किंवा वरवरचा प्रवेश (Shallow Penetration) शक्य होईल.

११. तणाव आणि चिंता (Stress or Anxiety)

तणाव, चिंता आणि मानसिक आघात यांसारखी मानसिक कारणे लैंगिक संबंधांदरम्यान किंवा त्यानंतर होणाऱ्या वेदनांना कारणीभूत ठरू शकतात.

युरोपियन जर्नल ऑफ पेनमध्ये प्रकाशित ‘Psychosocial Factors Associated with Pain and Sexual Function in Women with Vulvodynia: A Systematic Review’ या संशोधनानुसार, तणाव आणि चिंतेमुळे लैंगिक संबंधांदरम्यान त्रास होऊ शकतो आणि त्यामुळे वेदना जाणवू शकतात.

मेडलाइनप्लसवर प्रकाशित व्हल्वोडायनिया (Vulvodynia) विषयक माहितीनुसार, तणाव आणि चिंता या दोन्हींचा व्हल्वोडायनियाशी संबंध असू शकतो. यामुळे वेदना, जळजळ आणि टोचल्यासारखी भावना जाणवू शकते.

उपचार

व्हल्वोडायनियासंबंधित संशोधनानुसार, संज्ञानात्मक वर्तणूक थेरपी (Cognitive Behavioral Therapy – CBT) नकारात्मक विचार कमी करण्यास मदत करू शकते. ध्यानधारणा आणि इतर विश्रांती तंत्रांचाही उपयोग होऊ शकतो.

१२. लैंगिक आघात (Trauma)

पूर्वी लैंगिक आघात झाला असल्यास व्हॅजिनिस्मस (Vaginismus) होऊ शकतो. यामध्ये योनीच्या स्नायूंचे अनैच्छिक आकुंचन होते. त्यामुळे लैंगिक संबंध वेदनादायी किंवा काही वेळा अशक्यही होऊ शकतात.

उपचार

क्लिटोरिसला उत्तेजित केल्याने लैंगिक उत्तेजना मिळण्यास मदत होऊ शकते. समुपदेशन, फिजिओथेरपी, पेल्विक फ्लोअरचे व्यायाम आणि औषधे यांचाही उपचारासाठी उपयोग केला जाऊ शकतो.

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

जर तुम्हाला संसर्गाची लक्षणे दिसत असतील किंवा लैंगिक संबंधांदरम्यान होणाऱ्या वेदना दीर्घकाळ टिकत असतील, तर डॉक्टरांशी संपर्क साधा.

‘Dyspareunia’ संबंधित संशोधनानुसार, वेदनादायी लैंगिक संबंधांचा मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आत्मविश्वास कमी होणे किंवा स्वतःच्या शरीराबद्दल नकारात्मक भावना निर्माण होऊ शकतात. वेदनांबाबत चिंता वाढत असल्यास किंवा लक्षणे कायम राहिल्यास डॉक्टरांची मदत घ्यावी.

तज्ज्ञांचे मत काय?

ज्येष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. निखिल दातार यांनी लोकसत्ताला याबाबत माहिती देताना सांगितले की, “शारीरिक संबंधांनंतर वेदना होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. त्यापैकी वरील सांगितलेल्या कारणांमुळे शारीरिक संबंधांनंतर वेदना होऊ शकतात. शारीरिक संबंधांनंतर तुम्हाला अशी लक्षणे जाणवत असतील, तर स्वतःहून कोणतीही औषधे घेऊ नयेत. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय प्रतिजैविके घेतल्यास संसर्ग निर्माण करणाऱ्या जंतूंमध्ये औषधांविरोधात प्रतिकारशक्ती (रेझिस्टन्स) निर्माण होऊ शकते. त्यामुळे भविष्यात त्या औषधांचा परिणाम कमी होण्याची शक्यता असते.

याशिवाय, HPV या वायरस संसर्गामुळे पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही जननेंद्रियावरील तसेच काही प्रकारच्या कॅन्सरचा धोका निर्माण होऊ शकतो. HPVपासून संरक्षणासाठी लस उपलब्ध आहे. ही लस घेतल्यास लैंगिकदृष्ट्या सक्रिय व्यक्तींनाही HPVच्या काही ठराविक प्रकारच्या संसर्गापासून संरक्षण मिळण्यास मदत होऊ शकते. विशेषतः महिलांनी शारीरिक संबंध ठेवण्यापूर्वी ही लस घेतल्यास HPVच्या काही प्रकारच्या संसर्गापासून तसेच त्यातून होणाऱ्या गंभीर आजारांचा धोका कमी करण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे उपचारांसोबतच प्रतिबंधात्मक उपायांकडेही गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे.”