मासिक पाळी म्हणजे स्त्रियांच्या आयुष्यातील एक वरदान मानले जाते. प्रत्येक महिन्याला पाळी येणे हे चांगले आरोग्याचे लक्षण समजले जाते. परंतु, आजच्या धकाधकीच्या जीवनात महिलांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. बदलत्या जीवनशैलीमुळे महिलांचं महिन्याचं सायकल पूर्णपणे बदलतं. अशात मासिक पाळीदरम्यान अनेक समस्या जाणवतात. मासिक पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. या दिवसांत महिलांना पोटात दुखणं, हात-पाय दुखणं, चिडचिड होणं यांसारख्या अनेक वेदना आणि त्रासाला सामोरं जावं लागतं. कारण या दिवसात महिलांच्या हार्मोनलमध्ये बदल होत असतात.

मासिक पाळीच्या वेळी बहुतेक महिलांना झोपेचा त्रास होतो. काही स्त्रियांना त्यांच्या मासिक पाळीच्या दिवसांमध्ये चांगली आणि शांत झोप मिळत नाही. मासिक पाळीपूर्वी आणि मासिक पाळीनंतरची लक्षणं जसं की, चिंता, क्रॅम्स आणि डोकेदुखी यामुळे शांत झोपेमध्ये अडथळा येऊ शकतो. हार्मोन्समध्ये होणारे बदलही नियमित झोपेच्या चक्रातदेखील व्यत्यय आणू शकतात. याच विषयावर दिल्ली येथील मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या असोसिएट डायरेक्टर, प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. परिणिता कलिता यांनी माहिती दिल्याचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ.

(हे ही वाचा : रक्तदाबाची औषधे मधेच बंद केल्याने तुम्हाला अधिक नुकसान होऊ शकते? काय सांगतात डाॅक्टर…  )

डॉ. परिणिता कलिता सांगतात, “पाळी फक्त गर्भधारणेशी संबंधित नसून, मासिक पाळीचं चक्र नियमित राहिलं तर महिलांचं इतर आरोग्यही चांगलं राहतं. मासिक पाळीच्या दरम्यान महिलांना अस्वस्थता आणि त्रास जाणवणे ही खूप सामान्य गोष्ट आहे. मात्र, प्रत्येक स्त्रीच्या वेदना या वेगवेगळ्या असू शकतात. मासिक पाळीदरम्यान किंवा मासिक पाळी येण्याआधी पोटदुखीची समस्या अनेकांना जाणवते. मासिक पाळीच्या दरम्यान होणाऱ्या पोटदुखीमुळे अनेक वेळा थकवा जाणवतो. काहींना डोकेदुखी, पाठदुखी आणि कंबरदुखीची समस्यादेखील जाणवते, ज्यामुळे सामान्य झोपेचे चक्र विस्कळीत होते.”

“मासिक पाळीदरम्यान, इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनसारख्या हार्मोन्सच्या पातळीत बदल होतात. यामुळे झोपेच्या पद्धतींमध्ये बदल, मूड बदलणे आणि थकवा येऊ शकतो. अनेक महिलांना मासिक पाळीदरम्यान पोटदुखी, पोट फुगणे आणि पाठदुखीचा त्रास होतो; त्यामुळे विश्रांतीची जास्त गरज असते आणि थकवा वाढतो. एकीकडे वेदना सोसत दिवसभर काम करणं, तर दुसरीकडे अपुरी झोप; यामुळे महिलांना अधिक थकवा येतो किंवा आरोग्याच्या इतर समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणून मासिक पाळीमध्ये पुरेशी झोप घेणं अत्यंत गरजेचं असतं.”

मासिक पाळीदरम्यान झोप यावी म्हणून खालील गोष्टी करून पाहा

१. चांगल्या झोपेसाठी निश्चित झोपेचे वेळापत्रक असणे खूप महत्त्वाचे आहे. झोपेचं योग्य वेळापत्रक लावणं हे निरोगी राहण्यासाठी चांगलं आहे.

२. तणावाची पातळी कमी करण्यासाठी दीर्घ श्वास, ध्यान किंवा योग यांसारख्या विश्रांती तंत्रांचा सराव करा.

३. नियमितपणे व्यायाम करा. शारीरिक हालचालींमुळे झोपेची गुणवत्ता सुधारू शकते.

४. झोपायच्या आधी कॅफीन आणि जड जेवण टाळा. दुग्धजन्य पदार्थ तुम्ही घेऊ शकता.