Head Elevation Sleep :अनेक लोक विविध कारणांसाठी आपले डोके उंच करून झोपणे पसंत करतात. झोपताना डोक्याखाली उंच उशी किंवा दोन–तीन उशा ठेवण्याची सवय असते, म्हणजेच डोकं जमिनीच्या पातळीपेक्षा थोडं उंच ठेवले जाते. झोपताना शरीराची स्थिती आरोग्यावर मोठा प्रभाव टाकते. पण, या झोपेच्या स्थितीमागील विज्ञान समजून घेणे उपयुक्त ठरते, कारण यामुळे डोके उंच करून झोपण्याचे फायदे किंवा तोटे लक्षात येतील.

याबाबत दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना गुड डीड क्लिनिकचे संचालक वरिष्ठ न्यूरोलॉजिस्ट आणि डॉ. चंद्रिल चुघ सांगतात की, “झोपताना डोके उंच केल्यास गुरुत्वाकर्षणामुळे डोक्यात आणि मानेत असलेल्या रक्तवाहिन्यांवरील दाब कमी होतो.” मात्र ते इशारा देतात की, “जर डोकं जमिनीच्या पातळीपासून थोडं वर उंचावले तर साधारण १५–३०° कोन बनतो. हा कोन जास्त असल्यास रक्तप्रवाह मर्यादित होऊ शकतो, ज्यामुळे अस्वस्थता किंवा स्नायूंमध्ये कठीणपणा निर्माण होऊ शकतो.”

ही स्थिती विशेषतः त्यांच्यासाठी फायदेशीर ठरते, जे अॅसिड रिफ्लक्स किंवा श्वसनाच्या समस्यांशी झुंज देत आहेत. कोश्येस हॉस्पिटल, कन्सल्टंट फिजिशियन डॉ. पलेटी शिव कार्तिक रेड्डी सांगतात, “गुरुत्वाकर्षण यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. डोके उंच केल्यास पोटातील आम्ल अन्ननलिकेत परत येण्यापासून रोखले जाते, ज्यामुळे रात्री हृदय दाह किंवा अस्वस्थतेचा धोका कमी होतो.” अमेरिकन जर्नल ऑफ गॅस्ट्रोएंटेरॉलॉजीमध्ये प्रकाशित संशोधनानुसार, डोकं उंच करून झोपल्यास अॅसिड रिफ्लक्सच्या लक्षणांमध्ये लक्षणीय घट होते.

Award Banner

स्नायू आणि पाठीच्या कण्यावर याचा काय परिणाम होतो?

डॉ. चुघ सांगतात, “डोके योग्य कोनात, साधारणतः १५ ते ३० अंशात उंच असल्यास पाठीचा कणा (neutral spine) संतुलित किंवा तटस्थ राहतो.” मात्र, योग्य उंची न पाळल्यास काही समस्या उद्भवू शकतात. डॉ. रेड्डी चेतावणी देतात की, “जर डोके खूप उंच किंवा अयोग्य कोनात असेल तर मान आणि पाठीच्या वरच्या भागातील स्नायूंवर ताण येऊ शकतो आणि पाठीच्या कण्यामध्ये असंतुलन निर्माण होऊ शकते.”

झोपेचा दर्जा व्यक्तीनुसार वेगवेगळा असतो. श्वसनासंबंधी त्रास असलेल्या लोकांसाठी ही स्थिती विशेष लाभदायक ठरते. डॉ. रेड्डी सांगतात, “या स्थितीत वायुप्रवाहात योग्य प्रमाणात सुधारणा झाल्यामुळे वारंवार जाग येण्याचा त्रास टाळता येते आणि व्यक्तीला गाढ झोपेचा आनंद घेण्याची संधी मिळते.” मात्र डॉ. चुघ सांगतात, “जर डोके अयोग्य प्रकारे उंचीच्या स्थितीत असेल, तर ताण किंवा अस्वस्थता यामुळे झोपेची गुणवत्ता प्रभावित होऊ शकते.”

झोपेची ही स्थिती कोणी विचारात घ्यावी?

तज्ज्ञांच्या मते, डोकं उंच करून झोपणे या व्यक्तींना विशेष लाभ देऊ शकते:

अॅसिड रिफ्लक्स किंवा GERD असलेले लोक

स्लीप अप्निया (झोपताना श्वास काही काळ थांबणे किंवा खूप कमी होणे) किंवा जोरजोरात घोरणारे लोक

सायनसमध्ये अडथळा असलेले लोक

काही हृदयाच्या आजारांमध्ये, जसे की हृदय बंद होणे किंवा इतर स्थितींमध्ये, शरीरात किंवा फुप्फुसात द्रव साठू शकतो. अशा लोकांसाठी डोकं उंच करून झोपल्यास या द्रवसंचयामुळे निर्माण होणारा ताण कमी होऊ शकतो आणि श्वसन सुधारण्यास मदत होते.

कोणी टाळावे?

डॉ. चुघ सांगतात की, “कोणत्याही मान किंवा पाठीत त्रास असलेल्या लोकांनी डोकं उंच करून झोपल्यास अधिक ताण येतो, सावधगिरी बाळगावी.” डॉ. रेड्डी यांनी स्पष्ट केले की, “हायपोटेन्शन असलेल्यांना डोकं उंच करून झोपल्यास मेंदूत रक्तप्रवाह कमी होऊन त्रास वाढू शकतो.”

योग्य संतुलन शोधणे महत्त्वाचे आहे. डॉ. रेड्डी सुचवतात की, “अॅडजस्टेबल बेड किंवा अशा उशांचा वापर करावा, ज्यामुळे मान नैसर्गिकरीत्या वक्राकार स्थितीत राहण्यास मदत होईल, वजन सम प्रमाणात विस्थापित केले जाईल आणि मानेवरील ताण कमी होईल.”

दोन्ही तज्ज्ञ यावर जोर देतात की, “प्रत्येकाच्या शरीराच्या गरजेनुसार योग्य झोपेची स्थिती ठरवण्यासाठी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.”

सरतेशेवटी हे लक्षात घ्या की, आरोग्यासंदर्भात सर्वांना अनेक बाबींसाठी एकच उपाय लागू पडणार नाही. मुख्य म्हणजे योग्य कोन आणि आधार शोधावा, ज्यामुळे आरामदायी विश्रांती देऊ शकणारी झोप मिळेल.