How to prevent iron deficiency : सध्या सोशल मीडियावर तुम्हाला पडलेल्या तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर सापडते. परंतु, त्या उत्तराची किंवा उपायाची पडताळणी करणे हे अतिशय महत्त्वाचे असते. इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर आहारतज्ज्ञ दिशा सेठीने शरीरातील लोह कमतरतेवर एक रामबाण उपाय सांगणारा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या म्हणण्यानुसार बीट, अननस, लिंबाचा रस आणि आले यांना पाण्यात मिसळून पिण्याने ॲनिमिया कमी करण्यासाठी फायदा होऊ शकतो. मात्र, हे पेय खरंच फायदेशीर ठरू शकते का ते पाहा.

“बीटामध्ये नवीन लाल रक्तपेशी तयार करण्यासाठी आणि ॲनिमियाशी लढण्यासाठी भरपूर प्रमाणात लोह असते असे म्हटले जाते”, असे मुंबईतील परळ भागातील, ग्लेनिगल्स हॉस्पिटल्सच्या इंटर्नल मेडिसिन्स, वरिष्ठ सल्लागार, डॉक्टर मंजुषा अगरवाल यांनी म्हटले असल्याचे द इंडियन एक्स्प्रेसच्या एका लेखावरून समजते. “तसेच, अननसामध्ये उच्च प्रमाणात असणाऱ्या क जीवनसत्वामुळे रक्तात लोह शोषून घेण्यासाठी फायदा होत असून, संपूर्ण रोगप्रतिकारकशक्ती सुधारण्यासाठी मदत होते, असेही म्हटले जाते.” असंही पुढे डॉक्टर अगरवाल म्हणतात.

हेही वाचा : भेसळयुक्त खाद्यतेलाचे आरोग्यावर कोणते परिणाम होऊ शकतात? पाहा काय सांगतात डॉक्टर….

बीट, अननसाचा रस रक्तातील लोहासाठी फायदेशीर ठरू शकतो का?

या सर्व घटकांच्या एकत्रित रसामधून चांगल्या प्रमाणात डायटेरी लोह मिळते, खास करून बीटामधून. आणि हे लोह उत्तम प्रकारे शरीरात शोषून घेण्यासाठी अननस आणि लिंबाच्या रसातील उच्च क जीवनसत्त्वाचे प्रमाण मदत करते, असे बंगळुरूमधील HRBR लेआऊट, क्लाउडनाईन ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सच्या मुख्य क्लिनिकल आहारतज्ज्ञ अभिलाषा व्ही यांनी सांगितले आहे. “अननसातील ब्रोमेलेन आणि लिंबूमध्ये सायट्रिक ऍसिड पचनास मदत करतात, ज्यामुळे पोषक घटक उत्तमरीत्या शोषून घेतले जातात”, असे त्या म्हणतात.

मात्र, बीट-अननस आणि लिंबाचा रस घेताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. हा रस काहींसाठी फायद्याचा ठरू शकतो, मात्र काहींवर त्याचा विशेष परिणाम दिसणार नाही, असे डॉक्टर अगरवाल म्हणतात.

“या पेयामुळे तुम्हाला ऊर्जा मिळून तुमचा थकवा घालवण्यास मदत होऊ शकत असली तरीही शरीरातील लोहाची कमतरता दूर करण्यासाठी रामबाण उपाय म्हणू शकत नाही. सोशल मीडियावर दाखवल्या जाणाऱ्या गोष्टींचा लगेच प्रयोग करून पाहू नका. अशक्तपणा, चक्कर येणे किंवा डोके दुखणे, हृदयाचे ठोके वाढणे, अशक्त दिसणे, धाप लागणे आणि हात पाय थंड पडण्यासारख्या लोहाशी संबंधित लक्षणांबद्दल सावधगिरी बाळगा”, असा सल्ला डॉक्टर अगरवाल यांनी दिला आहे.

हेही वाचा : cinnamon skincare : चेहऱ्यावरील पिंपल्स घालविण्यासाठी ‘दालचिनी’ ठरेल गुणकारी? काय सांगतात तज्ज्ञ पाहा

डॉक्टर अगरवाल यांच्याशी सहमती दर्शवत, डॉक्टर अभिलाषा म्हणतात की, हे पेय जरी लोहाची पातळी वाढवण्यास मदत करू शकत असले, तरीही वैद्यकीय उपचार किंवा आरोग्यसेवा व्यावसायिकांनी सांगितलेल्या उपचारांमध्ये बदल करू नका.

ॲनिमिया, अशक्तपणा, डोकेदुखी, रेस्टलेस लेग सिंड्रोम, गर्भधारणेच्या समस्या, हृदय आणि फुफ्फुसाच्या समस्या आणि थकवा यांसारख्या लोहसंबंधी आरोग्याच्या तक्रारी भविष्यात होऊ नये यासाठी वेळोवेळी लोहाची पातळी तपासत रहा.

“जे डॉक्टर तुम्हाला आयर्न सप्लिमेंट्सबद्दल मार्गदर्शन करू शकतात अशांचा सल्ला घ्यावा आणि त्यांनी सांगितलेल्या डोसचे पालन करावे. पालेभाज्या, अंडी, भोपळ्याच्या बिया, बीन्स अशा लोहयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा. त्याचबरोबर ब्रोकोली, लाल आणि हिरव्या सिमला मिरची, फ्लॉवर, टोमॅटो, स्ट्रॉबेरी, अननस आणि खरबूज यांसारखे क जीवनसत्त्व असणारे पदार्थ खावे”, असे डॉक्टर अगरवाल म्हणत असल्याचे द इंडियन एक्स्प्रेसच्या एका लेखावरून समजते.