Brandy For Cough: हवामानात बदल झाला की सर्दी, खोकला यांचं सत्र सुरूच होतं. मग औषधं, गरम पाणी व बरेच घरगुती आणि इतर उपाय सुरू होतात. ज्यांना वारंवार सर्दी-खोकल्याचा त्रास होतो किंवा अॅलर्जी होते, त्यांचे उपचार किंवा औषधं बऱ्याचदा ठरलेली असतात. त्यामुळे ते डॉक्टरकडे न जाता, त्यांच्याच मनानं औषधं किंवा काही उपाय करतात. त्यामध्ये अनेकांचा असा समज असा आहे की, डॉक्टर ब्रँडी प्यायल्यानं कितीही जुनाट खोकला असेल तरी तो बरा होतो. अगदी एक छोटं झाकण ब्रँडी प्यायल्यास खोकला बरा होतो; पण हे खरं आहे का? ब्रँडी खोकला बरा करते का?
हिवाळ्यात खोकला, सर्दी किंवा घसा खवखवताना बरेच लोक ब्रँडी किंवा रम पिण्याचा सल्ला देतात. असे मानले जाते की, ब्रँडी तुमचा घसा साफ करते आणि सर्दीपासून आराम देते. मात्र, डॉक्टर हा घरगुती उपाय पूर्णपणे फायदेशीर आणि सुरक्षित मानत नाहीत. तज्ज्ञ स्पष्टपणे सांगतात की, कोणत्याही प्रकारचे अल्कोहोल पिणे हा खोकला किंवा सर्दी बरा करण्याचा योग्य मार्ग नाही. तर मग जाणून घेऊ यामागचे नेमके सत्य काय…
ब्रँडी हा इलाज नाही
डॉक्टर सांगतात की, गरम पाण्यासोबत रम किंवा ब्रँडी प्यायल्याने तात्पुरती उष्णता जाणवते. त्यामुळे लक्षणांपासून थोडा आराम मिळू शकतो. खोकला किंवा सर्दीसारख्या कोणत्याही विषाणूजन्य संसर्गावर हा उपाय नाही. उलट नियमित मद्यपान केल्याने रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ शकते. अनेक तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, अल्कोहोलमुळे रक्तवाहिन्या प्रसरण पावतात. त्यामुळे शरीरात उबदारपणाची भावना निर्माण होते. अशा परिस्थितीत ब्रँडी किंवा रम घशाच्या खवखवण्यावर साधारण सुन्न करणारा परिणाम करू शकते. मध, लिंबू किंवा मसाल्यांसोबत घेतल्यास तात्पुरता आराम मिळू शकतो; पण हा केवळ वरवरचा आराम आहे.
तज्ज्ञ काय म्हणतात…?
काही लोक मुलांना सर्दी आणि फ्लूपासून वाचवण्यासाठी एक चमचा ब्रँडीदेखील देतात. डॉ. रवी मलिक यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. त्यामध्ये त्यांनी त्याचे हानिकारक परिणाम सविस्तरपणे सांगितले आहेत. त्यांच्या मते, ब्रँडी हा सर्दी आणि फ्लूवर इलाज नाही. हा फक्त एक गैरसमज आहे, जो कालांतराने घरांमध्ये सामान्य झाला आहे. त्यांच्या मते, ब्रँडी मुलांसाठी धोकादायक असू शकते. त्यामुळे रक्तातील साखेरची पातळी वेगाने कमी होऊ शकते, त्यामुळे स्ट्रोकचा धोका उद्भवू शकतो. तसंच यामुळे श्वसनाच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. याव्यतिरिक्त मुलांच्या मेंदूच्या विकासावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
मग नेमके काय करायचे?
डॉक्टरांचे म्हणणे आहे की, खोकला आणि सर्दीसाठी मद्यापेक्षा गरम हर्बल टी जास्त फायदेशीर आहे. संशोधनानुसार गरम पेये प्यायल्याने खोकला, नाक वाहणे व शिंका येणे यांसारख्या लक्षणांपासून त्वरित आराम मिळू शकतो. तज्ज्ञ हिवाळ्यात हायड्रेटेड राहण्याचा, भरपूर विश्रांती घेण्याचा, कोमट द्रवपदार्थ पिण्याचा आणि खोकला किंवा सर्दी झाल्यास वाफ घेण्याचा सल्ला देतात. डॉक्टरांच्या मते, हे उपाय ब्रँडी किंवा रम पिण्यापेक्षा खूपच सुरक्षित आणि प्रभावी आहेत. गरम हर्बल टी जास्त फायदेशीर आहे. संशोधनानुसार, गरम पेये प्यायल्याने खोकला, नाक वाहणे आणि शिंका येणे यासारख्या लक्षणांपासून त्वरित आराम मिळू शकतो. तज्ज्ञ हिवाळ्यात हायड्रेटेड राहण्याचा, भरपूर विश्रांती घेण्याचा, कोमट द्रवपदार्थ पिण्याचा आणि खोकला किंवा सर्दी झाल्यास वाफ घेण्याचा सल्ला देतात. डॉक्टरांच्या मते, हे उपाय ब्रँडी किंवा रम पिण्यापेक्षा खूपच सुरक्षित आणि प्रभावी आहेत.

