Babie Care: डॉक्टर अनेकदा बाळ सहा महिन्यांचे झाल्यानंतर त्यांच्या शारीरिक वाढ आणि विकासासाठी त्यांना केळी खाऊ घालण्याचा सल्ला देतात. पण, केळ्याच्या सेवनाने बाळाला चांगली झोप लागू शकते? एका झोपेशी संबंधित सल्लागाराने त्याच्या इन्स्टग्रामवर शेअर केलेल्या पोस्टनुसार, “केळ्यांमध्ये मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते, जे स्नायूंना आराम आणि मज्जातंतू शांत करण्यास मदत करते. त्यामुळे लहान बाळाला अधिक शांत झोप येते. याव्यतिरिक्त त्यात ट्रिप्टोफॅन, एक अमिनो अॅसिड असते जे सेरोटोनिनमध्ये आणि नंतर मेलाटोनिनमध्ये रूपांतरित होते, जे झोपेला नियंत्रणात ठेवणारे हार्मोन आहे. त्यामुळे बाळाला शांत झोप येण्यासाठी त्याला नित्यक्रमानं केळी खाऊ घालण्याचा विचार करा”, असे लिहिण्यात आले आहे. अनेक पालकांना त्यांच्या बाळाला रात्री झोपवण्यासाठी खूप धडपड करावी लागते. त्यामुळे आम्ही सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या सल्लागाराच्या पोस्टमागील सत्य पडताळून पाहिले. त्यासाठी आम्ही एका तज्ज्ञांचा सल्ला घेतला. डॉ. संजू सिदाराद्दी, सल्लागार बालरोगतज्ञ आणि नवजात रोग विशेषज्ञ, मदरहूड हॉस्पिटल्स खारघर, नवी मुंबई यांनी आम्हाला सांगितले, "व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, फायबर, मॅग्नेशियम व पोटॅशियम यांसारख्या जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध असलेली केळी त्यांच्या मऊ आणि पचायला हलक्या अशा गुणधर्मांमुळे मुलांच्या रोजच्या आहारात समाविष्ट केली जातात. मॅग्नेशियम आणि पोटॅशियम स्नायूंना आराम देतात; ज्यामुळे बाळाला चांगली झोप येऊ शकते." डॉ. सिदाराद्दी पुढे म्हणाले, "केळी सेरोटोनिन आणि मेलाटोनिनच्या उत्पादनास प्रोत्साहन देऊ शकतात; ज्यामुळे तणाव आणि चिंता कमी होण्यास मदत होते आणि त्यामुळे झोप येण्यास मदत होते." "रिसर्च गेट अभ्यासामध्ये लहान बाळांना केळी खाऊ घालण्यावर आणि त्यामुळे येणाऱ्या झोपेवर अभ्यास करण्यात आला आहे. परंतु, बाळाला केळी खाऊ घालणे आणि त्यानंतर येणारी झोप यावरील चांगल्या दर्जाचे संशोधन फार कमी आहे”, असा दावा डॉ. सिदाराद्दी यांनी केला. हेही वाचा: स्टेनलेस स्टील, नॉन-स्टिकच्या तुलनेत नवा कूकवेअर आरोग्यासाठी फायदेशीर; जाणून घ्या तज्ज्ञांचे मत… डॉ. सिदाराद्दी यांनी सांगितले, "जर तुमच्या लहान बाळाला रात्री शांत झोप येत नसेल, तर काही घरगुती उपाय किंवा पर्यावरणीय बदल करून पाहा. ही समस्या सतत वाढत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेण्याचा विचार करा" तज्ज्ञांनी नमूद केले की, बाळाला रात्री शांत झोप न येण्यामागे विविध कारणे असू शकतात. "पण त्याच्या प्रभावी निदानासाठी त्यांची त्वरित तपासणी केली जाणे अत्यावश्यक आहे", असे डॉ. सिदाराद्दी यांनी सांगितले.