तुम्ही आहारातून रोज अनेक पदार्थ खात असता; पण हे सर्व पदार्थ तुमच्या आतड्यांना पचवायला जमतातच, असे नाही. म्हणजे तुम्ही एखादा पदार्थ आवडीने खाता; पण तो पोटात गेल्यानंतर तुमच्या आतड्यांना पचवता येतोच, असे नाही. अशाने अनेकांना अॅसिडिटीचा त्रास होतो. पण, काही पदार्थ खाल्ल्यानंतर ते सहज पचतात आणि काही त्रासही जाणवत नाही. त्यामुळे तुम्ही पाहिले असेल की, घरातील मंडळीदेखील एखादा पदार्थ रात्री खाऊ नकोस, पचायला जड जातो, असे सांगताना दिसतात. याच विषयाला धरून दी इंडियन एक्स्प्रेसने काही आहारतज्ज्ञांचे मते घेतली आहेत. त्यात त्यांनी रोजच्या आहारातील एखादा पदार्थ पचण्यासाठी किती वेळ लागतो? आणि पोटातील आतड्यांना आरामदायी वाटावे म्हणून कोणत्या पदार्थांचे मर्यादित सेवन केले पाहिजे याविषयी सांगितले आहे.

पोषणतज्ज्ञ नमिता सतीश यांच्या मते, “सामान्यतः पचनक्रिया १० ते ७२ तासांपर्यंत असते. अन्न संयोजन, खाण्याची वेळ, चावण्याचे प्रमाण व चयापचय दर या सर्वांचा एकत्रितपणे पोट रिकामे होण्याच्या आणि पचनाच्या वेळेवर परिणाम होतो.”

पोषण सल्लागार बानी चावला यांना असा विश्वास आहे की, अन्न पचण्यासाठी लागणारा वेळ वेगवेगळ्या अन्न गटांनुसार बदलतो आणि ते एखाद्या व्यक्तीचे वय, तणाव पातळी यांवरदेखील अवलंबून असते.

कोणत्या प्रकारचे अन्नपदार्थ पचायला किती वेळ लागतो?

कार्बोहायड्रेट्स : कार्बोहायड्रेट्सयुक्त पदार्थ पचायला फार हलके असतात. जसे की, फळे, तांदूळ, पास्ता यांसारखे पदार्थ पचायला २० मिनिटे लागतात. साधारण दोन ते तीन तासांत ते पूर्णपणे पचतात. पण तृणधान्य, बीन्स व भाज्या यांमध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स असतात आणि त्यात फायबरचे प्रमाणही अधिक असते. त्यामुळे ते पचायला सुमारे चार ते सहा तास लागतात. फायबरमुळे पचन प्रक्रिया मंदावते आणि पोट भरल्यासारखे वाटते.

प्रोटीन : कार्बोहायड्रेट्सच्या तुलनेत प्रोटीनयुक्त पदार्थ पचण्यास अधिक वेळ लागतो. त्यांच्या पचन होण्यासाठी एन्झाइमॅटिक क्रियेची आवश्यक असते, ज्यामुळे त्यांचा पचनाचा कालावधी वाढतो. मासे किंवा चिकन यांसारखे प्रोटीनयुक्त पदार्थ पचण्यास तीन ते चार तास लागतात. अधिक जटिल प्रोटीन, जसे की रेड मीट, बीन्स, शेंगदाणे पचण्यास सहा ते आठ तास लागू शकतात.

फॅट्स : फॅट्सयुक्त पदार्थ पचायलाही जास्त वेळ लागतो. जसे की, पनीर, चीज, नट्स व तळलेले पदार्थ यांसारखे फॅट्सयुक्त पदार्थांच्या सेवनाने पचनक्रिया मंदावते. कारण- या पदार्थांमध्ये जटिल रेणू असतात आणि त्यामुळे त्यांच्या विघटन प्रक्रियेसाठी यकृतातील पित्ताची आवश्यकता असते. हे फॅट्स पोट आणि आतड्यांमधून जाण्यासाठी सहा ते आठ तास लागू शकतात.

जे पदार्थ पचायला जास्त वेळ घेतात, त्यात बर्गर व फॅटी फिश यांसारख्या जास्त फॅट्सयुक्त पदार्थांचा समावेश होतो. हे पदार्थ फॅटी असल्याने ते पचनसंस्थेत १२ तास किंवा त्याहून अधिक काळ राहू शकतात आणि त्यामुळे पचनक्रिया मंदावते.

अन्न गटपचनासाठी लागणारा वेळ
पाणी३० ते ६० मिनिटे
30 ग्रॅम व्हे प्रोटीन ड्रिंक५० ते १४० मिनिटे
मांसाहारी पदार्थ२ ते ३ तास
व्हाइट ब्रेड, व्हाइट राईस३० ते ६० मिनिटे
साबुदाणे, ब्राउन ब्रेड, ओट्स१.५ तास
बीन्स, मसूर, चणे२ तास

प्राग्मॅटिक न्यूट्रिशनच्या चीफ न्यूट्रिशनिस्ट मीनू बालाजी यांनी सांगितले की, विविध परिस्थितींनुसार पचनास साधारणपणे १४ ते ७२ तास लागू शकतात; परंतु सरासरी वेळ २८ तासांचा असतो

ज्यूस, पाया सूप किंवा रस्सा यांसारखे पदार्थ लगेच पचतात; पण फायबर, प्रोटीन किंवा फॅट्सयुक्त पदार्थ पचायला जास्त वेळ लागतो. तृणधान्य, कडधान्ये, भाज्या, लीन प्रोटीन व आहार तुमच्या आरोग्यासाठी चांगला असतो,असेही त्यांनी स्पष्ट केले. कारण- या पदार्थांच्या सेवनाने पोट जास्त वेळ भरल्यासारखे राहते.

जे पदार्थ रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करतात आणि तुमचे एकंदर आरोग्य सुधारतात. अशा पदार्थांना पोषणयुक्त पदार्थ, असे म्हणतात.

न्यूट्रिशनिस्ट मीनू बालाजी यांच्या मते, मिठाई, साखरयुक्त पेये व भरपूर साखर असलेले इतर प्रक्रिया केलेले पदार्थ हे सर्वांत कमी आरोग्यदायी असतात. असे पदार्थ वजन वाढण्यास प्रोत्साहन देतात, आवश्यक पोषक घटक ते पुरवू शकत नाहीत आणि रक्तातील साखर मात्र वाढवू शकतात. या सर्व बाबी तुमच्या शरीरात जळजळ वाढवण्यास कारणीभूत ठरू शकतात.

दुसरीकडे मांस, मासे, भाज्यांसारखे फायबरयुक्त पदार्थ पचायला जास्त वेळ घेतात. त्यामुळे तळलेले पदार्थ किंवा लाल मांस मोठ्या प्रमाणात खाल्ल्याने तुम्हाला सुस्ती येते.