मुंबई : अलीकडील काळात डायबेटीस आणि लठ्ठपणा या दोन मोठ्या आरोग्य समस्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आधुनिक औषधांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. विशेषतः वजन कमी करण्यासाठी वापरली जाणारी आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणारी जीएलपी-१ श्रेणीतील औषधे सध्या खूप लोकप्रिय झाली आहेत. मात्र, यातील काही औषधांच्या वापराबाबत आता डॉक्टरांनी एक गंभीर इशारा दिला आहे. काही रुग्णांमध्ये या औषधांमुळे डोळ्यांवर विपरीत परिणाम होत असल्याची प्रकरणे समोर येत आहेत.
विख्यात नेत्रशल्यचिकित्सत डॉ तात्याराव लहाने यांच्या म्हणण्यानुसार यातील काही औषधांचा वापर केल्यानंतर काही लोकांमध्ये अचानक दृष्टी कमी होणे, धूसर दिसणे किंवा डोळ्यांशी संबंधित इतर समस्या निर्माण होऊ शकतात. विशेषतः ज्यांना आधीपासून डायबेटीस आहे आणि ज्यांना डायबेटिक रेटिनोपॅथीचा त्रास आहे, अशा रुग्णांमध्ये हा धोका अधिक असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. डायबेटिक रेटिनोपॅथी ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये डोळ्यांच्या रेटिनातील रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो आणि वेळेवर उपचार न केल्यास दृष्टी गमावण्याची शक्यता असते. याशिवाय डॉक्टरांनी रुग्णांना काही लक्षणांकडे विशेष लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे. जर औषधे घेतल्यानंतर अचानक दृष्टी धूसर होणे, डोळ्यांमध्ये वेदना जाणवणे किंवा दृष्टी कमी होण्याची लक्षणे दिसू लागली तर तात्काळ नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते.
डॉक्टर लहाने सांगतात की, जीएलपी-१ औषधांमुळे डोळ्यांवर होणारे परिणाम समजून घेणे आवश्यक आहे. या औषधांमुळे रक्तातील साखर जलदगतीने कमी होते. ही अचानक घडणारी सुधारणा काही रुग्णांमध्ये डायबेटिक रेटिनोपॅथी वाढवू शकते.तसेच रुग्णांना डोळ्यांसमोर काळे ठिपके दिसणे,धूसर दिसणे, अचानक दृष्टी कमी होणे हे त्रास जाणवू शकतात.रक्तातील साखरेतील झपाट्याने बदल झाल्यामुळे डोळ्याच्या लेन्समध्ये सूक्ष्म बदल होतात.त्यामुळे काही दिवस रुग्णांना चष्म्याचा नंबर बदलल्यासारखे वाटते.हा त्रास बहुधा तात्पुरता असतो.( मॅक्युलर एडिमा )पित्त बिंदू वर सुज वाढण्याची शक्यता असते.ज्यांना आधीच रेटिनोपॅथी आहे, त्यांच्यात मॅक्युला सुजणे (मॅक्युलर एडिमा) वाढू शकते.यामुळे वाचन आणि सूक्ष्म कामांमध्ये अडथळे येतात. काही अहवालांनुसार ऑप्टिक नर्व्हवर परिणाम होण्याची शक्यता नमूद केली आहे.यामध्ये अचानक, वेदनारहित दृष्टी कमी होऊ शकते.हा प्रकार अत्यंत दुर्मिळ असला तरी गंभीर आहे.
कोणाला जास्त धोका?
ज्या रुग्णांना दीर्घकाळ मधुमेह तसेच आधीपासून रेटिनोपॅथी असलेले,एचबीए १सी खूप जास्त असताना औषध सुरू केलेले आणि साखर अचानक कमी झालेल्यांनी ही औषधी घेण्यापूर्वी तज्ज्ञांचे मार्गदर्शन फार महत्वाचे आहे.जीएलपी-१ औषधे सुरू करण्यापूर्वी आणि उपचारादरम्यान काही गोष्टी पाळणे आवश्यक आहे. यात औषध सुरू करण्यापूर्वी डोळ्यांची तपासणी करावी तसेच ३ ते ६ महिन्यांनी नियमित नेत्रतपासणी करावी,साखर नियंत्रण हळूहळू साधावे असे डॉ लहाने सांगतात.जीएलपी-१ औषधे ही आधुनिक वैद्यकीय क्षेत्रातील एक प्रभावी देणगी आहे.परंतु वजन कमी करण्याच्या प्रयत्नात दृष्टीवर परिणाम होऊ नये, यासाठी जागरूकता आणि नियमित तपासणी अत्यावश्यक आहे. योग्य मार्गदर्शनाखाली घेतलेली काळजीच सुरक्षित आरोग्याची गुरुकिल्ली आहे. वजन कमी करणे महत्त्वाचे आहे, पण दृष्टी गमावून नव्हे, असा सल्लाही डॉ लहाने आवर्जून देतात.
अनेकदा लोक वजन कमी करण्याच्या घाईत किंवा सोशल मीडियावर मिळालेल्या माहितीवर विश्वास ठेवून स्वतःहून औषधे घेण्यास सुरुवात करतात. ही प्रवृत्ती धोकादायक ठरू शकते असेही डॉक्टर तात्याराव लहाने यांनी सांगितले.तज्ज्ञ सांगतात की जीएलपी-१ वर्गातील औषधे शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यास मदत करतात आणि भूक कमी करून वजन घटवतात. मात्र या औषधांचा परिणाम शरीरातील विविध अवयवांवर होऊ शकतो. डोळ्यांमधील सूक्ष्म रक्तवाहिन्यांवर होणारा परिणाम हा त्यापैकी एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे अशा औषधांचा वापर करताना नियमित नेत्रतपासणी करणे अत्यावश्यक आहे.
आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की या औषधांचा वापर पूर्णपणे टाळण्याची गरज नाही, कारण ती अनेक रुग्णांसाठी फायदेशीर ठरतात. मात्र त्यांचा वापर डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आणि योग्य तपासणीनंतरच करणे आवश्यक आहे. विशेषतः ज्यांना आधीपासून डोळ्यांचे आजार आहेत, त्यांनी अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे. एकूणच आधुनिक औषधोपचारामुळे अनेक आजारांवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले असले तरी त्याचे दुष्परिणामही लक्षात घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. डायबेटीस आणि वजन कमी करण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या औषधांमुळे होणाऱ्या संभाव्य दृष्टी समस्यांबाबत जागरूकता वाढवणे ही काळाची गरज आहे. योग्य वेळी तपासणी, डॉक्टरांचा सल्ला आणि सावधगिरी बाळगल्यास या धोका टाळता येऊ शकतो.
