Drinking Water Side Effects in Summer Heatwave: देशभरात सध्या प्रचंड उष्णतेची लाट पसरली असून अनेक ग्रामीण भागासह शहरे होरपळून निघत आहेत. दुपारच्या वेळेत थेट उन्हाच्या संपर्कात जाण्याचे टाळा, असे आवाहन सरकारी विभागांनी केलेले आहे. मात्र ज्यांचे फिरतीचे काम आहे, त्यांना उन्हात बाहेर पडल्याशिवाय गत्यंतर नाही. दिल्लीतील २५ वर्षीय मार्केटिंग एक्झिक्युटिव्हला दुचाकीवरून दिवसभर एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात फिरावे लागते. उन्हापासून सुरक्षित राहावे, यासाठी हा तरुणही दिवसभर पाणी पित होता, आपण योग्य करतोय अशी जाणीवही त्याला होती. पण दिवसअखेर त्याची प्रकृती खालावली आणि त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले. अखेर या तरुणाबरोबर काय झाले? उन्हाळ्यात बाहेर काम करत असताना नेमकी कोणती काळजी घ्यावी? याबाबत आता डॉक्टर रोमेल टिकू यांनी माहिती दिली आहे.
संबंधित तरुण मार्केटिंगच्या कामासाठी दुचाकीवरून दिल्लीच्या वेगवेगळ्या भागात फिरत होता. यावेळी तो अधेमधे आपली पाण्याची बाटली भरून घेत होता आणि थोड्या थोड्या अंतराने व्यवस्थित पाणी घेत होता. मात्र या तरुणाने जेवणाची काळजी घेतली नाही. सकाळी उशीर झाल्यामुळे तो काहीही न खाता घराबाहेर पडला. त्यानंतर लागोपाठ लागलेल्या मीटिंगमुळे त्याच्या जेवणाची वेळ टळत होती. दिवसभरात त्याने एकही फळ खाल्ले नाही, इलेक्ट्रोलाइट किंवा इतर कोणतेही पेय घेतले नाही. तो केवळ पाणी पित होता आणि इथेच त्याची मोठी चूक झाली, असे डॉ. टिकू सांगितले.
डॉ. रोमेल टिकू हे आरोग्याच्या विषयावर द इंडियन एक्सप्रेससाठी नियमित लिखाण करत असतात. सध्या देशभरात सुरू असलेल्या उष्णतेच्या प्रकोपापासून वाचण्यासाठी काय काळजी घेतली जावी, याबद्दल त्यांनी काही रुग्णांचे दाखले देऊन माहिती दिली. दिल्लीतील २५ वर्षीय तरुणाची नेमकी चूक काय झाली? इतरांनी यापासून काय धडा घेणे गरजेचे आहे, याबद्दलही डॉ. टिकू माहिती देतात.

फक्त पाण्यावर राहणाऱ्या तरुणाबरोबर काय झाले?
डॉक्टरांनी सांगितले की, दिवसभर फक्त पाणी घेतल्यामुळे तरुणाला सायंकाळी चक्कर येऊ लागली. त्यानंतर मळमळ सुरू झाली. दिवसभराच्या थकव्यामुळे हे झाले असावे, असा विचार करून त्याने याकडे दुर्लक्ष केले. दिवसभरातील निर्धारित लक्ष्य पूर्ण करण्यासाठी तो धावपळ करत राहिला. मात्र सायंकाळी त्याला बोलणेही जड जाऊ लागले. मरगळ आली. त्याची परिस्थिती पाहून सहकाऱ्यांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले.
रक्ताची तपासणी केल्यानंतर समजले की, त्याच्या रक्तातील सोडियमची पातळी १२४ पर्यंत घसरली होती. जी १३५ ते १४५ या सामान्य मर्यादेपेक्षा खूपच खाली आली होती. घामाद्वारे शरीरातील मीठ कमी झाल्यामुळे रक्तातील सोडियमची मोठ्या प्रमाणात घट झाली होती. यालाच ‘अक्यूट हायपोनेट्रेमिया’ असे म्हणतात. यातच पाण्याचे अतिसेवन केल्यामुळे परिस्थिती आणखी खालावली.
दिल्लीतल्या तरुणाची केस एकमेव नाही. संपूर्ण भारतात तापमानाचा पारा वाढला असून अनेक ठिकाणी कमाल तापमान ४४ ते ४७ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले आहे. उष्माघाताशी संबंधित आजारांमुळे रुग्णालयात अनेक रुग्ण दाखल होत आहेत.
उष्णता हानिकारक कधी होते?
घाम येणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया असून यामुळे शरीराचे तापमान स्थिर राहते. त्वचेवरील घामाचे बाष्पीभवन होताना उष्णता बाहेर टाकली जाते आणि शरीराचे तापमान नियंत्रित राहते. पण शरीरातून बाहेर पडणारा घामात केवळ पाणी नसते. त्यात सोडियम, क्लोराईड, पोटॅशियम आणि इतर इलेक्ट्रोलाइट्स असतात. हे इलेक्ट्रोलाइट्स शरीरासाठी अतिशय महत्त्वाची असतात. त्यातून स्नायूंचे आकुंचन, द्रवांचे संतुलन आणि हृदयाची लयीचे नियमन होत असते.

सामान्य परिस्थितीत इलेक्ट्रोलाइट्स शरीरातून बाहेर पडले तरी ही हानी माफक असते. कारण नियमित अन्न व पाणी घेतल्यास याची गरज भरून काढली जाते. परंतु तीव्र उष्णतेच्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्यास आणि त्याबरोबर शारीरिक श्रम केल्यास, त्याचा विपरित परिणाम होऊ शकतो.
भारतात साधारण उन्हाळ्यात भरपूर पाणी प्या असा सल्ला सर्रास दिला जातो. चांगल्या हेतून हा सल्ला दिला जात असला तरी तो अपूर्ण माहितीच्या आधारावर आहे. शरीरातून घामाद्वारे बाहेर पडणाऱ्या इलेक्ट्रोलाइट्सची भरपाई केवळ पाण्याने होऊ शकत नाही. किंबहुना पुरेसे मीठ न खाता अतिरिक्त प्रमाणात पाणी प्यायल्यास रक्तातील सोडियमची पातळी कमी होते. ज्यामुळे दिल्लीतील तरुणाला ज्याप्रमाणे रुग्णालयातील अतिदक्षता विभागात भरती करावे लागले, तशी परिस्थिती ओढवू शकते.
हायपरनॅट्रेमिया धोका
डॉ. रोमेल टिकू यांनी सांगितल्याप्रमाणे, जेव्हा रक्तामध्ये सोडियमची कमतरता असते तेव्हा शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढू लागते आणि त्यामुळे शरीरावर सूज येते. यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. रक्तामध्ये सोडियमची कमतरता हायपोनेट्रेमिया म्हणून ओळखली जाते. तीव्र उष्णतेमध्ये एखादी व्यक्ती बराच काळ थांबल्यानंतर त्याच्या शरीरातून अतिरिक्त घाम बाहेर पडतो. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे रक्तातील सोडियमचे प्रमाण वाढत जाते.
हायपोनेट्रेमियामुळे पेशी फुगतात, याच्या उलट हायपरनॅट्रेमियामध्ये पेशींमधून पाणी बाहेर खेचले गेल्याने त्या आकुंचन पावतात. याची लक्षणे म्हणजे, घशाला कोरड पडणे, स्नायू आखडणे, डोळ्यासमोर अंधारी येणे. गंभीर प्रकरणांमध्ये हायपरनॅट्रेमियाची स्थिती अधिक काळ राहिल्यास मज्जासंस्थेशी निगडित कायमचा धोका निर्माण होऊ शकतो.

अधिक विचारपूर्वक पाणी पिणे गरजेचे
डॉ. रोमेले टिकू यांनी पुढे म्हटले की, दिल्लीतील तरुणाबरोबर जे झाले, त्यातून इतरांनी धडा घ्यायला हवा. हायड्रेट राहणे म्हणजे फक्त पाणी पिणे नव्हे. शरीराला द्रव्य आणि क्षार या दोहोंचे योग्य प्रमाण हवे असते. चिमूटभर मीठ घातलेले ताक, नारळाचे पाणी, मीठ आणि साखर घातलेले लिंबू पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्सने समृद्ध असलेले पदार्थ घेतल्यामुळे घामामुळे कमी होणारे घटक पुन्हा भरून काढण्यास मदत होते. याबरोबरच नियमित आहार घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
वेळेचे नियोजन करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. दुपारच्या वेळेस तीव्र उन्हात बाहेर पडणे टाळायला हवे. बाहेर पडल्यानंतर सावलीच्या ठिकाणी आसरा घेणे किंवा सुरुवातीच्या लक्षणांना लगेच ओळखून वैद्यकीय उपचार घेणे लाभदायक ठरू शकते.
