Dehydration boosts Blood Sugar: रक्तातील साखरेचे (Blood Sugar) प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी आपण अनेकदा आहार आणि व्यायामावर लक्ष देतो. मात्र पाणी हा घटक यामध्ये किती महत्त्वाची भूमिका बजावतो याकडे अनेकदा दुर्लक्ष होते. आहारतज्ज्ञांच्या मते, शरीरातील डिहायड्रेशन (Dehydration) तुमच्या रक्तातील साखरेची पातळी प्रत्यक्षात आहे, त्यापेक्षा जास्त दाखवू शकते. यालाच तज्ज्ञांनी ‘चहाचा परिणाम’ (Chai Effect) असे म्हटले आहे.
काय आहे हा चहासारखा परिणाम…
डायबिटीज एज्युकेटर कनिक्का मल्होत्रा यांनी दि इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, “ज्याप्रमाणे चहामध्ये दूध कमी टाकल्यास तो जास्त ‘कडक’ किंवा गडद होतो, अगदी तसेच शरीरात पाणी कमी असल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण अधिक एकवटलेले (Concentrated) दिसते. यामुळे रीडिंग घेताना शुगर लेव्हल वाढलेली दिसते.” रक्तातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे ग्लुकोजची घनता वाढते.
तज्ज्ञ काय म्हणतात?
आहारतज्ज्ञ गरिमा गोयल सांगतात की, “पाण्यामध्ये कॅलरीज किंवा कार्बोहायड्रेट्स नसतात. त्यामुळे ते थेट साखर वाढवत नाही. उलट योग्य हायड्रेशनमुळे शरीर ग्लुकोजवर अधिक कार्यक्षमतेने प्रक्रिया करू शकते आणि इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारते.”
डायबेटोलॉजिस्ट डॉ. विजय नेगलूर सांगतात की, “पुरेसे पाणी न पिणे किंवा चुकीच्या वेळी पाणी पिणे रक्तातील ग्लुकोजच्या वर्तनावर परिणाम करू शकते. पाणी औषधाप्रमाणे साखर कमी करत नाही, पण साखरेचे संतुलन राखण्यास मदत करते.”
तहान की भूक? गोंधळ टाळा
अनेकदा शरीराला पाण्याची गरज असते, पण आपल्याला भूक लागल्याचा भास होतो. याला ‘फॉल्स हंगर सिग्नल्स’ म्हणतात. डिहायड्रेशनमुळे गोड खाण्याची तीव्र इच्छा (Cravings) होऊ शकते. यामुळे व्यक्ती जास्त स्नॅक्स खाते आणि परिणामी रक्तातील साखर वाढते. नियमित पाणी प्यायल्याने या खोट्या भूकेवर नियंत्रण मिळवता येते.
पाणी पिण्याची योग्य पद्धत
साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी तज्ज्ञांनी खालील ‘हायड्रेशन स्ट्रॅटेजी’ सुचवली आहे…
१. एकाच वेळी जास्त पाणी पिऊ नका. दिवसभर थोड्या थोड्या अंतराने पाणी पिणे (Sipping) जास्त फायदेशीर आहे. यामुळे रक्ताचे प्रमाण (Blood Volume) स्थिर राहते.
२. जेवणापूर्वी १-२ तास आधी एक ग्लास पाणी प्यायल्याने पचन सुधारते.
३. जेवणानंतर लगेच पाणी पिणे टाळा. जेवण झाल्यावर किमान ३० ते ४० मिनिटांनी पाणी पिणे योग्य ठरते.
४. कोमट पाणी आरोग्यासाठी उत्तम आहे. अतिशय थंड पाण्यापेक्षा खोलीच्या तापमानाचे किंवा कोमट पाणी पचनासाठी चांगले असते.
रक्तातील साखर स्थिर ठेवण्यासाठी केवळ संतुलित आहार आणि व्यायाम पुरेसा नाही, तर योग्य प्रमाणात पाणी पिणे ही एक साधी पण अत्यंत महत्त्वाची सवय आहे.

