Kidney Health: तुमच्या मूत्रपिंडाचे अर्थात किडनीचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी संतुलित आहार हा सर्वात महत्त्वाचा आहे. याव्यतिरिक्त, जर तुम्ही दररोज काही पदार्थांचे सेवन केले, जे पदार्थ किडनीचे कार्य सुधारण्यास मदत करतात; तर तुमची किडनी अगदी वृद्धापकाळापर्यंत तरूण राहू शकते.
किडनी आपल्या शरीरासाठी फिल्टर म्हणून काम करते. किडनी रक्त स्वच्छ करतात, शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकतात आणि हानिकारक द्रवपदार्थ बाहेर टाकतात. किडनी निरोगी ठेवण्यासाठी योग्य, पोषक तत्वांनी समृद्ध अन्न खाणे आवश्यक आहे. काही ठराविक सुपरफूड्स आहेत, जे निरोगी आहारासोबत सेवन केल्यास किडनीवरील ताण कमी करण्यास आणि कार्यक्षमता सुधारण्यास मदत होते.
सफरचंद
अमेरिकेच्या नॅशनल किडनी फाउंडेशनच्या अहवालानुसार, सफरचंद किडनीचे चांगले कार्य राखण्यास मदत करू शकते. त्यामुळे ते खरोखरच एख वरदान आहे. सफरचंदांमध्ये फायबर आणि असंख्य अँटीऑक्सिडंट्स असतात. ते शरीरातील हानिकारक पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतात, त्यामुळे किडनीवरील ताण कमी होतो आणि योग्यरित्या कार्य करण्यास मदत होते.
लाल शिमला मिरची
लाल शिमला मिरची ही किडनीसाठी सर्वोत्तम भाज्यांपैकी एक आहे. त्यामध्ये पोटॅशियम कमी असते, मात्र व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन बी ६ भरपूर प्रमाणात असते. हे अँटीऑक्सिडंट्स किडनीच्या पेशींचे संरक्षण करतात आणि रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करतात. ते किडनी फिल्टरेशन सुधारण्यास देखील मदत करतात.
बेरी
स्ट्रॉबेरी, रास्पबेरी, ब्लॅकबेरी आणि ब्लूबेरी यासारखी छोटी फळे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्सचे पॉवर हाऊस आहेत. ते शरीरातील जळजळ कमी करण्यास मदत करतात आणि मूत्रपिंडाच्या पेशींना नुकसान होण्यापासून वाचवतात. त्यामध्ये पोटॅशियम आणि फॉस्फरस देखील कमी असतात, त्यामुळे ते किडनीच्या आरोग्यासाठी सुरक्षित असतात.
ब्रोकोली
ब्रोकोली हे व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के आणि फोलेटचा उत्तम स्त्रोत आहे. ते डिटॉक्सिफायिंग एन्झाइम्सना समर्थन देते आणि किडनीचे कार्य सुरळीत राहण्यास मदत करते. ही कमी प्रथिने असलेली भाजी आहे, म्हणून किडनीच्या समस्या असलेल्या लोकांसाठी ती सुरक्षित मानली जाते. ब्रोकोलीमधील व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढवते, त्यामुळे तुम्हाला वारंवार होणारे आजार टाळण्यास मदत होते.
लसूण
लसूण किडनीचे संरक्षण करण्यास मदत करू शकते. लसूणमध्ये अनेक शक्तिशाली संयुगे असतात, जे किडनीच्या पेशींना नुकसान होण्यापासून वाचवतात. ते जळजळदेखील कमी करते, त्यामुळे किडनीचे कार्य सुधारते.
