Side Effects Of High Protein: प्रोटीन हा आपल्या आहाराचा एक महत्त्वाचा घटक आहे, जो स्नायूंची निर्मिती, वाढ आणि दुरुस्तीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. परंतु, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक विशेषतः प्रोटीनचा शरीरावर उलट परिणाम करू शकतो, तर तुम्हीही प्रोटीनची गरज पूर्ण करण्याच्या प्रयत्नात अतिरेक केला तर काय होईल? सर एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलच्या पोषण आणि आहारशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. आयलीन कॅन्डे यांनी इंडियन एक्स्प्रेस डॉटकॉमला सांगितले की, दीर्घकाळापर्यंत प्रोटीनचे जास्त सेवन आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते, ज्यामुळे शरीरातील कचरा चयापचय करण्यासाठी जबाबदार असलेल्या अवयवांच्या कार्यात अडथळा निर्माण होऊ शकतो.
“यामुळे हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी समस्या, रक्तवाहिन्यांच्या समस्या, यकृत आणि मूत्रपिंडांना दुखापत होऊ शकते, तसेच टाइप-२ मधुमेह असलेल्या लोकांच्या आरोग्यालाही धोका वाढू शकतो,” शरीरात जास्त प्रमाणात प्रोटीन प्रक्रिया केलेले मांस खाणाऱ्यांना कर्करोगाचा धोका वाढू शकतो, तसेच आहारात आवश्यक खनिजांची कमतरता असल्यास ऑस्टियोपोरोसिस आणि ऑस्टियोपेनियादेखील होऊ शकतो.
“निरोगी लोकांना त्यांच्या प्रोटीनचे सेवन दुप्पट किंवा तिप्पट करण्याची आवश्यकता नाही. सामान्यतः शारीरिकदृष्ट्या सक्रिय लोक, जसे की खेळाडू, जीममध्ये जाणारे, गर्भवती, स्तनपान देणारी महिला, कर्करोगासाठी वैद्यकीय उपचार घेत असलेल्या किंवा डायलिसिसवर असलेल्या लोकांना प्रति किलो शरीराच्या वजनासाठी एक ग्रॅमपेक्षा जास्त आवश्यक असते, परंतु हे प्रमाण पोषणतज्ज्ञ किंवा आहारतज्ज्ञांनी लिहून दिले पाहिजे,” असे त्यांनी सांगितले.
२०२० मध्ये प्रसिद्ध झालेल्या आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, एका निरोगी प्रौढ व्यक्तीला त्याच्या शरीराच्या वजनाच्या प्रति किलोग्रॅम अंदाजे ०.८ ते १ ग्रॅम प्रोटीन आवश्यक असतात, त्यापेक्षा जास्त असल्यास अतिसेवन मानले जाईल.
खालील संकेतांकडे लक्ष द्या
शरीराची कार्यपद्धती टिकवून ठेवण्याची एक अनोखी पद्धत आहे, ज्यामध्ये धोक्याच्या क्षेत्रात प्रवेश करण्यापूर्वी चेतावणी देणे महत्त्वाचे आहे. बंगळुरू येथील एस्टर सीएमआय हॉस्पिटलच्या क्लिनिकल न्यूट्रिशन अँड डायटेटिक्स, एडविना राज यांनी पाच प्रमुख चिन्हे सांगितली आहेत, ज्यावरून असे दिसून येते की खूप उशीर होण्यापूर्वी तुम्हाला प्रोटीनचे सेवन कमी करण्याची आवश्यकता आहे.
निर्जलीकरण
जास्त प्रोटीन सेवन केल्याने तुमच्या मूत्रपिंडांना प्रथिने चयापचयातील उत्पादने बाहेर काढण्यासाठी जास्त काम करावे लागू शकते, ज्यामुळे डिहायड्रेशन होण्याची शक्यता असते. यात तुम्हाला नेहमीपेक्षा जास्त तहान लागल्याचे किंवा गडद रंगाची लघवी होत असल्याचे दिसून येईल.
पचनाच्या समस्या
प्रोटीनयुक्त आहार घेतल्याने अनेकदा फायबरचे सेवन कमी होते, ज्यामुळे बद्धकोष्ठता, पोटफुगी आणि अस्वस्थता येऊ शकते. मॅक्रोन्यूट्रिएंट्सचे योग्य संतुलन न ठेवता तुमच्या आतड्यांचे आरोग्य बिघडू शकते.
श्वासाची दुर्गंधी
खूप जास्त प्रोटीनयुक्त, कमी कार्बोहायड्रेटयुक्त आहार तुमच्या शरीराला केटोसिसच्या अवस्थेत आणू शकतो, ज्यामुळे तोंडाची चांगली स्वच्छता असूनही अनेकदा दुर्गंधी येते.
वजन वाढणे
प्रोटीन बहुतेकदा वजन कमी करण्याशी संबंधित असतात, परंतु त्यातील प्रोटीन जास्त प्रमाणात वजन वाढण्यास कारणीभूत ठरू शकते. जर शरीराला ऊर्जेसाठी किंवा दुरुस्तीसाठी त्वरित गरज नसेल तर जास्तीचे प्रोटीन चरबी म्हणून साठवले जातात.
मूत्रपिंडावर ताण
सतत जास्त प्रमाणात प्रोटीनचे सेवन केल्याने मूत्रपिंडांवर ताण येऊ शकतो, विशेषतः ज्यांना आधीच मूत्रपिंडाचा आजार आहे अशा लोकांमध्ये. हात, पाय किंवा चेहऱ्याला सूज येणे ही सुरुवातीची संकेत देणारी लक्षणे असू शकतात.