Eye Health Warning: आजच्या डिजिटल युगात मोबाईल फोन, टीव्ही आणि कम्प्युटरच्या वाढत्या वापरामुळे डोळ्यांवर विपरीत परिणाम होत आहे. जास्त वेळ स्क्रीन पाहिल्यामुळे निर्माण होणारा निळा प्रकाश डोळ्यांची कॉन्ट्रास्ट संवेदनशीलता कमी करतो. त्यामुळे डोळ्यांवर ताण येतो, जोळे कोरडे पडतात आणि जळजळ होते. नोकरी करणारे लोक काम करताना अनेकदा पापण्यांची उघडझाप कमी करतात, त्यामुळे डोळ्यांचा कोरडेपणा वाढतो आणि हळूहळू त्याचा परिणाम दृष्टीवर होतो.
स्क्रीन पाहण्याचा वाढता वेळ, प्रदूषण आणि अनियमित दैनंदिन दिनचर्या डोळ्यांवर सतत दबाव टाकत आहेत. अशा परिस्थितीत डोळे अनेकदा काही लहान पण महत्त्वाचे संकेत देतात. त्याकडे आपण सामान्य थकवा किंवा किरकोळ समस्या समजून दुर्लक्ष करतो. या वरवर किरकोळ वाटणाऱ्या समस्या कालांतराने मोठ्या समस्यांमध्ये बदलू शकतात.
एम्सचे माजी सल्लागार आणि साओल हार्ट सेंटरचे संस्थापक आणि संचालक डॉ. बिमल झांजर यांनी दि इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, वाढत्या वयानुसार पोषक तत्वांच्या कमतरतेचा डोळ्यांवर परिणाम होतो. त्यामुळे दीर्घकाळ डोळ्यांचे आरोग्य जपण्यासाठी आहारात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि ओमेगा-३ने समृद्ध असलेल्या पदार्थांचा समावेश करणे महत्त्वाचे आहे.
तज्ज्ञांच्या मते, डोळ्यांशी संबंधित काही लक्षणे अशी आहेत जी वेदना नसतानाही गंभीर समस्येचे संकेत देऊ शकतात. जर ही लक्षणे लवकर ओळखली गेली आणि योग्य उपाययोजना केल्या गेल्या, तर केवळ डोळ्यांचे नुकसान टाळता येत नाही, तर दीर्घकाळ चांगली दृष्टी देखील टिकवता येते. त्यामुळे ही धोक्याची चिन्हे समजून घेणे आणि डोळ्यांची काळजी घेणे आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनवणे महत्त्वाचे आहे.
डोळ्यांमधील छुपी लक्षणे
सतत अंधुक दृष्टी
जास्त वेळ स्क्रीन पाहिल्यानंतर दृष्टी थोडी अंधुक होणे सामान्य आहे. तसंच जर तुमची दृष्टी वारंवार स्पष्ट ते अंधुक होत असेल, तर ते मोतीबिंदूच्या सुरूवातीच्या टप्प्याचे लक्षण असू शकते. तसंच डायबिटीजमुळे रक्तातील साखरेत होणाऱ्या बदलांचेही ते लक्षण असू शकते. यावर त्वरित उपचार करणे आवश्यक आहे.
डोळ्यांवर ताण आणि डोकेदुखी
जर तुम्हाला वाचताना किंवा लॅपटॉपवर काम करताना वांवार डोकेदुखी किंवा डोळ्यांमध्ये वेदना होत असतील तर हे डोळ्यांच्या समस्या किंवा असंतुलनाचे लक्षण असू शकते. कालांतराने हे डोळे कोरडे होणे, संसर्ग किंवा दाह यांचेही लक्षण असू शकते. यावर उपचार न केल्यास डोळ्यांचे नुकसान होऊ शकते.
डोळ्यांमध्ये लालसरपणा आणि जळजळ
बरेच लोक डोळे लाल होणे किंवा त्यातून पाणी येणे याकडे धूळ किंवा अॅलर्जीचे लक्षण म्हणून दुर्लक्ष करतात. सतत होणारी जळजळ किंवा लालसरपणा हे ड्राय आय सिंड्रोम, संसर्ग किंवा दाह यांचे लक्षण असू शकते. यावर उपचार न केल्यास डोळ्यांच्या पृष्ठभागाला नुकसान पोहोचू शकते.
रात्रीच्या वेळी पाहण्यात अडचण
जर तुम्हाला रात्री स्पष्ट दिसण्यास अडचण येत असेल किंवा दिव्यांचा झगमगाट जाणवत असेल, तर हे मोतीबिंदूच्या सुरूवातीच्या टप्प्याचे किंवा रेटिनामधील बदलांचे लक्षण असू शकते. ही लक्षणे हळूहळू विकसित होतात, त्यामुळे लोक अनेकदा त्याकडे दुर्लक्ष करतात.
फ्लॅश
कधीकधी डोळ्यासमोर लहान ठिपके दिसणे सामान्य असू शकते. तसंच जर हे तरंगणारे ठिपके अचानक वाढले, तुम्हाला प्रकाशाचे झोत दिसू लागले किंवा तुमच्या दृष्टीसमोर गडद सावल्या दिसू लागल्या तर हे रेटिनल डिटॅचमेंटचे लक्षण असू शकते. ही एक गंभीर स्थिती आहे, त्यावर उपचार करणे आवश्यक आहे कारण यामुळे कायमची दृष्टी जाण्याची शक्यता असते.
डोळ्यांची तपासणी का महत्त्वाची असते?
डोळ्यांची तपासणी केवळ चष्मा बदलण्यासाठी नसते. या तपासणीतून ग्लॉकोमा, डायबेटिक रेटिनोपॅथी आणि उच्च रक्तदाबामुळे होणारे डोळ्यांचे आजार यासारख्या गंभीर स्थितींचेही निदान होऊ शकते. अनेकदा कोणतीही लक्षणे न दाखवता अशी स्थिती उद्भवू शकते. लवकर निदान झाल्यास वेळेवर उपचार मिळू शकतात आणि दृष्टी सुधारू शकते.
नैसर्गिकदृष्ट्या दृष्टी सुधारण्यासाठी उपाय
- तुमची दृष्टी सुधारण्यासाठी हिरव्या पालेभाज्या खा. हिरव्या पालेभाज्यांमध्ये पालक, बथुआ, राजगिरा आणि मेथी यांचा समावेश करा.
- गाजर खा. गाजरांमध्ये व्हिटॅमिन सी, ल्युटीन, झिया झॅन्थिन, व्हिटॅमिन के आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. गाजर कच्चे किंवा सूपमध्ये घालून खाल्ल्याने डोळे निरोगी राहण्यास मदत होते.
- आपले डोळे निरोगी ठेवण्यासाठी रताळे खा. रताळ्यामध्ये फॉस्फरस, कॅल्शियम, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए असतात. ते डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.
- आपले डोळे निरोगी ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. पाण्यामुळे शरीर आणि डोळे दोन्ही आर्द्र राहतात. पुरेसे पाणी प्यायल्याने डोळे कोरडे होण्याचा त्रास टळतो.
- आपले डोळे निरोगी ठेवण्यासाठी विविध प्रकारची कडधान्ये खा. कडधान्यांमध्ये लोह, जस्त, फोलेट, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम यासारखी अनेक जीवनसत्त्वे, खनिजे आणि प्रोटीन असतात. त्यामुळे केवळ तुमच्या आरोग्यालाच नव्हे तर तुमच्या डोळ्यांनाही फायदा होतो.
