Sudden Collapsing While Walk Can Be Heart Disease: सकाळी फिरायला गेल्यावर अचानक चक्कर येणे किंवा डोळ्यांपुढे अंधारी येऊन कोसळणे, ही बाब आपण अनेकदा किरकोळ समजून दुर्लक्षित केली जाते. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे, नाश्ता न करणे किंवा थकवा ही त्याची कारणे असू शकतात असा आपला समज असतो. मात्र डॉक्टरांच्या मते ही लक्षणे हृदयाच्या एका गंभीर आणि सायलेंट आजाराचा इशारा असू शकतात. याला ‘हार्ट वॉल्व्ह स्टेनोसिस’ (Heart Valve Stenosis) असे म्हणतात.

काय आहे हा ‘हार्ट वॉल्व्ह स्टेनोसिस’ आजार?

या आजारात हृदयाच्या झडपा (Valves) असामान्यपणे अरुंद होतात. मनिपाल हॉस्पिटलमधील कार्डिओलॉजी सल्लागार डॉ. अभिषेक सिंह यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, “जेव्हा हृदयाची झडप आकुंचन पावते, तेव्हा शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी हृदय अधिक जोराने रक्त पंप करू लागते. यामुळे हृदयाचे स्नायू जाड होतात. याला ‘हायपरट्रॉफी’ म्हणतात. सुरुवातीला कोणतीही लक्षणे न दिसता हृदय हे काम करत राहते. मात्र जेव्हा आपण व्यायाम किंवा चालण्यासारखी शारीरिक हालचाल करतो, तेव्हा मेंदूला अधिक ऑक्सिजनची गरज लागते. अरुंद झडपांमुळे हृदय हा पुरवठा करू शकत नाही आणि परिणामी व्यक्ती अचानक बेशुद्ध होऊन कोसळते.”

ही आहेत ५ धोक्याची लक्षणे

जर तुम्हाला खालीलपैकी त्रास जाणवत असेल, तर त्वरित तपासणी करून घेणे गरजेचे आहे…

१. साध्या कामातही धाप लागणे- चालताना किंवा पायऱ्या चढताना श्वास घेण्यास त्रास होणे.

२. छातीत जडपणा- शारीरिक हालचाल करताना छातीवर दबाव किंवा जडपणा जाणवणे.

३. गरगरणे- वेगाने चालताना किंवा अचानक उठून उभे राहिल्यावर चक्कर येणे.

४. सततचा थकवा- पुरेशी विश्रांती घेऊनही सतत थकल्यासारखे वाटणे.

५. धडधड वाढणे- हृदय वेगाने धडधडणे किंवा ठोके चुकल्यासारखे वाटणे.

यावर उपचार काय आहेत?

डॉ. सिंह यांच्या मते, औषधे हा या समस्येवर तात्पुरता उपाय असू शकतो. औषधांमुळे हृदयावरील ताण कमी होतो आणि रक्तदाब नियंत्रित राहतो. मात्र मूळ समस्या ही यांत्रिक (Mechanical) स्वरूपाची असल्याने त्यावर शस्त्रक्रिया हाच कायमस्वरूपी मार्ग आहे.

वॉल्व्ह रिप्लेसमेंट (झडप बदलणे)- अरुंद झालेली आणि खराब झालेली झडप काढून त्या ठिकाणी कृत्रिम (Prosthetic) झडप बसवली जाते.

दोन पद्धती- हे काम पारंपारिक ‘ओपन चेस्ट’ शस्त्रक्रियेद्वारे किंवा आधुनिक ‘मिनिमली इनव्हेसिव्ह कॅथेटर’ (Minimally Invasive Catheter) तंत्रज्ञानाद्वारे केले जाऊ शकते. एकदा का झडपेतील अडथळा दूर झाला की, हृदयाचा ताण कमी होतो आणि अचानक चक्कर येण्याचा धोका टळतो.

तज्ज्ञ काय सल्ला देतात?

अचानक येणारी चक्कर हा निव्वळ थकवा नसून हृदयाच्या बिघडलेल्या कार्याचा संकेत असू शकतो. त्यामुळे वेळेवर निदान आणि तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन घेणे जीवावर बेतणारे प्रसंग टाळू शकते.