मुंबई : गर्भधारणेच्या प्रक्रियेत आईचे आरोग्य सर्वात महत्त्वाचे मानले जाते अशी सर्वसाधारण धारणा आहे. मात्र, अलीकडे प्रसिद्ध झालेल्या ‘द लॅन्सेट’ या प्रतिष्ठित वैद्यकीय जर्नलमधील एका संशोधनाने ही समज बदलून टाकली आहे. या अभ्यासानुसार वडिलांचे फिटनेस, धूम्रपानाची सवय, वजन, मानसिक आरोग्य आणि जीवनशैली यांचा बाळाच्या आरोग्यावर आईइतकाच प्रभाव पडतो.

‘युनिव्हर्सिटी ऑफ साउथॅम्प्टन’च्या संशोधकांनी केलेल्या या अभ्यासात असे आढळले की, अभ्यासात गर्भधारणेपूर्व काळातील (प्री-कन्सेप्शन) वडिलांच्या आरोग्याचा बारकाईने अभ्यास करण्यात आला. त्यातून असे स्पष्ट झाले की, पुरुषांचे वय, वजन, आहार, व्यायामाची सवय, धूम्रपान किंवा मद्यपान यांसारख्या गोष्टी शुक्राणूंच्या गुणवत्तेला प्रभावित करतात आणि त्याचा थेट परिणाम गर्भधारणेच्या यशस्वितेवर तसेच बाळाच्या आरोग्यावर होतो. संशोधनात असेही नमूद करण्यात आले आहे की, काही परिस्थितींमध्ये वडिलांचा प्रभाव आईपेक्षा अधिक ठरू शकतो. विशेषतः वडिलांच्या बालपणातील आरोग्य, पोषण आणि सामाजिक परिस्थितीचा प्रभाव पुढील पिढीवरही दिसून येतो.

या अभ्यासाचे वरिष्ठ लेखक प्रा. कीथ गॉडफ्रे यांनी नमूद केले की, काही बाबतीत वडिलांचा प्रभाव आईपेक्षा अधिकही असू शकतो. विशेषतः वडिलांच्या बालपणीच्या अनुभवांचा देखील त्यांच्या आरोग्यावर आणि परिणामी पुढील पिढीवर परिणाम होत असल्याचे संशोधनातून दिसून आले आहे. त्यामुळे भविष्यातील पिढ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी तरुण पुरुषांच्या आरोग्याकडे लक्ष देणे अत्यावश्यक असल्याचे संशोधकांनी स्पष्ट केले.तज्ञांचे म्हणणे आहे की, समाजात अजूनही गर्भधारणेची जबाबदारी प्रामुख्याने महिलांवर टाकली जाते. मात्र, हे संशोधन दर्शवते की बाळाच्या आरोग्यासाठी आई आणि वडील दोघांचेही आरोग्य तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे पुरुषांनीही गर्भधारणेपूर्वी आपल्या आरोग्याकडे गंभीरपणे लक्ष देणे गरजेचे आहे.

Award Banner

जागतिक स्तरावर पुरुषांच्या प्रजननक्षमतेत घट होत असल्याची चिंताजनक बाबही या अभ्यासातून पुढे आली आहे. १९७३ ते २०२८ या कालावधीत पुरुषांच्या शुक्राणूंची संख्या ५० टक्क्यांहून अधिक कमी झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. यामागे बदलती जीवनशैली, वाढती स्थूलता, धूम्रपान, मद्यपान आणि तणाव हे प्रमुख घटक असल्याचे सांगितले जाते.या अभ्यासानुसार, वडिलांच्या आरोग्याचा परिणाम केवळ बाळावरच नव्हे, तर आईच्या गर्भधारणेवरही होऊ शकतो. उदाहरणार्थ, वडिलांना स्थूलता किंवा मधुमेहासारखे आजार असतील, तर गर्भवती महिलांमध्ये उच्च रक्तदाबाशी संबंधित गुंतागुंत होण्याचा धोका वाढतो. तसेच, गर्भधारणेपूर्वी निरोगी जीवनशैली ठेवणाऱ्या पुरुषांच्या बाळांमध्ये जन्मदोष होण्याची शक्यता कमी असल्याचेही संशोधनात आढळले आहे. उलट, धूम्रपान करणारे किंवा जास्त वजन असलेले वडील असतील, तर बाळांमध्ये जन्मजात विकृती किंवा इतर आरोग्याच्या समस्या वाढण्याची शक्यता अधिक असते. काही प्रकरणांमध्ये तर वडिलांच्या धूम्रपानामुळे बाळांमध्ये कर्करोगाचा धोका वाढू शकतो, असेही या अभ्यासातून सूचित करण्यात आले आहे.

याशिवाय, पुरुषांच्या मानसिक आरोग्याचाही प्रजननक्षमतेवर परिणाम होतो. तणाव, सामाजिक परिस्थिती, शिक्षण आणि जीवनमान यांचा त्यांच्या आरोग्यावर प्रभाव पडतो आणि त्यातून बाळाच्या आरोग्यावर अप्रत्यक्ष परिणाम होतो.तज्ज्ञांच्या मते, समाजात अजूनही गर्भधारणेची जबाबदारी मुख्यतः महिलांवर टाकली जाते. मात्र, हे संशोधन दर्शवते की निरोगी बाळासाठी आई आणि वडील दोघांचेही आरोग्य तितकेच महत्त्वाचे आहे.एकंदरीत, या अभ्यासामुळे कुटुंब नियोजनाच्या दृष्टिकोनात बदल करण्याची गरज अधोरेखित झाली आहे. भविष्यातील पिढी अधिक निरोगी व्हावी यासाठी पुरुषांनीही गर्भधारणेपूर्वी आपल्या आरोग्याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक असल्याचा ठोस संदेश या संशोधनातून देण्यात आला आहे.