नवी दिल्ली : वृद्धत्वाबद्दल वाटणारी चिंता आरोग्याला नुकसानकारक ठरते. वृद्धत्वाबद्दलची चिंता आणि विशेषत: भविष्यातील आरोग्य समस्यांची भीती आपल्या शरीरातील वृद्धत्वाची प्रक्रिया वेगवान करते. हा बाह्य बदल नाही, तर आपल्या शरीरातील पेशीय पातळीवर होणारा बदल आहे, ज्यामुळे अकाली वृद्धत्व येते, असे न्यूयॉर्क विद्यापीठाच्या एका अभ्यासातून समोर आले आहे. काही लोकं वयाच्या तुलनेत वयस्कर दिसतात यावर शास्त्रज्ञांनी खुलासा केला आहे.

हा अभ्यास ७०० हून अधिक महिलांवर करण्यात आला. ज्या महिला त्यांच्या वाढत्या वयाबद्दल जास्त चिंताग्रस्त होत्या त्यांच्या रक्त चाचण्यांमध्ये जैविकदृष्ट्या अकाली वृद्धत्वाची स्पष्ट चिन्हे शास्त्रज्ञांना दिसून आली.  वैज्ञानिक भाषेत, वय दर्शविणारी ही वैशिष्ट्ये मोजण्यासाठी वापरल्या जाणार्‍या तंत्राला ‘एपिजेनेटिक घड्याळे‘ (एखाद्या व्यक्तीचे जैविक वय निर्धारित करण्यासाठी वापरले जाणारे तंत्र) म्हणतात.

या संशोधनात मनोरंजक निष्कर्षदेखील समोर आला. प्रौढांमध्ये अकाली वृद्धत्वाशी असलेला हा संबंध प्रामुख्याने रोगाची भीती, शारीरिक कमकुवतपणा आणि अवलंबित्वाशी जोडलेला होता. याउलट, जर एखाद्या महिलेला फक्त तिच्या सौंदर्याच्या र्‍हासाबद्दल किंवा प्रजननक्षमतेबद्दल काळजी वाटत असेल, तर त्याचा वृद्धत्वाच्या प्रक्रियेवर परिणाम होत नाही, असे अभ्यासात सहभागी असलेल्या संशोधक मारियाना रॉड्रिग्ज यांनी परिस्थिती स्पष्ट केले. वृद्धत्वाची भीती ही केवळ एक भ्रम किंवा किरकोळ मानसिक समस्या नाही तर एक गंभीर आरोग्य समस्या आहे, असेह सांगण्यात आले.